Sunday, July 21, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखवटपौर्णिमा हा स्त्रियांच्या गौरवाचा सण

वटपौर्णिमा हा स्त्रियांच्या गौरवाचा सण

तेजल नेने – मोरजकर

आपल्या भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा हा कुटुंबवत्सल आहे. पत्नी आपल्या पतीसाठी एखादी पूजा करते, त्याच्यासाठी शुभ विचार करते. देवाकडे त्याच्यासाठी प्रार्थना करते. यातून ती एक प्रकारे आपल्या कुटुंबासाठीच शुभकामना करत असते; कारण कोणत्याही कुटुंबाला पती-पत्नी दोघेही महत्त्वाचेच आहेत ना! आपल्या संस्कृतीत कुठलेही धार्मिक कर्तव्य हे पत्नीविना पूर्ण होत नाही. अनेक व्रते आहेत की, जे पुरुषही करतात. ही सारी व्रते कुटुंबाच्या लाभासाठीच असतात म्हणजे असे, आपल्याला कुठेही म्हणता येत नाही की, व्रतवैकल्ये ही केवळ स्त्रियांनाच सांगितलेली आहेत. स्त्री आणि पुरुष दोघेही कुटुंबासाठी व्रते करत असतात. कारण भारतीय संस्कृती हे दुसऱ्याचा विचार करण्याचा संदेश देते.

जर आपण वटसावित्री कथेचा आधार घेतला, तर सावित्री ही अश्वपती नावाच्या मोठ्या राजाची कन्या आहे. ती अतिशय हुशार, शस्त्र आणि शास्त्रात पारंगत आहे. तिने अतिशय विचारपूर्वक सत्यवानाशी विवाह केलेला आहे. ती प्रत्यक्ष यमाशी वाद घालते आणि जिंकते. यातूनच तिची प्रखर बुद्धिमत्ता आपल्या लक्षात येते. कथेतून आपल्याला सावित्रीचे अनेक गुण दिसतात. तिचा स्वतःवर असलेला विश्वास दिसतो. कारण तिला लग्नाच्या आधीच ठाऊक होते की, सत्यवानाचे आयुष्य अधिक नाही; पण ती अतिशय विश्वासाने त्याच्याशी विवाह करून त्याला नुसते जीवनदानच देत नाही, तर त्याचे गेलेले राज्य परत मिळवते. यातून तिचा स्वतःवरचा विश्वास आणि स्वप्नपूर्तीचा ध्यास दिसतो. ती आपल्या अंध सासू-सासऱ्यांची सेवा करते. यातून तिचा विनम्रपणा देखील दिसतो. याखेरीज अतिशय कठीण परिस्थितीत ती आपल्या पतीला साथ देते. यातून तिचा समर्पित भावही कथा वाचल्यानंतर लक्षात येतो. थोडक्यात कथेचे सार असे आहे की, सावित्री एक अतिशय हुशार आणि कर्तृत्ववान राजकन्या आहे. ती कुणीतरी अशिक्षित किंवा अजाण अशी स्त्री नव्हे. तिने विचारपूर्वक निर्णय घेतला आणि त्यात ती यशस्वी झाली आहे. त्यामुळे हा सण स्त्रियांच्या गुलामीचा नव्हे, तर भारतीय स्त्री ही किती विचारी असते आणि ती सर्व कर्तव्य निभावून कशी यशस्वी होते, हे दाखवणारा सण आहे.

हा सण स्त्रियांच्या गौरवाचा सण आहे. या मृत्यूलोकामध्ये अशी एकमेव स्त्री झाली जिने आपल्या पतीचे प्राण यमाच्या पाशातून परत आणले, फक्त प्राणच नव्हे तर गतवैभवही मिळवले. तिच्या बुद्धिचातुर्याची ही कमालच म्हणावी. यमाने दिलेली प्रलोभने यांना झुगारून ती आपल्या मुद्द्यावर ठाम राहिली. आजच्या महिलांमध्ये हे गुण आहेत का? याचे उत्तर कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या घटस्फोट प्रकरणावरून समजते. आज घटस्फोटापर्यंत विषय जाण्याची गरज का पडत आहे याचा कोणी विचार केला का? सत्यवान आणि सावित्री यांच्या नात्याची आपण उदाहरणे देत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की, ‘सत्यवान आणि सावित्री हे एकमेकांना पुरक होते. पूर्वीपासून आपल्याला सत्यवान सावित्रीची कहाणी ही ऐकायला मिळते, ही कहाणी ऐकताना कायम एकच विचार मनात येत होता की, त्या दोघांच्या नात्यांमधला सुसंवाद आणि एकमेकांना दिला जाणारा मान हा तेवढाच खरा होता, असा मान आणि सुसंवाद आताच्या घडीला साथीदाराकडून दिला जातो का?

आताची स्त्री ही सक्षम बनली आहे. तिला तिचे असे स्वतंत्र विचार देखील आहेत. ती तिच्या पायावर सक्षम उभी असल्यामुळे तिच्याकडे अडचणींवर मात करायचे साहस आहे. प्रत्येक स्त्रीला मान हा दिलाच गेला पाहिजे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या कुटुंबासाठी पुरुषासोबत खांद्याला खांदा लावून ती देखील तेवढीच मेहनत घेत असते. घरातले सांभाळून ती बाहेरच्या कामातही तिच्याकडून प्रामाणिक प्रयत्न करत असते तरी देखील स्त्रीला अजूनही दुय्यम स्थान दिले जाते. तसे बघायला गेले तर अजूनही आपल्या येथे पुरुषप्रधान संस्कृती बघायला मिळते. काही ठिकाणी अजून सुद्धा महिला आपल्या नवऱ्याच्या दबावाखाली राहत असल्याचे आपण बघतो. नवरा व्यसनी, दुराचारी असला तरीही स्त्री वटसावित्रीचा उपवास करते, याबद्दल माझे स्वतःचे असे मत आहे की, काही महिलांचे खरंच पतींवर प्रेम असते म्हणून व्रत करतात, तर काही महिला या फक्त लोकलाजेस्तव असे करतात.

जग खूप बदललं… छोट्या छोट्या कारणांवरून घटस्फोट होऊ लागलेत. एकमेकांना समजून घेण्याचा विचार आजच्या लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये नाही. संसारातील तडजोड जिथे फक्त मी एकट्यानेच का करू? असा सवाल प्रत्येकजण एकमेकांना विचारू लागले. ज्याप्रमाणे एका स्त्रीला पतीच्या आयुष्यासाठी हे व्रत करावे असे पूर्वीपासून दंतकथेमध्ये सांगितले आहे, त्याचप्रमाणे आताच्या घडीला पुरुषाने देखील आपल्या पत्नीसाठी हे व्रत करणे तितकेच गरजेचे आहे. कारण स्त्री देखील पुरुषाबरोबर तेवढ्याच ताकदीने आपल्या संसारासाठी झटत असते. त्यामुळे प्रत्येकाने याची सुरुवात आपल्या घरातून करावी, कारण जिथे एक स्त्री अशी आहे जिने आपल्यासमोर एक अनोखा आदर्श ठेवला आहे. ती स्त्री फक्त सावित्रीच असू शकते.
tejalmorajkar19@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -