जमीन केली तयार
मागे ढकलून सागर
सात बेटं मिळवून
वसवलं मोठं नगर
पोटासाठी नगराकडे
जो तो धाव घेई
आई-बापावाणी नगर
आधार त्यांना देई
जगण्यासाठी धडपड
हे नगर शिकविते
प्रयत्नातल्या ताकदीचे
दर्शन घडविते
माझ्या नगराची तुम्हा
काय सांगू शान
प्रत्येकाच्या स्वप्नांना ते
साकार करते छान
संकटकाळी आपणहून
नगर एक होते
जात, धर्म, पंथ विसरून
संकटास तोंड देते
आपल्या भारत देशाची
ही आर्थिक राजधानी
तिच्या नावाचा डंका वाजे
साऱ्या जगातूनी
असे माझे नगर
त्याचे नाव हो मुंबई
दंग होई मन
पाहून त्याची नवलाई
काव्यकोडी – एकनाथ आव्हाड
१) कडेवर घेतले की
बघते हसून
थोडे जरी बोलले की
बसते रुसून
घरभर दुडुदुडु
फिरताना दिसते
आईच्या कुशीत
कोण जाऊन बसते?
२) इथूनच वारा
घरात घुसतो
इथूनच बाहेरचा
पाऊस दिसतो
घराला असतात
एक किंवा दोन
बाहेरचे जग
दाखवतं कोण?
३) वेळेला निरोप
पटकन सांगतो
रेंज गेल्यावर
रुसून बसतो
असून कटकट
नसून खोळंबा
कोण वाजला की
म्हणतात थांबा?
उत्तर –
१) बाळ
२) खिडकी
३) मोबाइल