
नवी दिल्ली : सिक्कीममध्ये गेल्या आठवड्यात पावसाने हाहाकार उडविला होता. राज्यातील काही भागांचा संपर्क तुटला होता. उत्तर सिक्कीममध्ये अडकलेले हजारो पर्यटक आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराने तातडीने मदतकार्य सुरू केले होते. भारतीय लष्कराच्या अभियंत्यांनी दुथडी भरून वाहणाऱ्या नदीवर १५० फूट लांबीचा झुलता पूल ४८ तासांत यशस्वीपणे बांधला. लष्कराने २० नॉट्सपेक्षा जास्त वेगाने वाहणाऱ्या पाण्यावर झुलता पूल उभारण्यास सुरुवात केली होती.
सततच्या मुसळधार पावसामुळे तुटलेल्या सीमावर्ती गावांशी या पुलामुळे पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला. लष्कराने २० नॉट्सपेक्षा जास्त वेगाने वाहणाऱ्या पाण्यावर झुलता पूल उभारण्यास सुरुवात केली होती आणि हे संपूर्ण काम अवघ्या ४८ तासांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण केले. या पुलाचे बांधकाम अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत करण्यात आले. प्रतिकूल हवामान आणि वेगाने वाहणारे पाणी असूनही भारतीय लष्कराच्या अभियंत्यांनी त्यांच्या तांत्रिक प्रावीण्य पणाला लावले,’ असे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या एका प्रेस निवेदनात म्हटले आहे.
मंत्रालयाने शेअर केलेल्या छायाचित्रे आणि व्हिडिओंमध्ये वेगाने वाहणाऱ्या नदीवरील पुलाचे अंतिम टप्प्यातील काम लष्करी अभियंते करीत असल्याचे दिसत होते. नव्याने बांधण्यात आलेला झुलता पूल हा संपर्क तुटलेल्या भागाला जोडण्याबरोबरच लोकांची ये-जा आणि बाधितांना आवश्यक मदत सामग्री पुरविण्यासाठीही उपयुक्त ठरल्याचे निवेदनात म्हटले आहे. या कठीण काळात या सीमावर्ती गावांतील रहिवाशांना आवश्यक साधने व आधार देण्यासाठी हा पूल महत्त्वाची भूमिका बजावेल, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
उत्तर सिक्कीममध्ये भारतीय लष्कराच्या तातडीच्या उपाययोजनांमुळे स्थानिक लोकांनी आधार देण्याचे आणि त्यांचे संरक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित होते. गरजेच्या वेळी ताकद देणारा आधारस्तंभ, ही लष्कराची ओळख पुन्हा दृढ झाली, असेही लष्करी निवेदनात म्हटले आहे.