
पंतप्रधानांची तुलना देशी ब्रँडीसोबत करणारे संजय राऊतसारखे कार्टे अतिव्यसनाधीन
भाजपा आमदार नितेश राणे यांची राऊतांवर सडकून टीका
मुंबई : आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त (International Yoga day) दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जनतेला योगाचे महत्त्व समजावून देत असतात. असा काळजीवाहू पंतप्रधान असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र नेहमीप्रमाणे पंतप्रधानांवर टीका केली. त्यांची तुलना राऊतांनी थेट देशी ब्रँडीसोबत केली. यावर आता भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्यांमागील नेमकं कारणंच नितेश राणे यांनी सांगितलं आहे. 'संजय राऊत हे मराठवाड्यातील लोकप्रिय देशी दारु टँगो पंचच्या आधारावर भाषणाला उभे राहतात' असा दणदणीत टोला नितेश राणे यांनी लगावला.
नितेश राणे म्हणाले, पंतप्रधानांची तुलना देशी ब्रँडीसोबत करणारे संजय राजाराम राऊतसारखे कार्टे हे किती व्यसनाधीन झाले असतील! यांचा योगा करतानाचा व्हिडिओ चुकूनही तुम्हाला दिसणार नाही कारण यांची आसनंच वेगळी आहेत. मराठवाड्यामध्ये टँगो पंच नावाची एक लोकप्रिय अशी देशी दारु आहे. आम्हाला आतापर्यंत वाटत होतं की संजय राऊतांना नाईन्टीची सवय आहे, पण हल्ली टँगो पंचचा आधार घेऊन ते भाषणाला उभे राहतात, असं आम्ही ऐकलं आहे. त्याच टँगो पंचचा इफेक्ट पाकसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने षण्मुखानंद हॉलमध्ये दिसला, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
संजय राऊतला चांगल्याला चांगलं म्हणता येत नाही. मातोश्रीमध्ये हा भांडुपचा देवानंद तुम्हाला कधीही योगा दिवस साजरा करताना दिसणार नाही. म्हणून देशी दारु आणि देशी ब्रँडीमध्येच ज्याला जास्त रस आहे, त्याने देशाच्या पंतप्रधानांवर बोलण्याची हिंमत करु नये, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
केजरीवालांची बाजू घेणं हा राऊतांवरील टँगो पंचचा इफेक्ट
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, आमचे विरोधक ईडी आणि सीबीआयच्या बाबतीत आमच्यावर सातत्याने जे आरोप करतात, त्यांनी थेट कोर्टात जाऊन आमच्याविरोधात आपली बाजू मांडावी. कोर्टाला जे योग्य वाटेल त्यानुसार ते निर्णय देतील. त्याच पद्धतीने अरविंद केजरीवाल यांच्याबाबत कोर्टात काल निकाल आला. पण याचा हा अर्थ नाही की त्यांची आरोपातून सुटका झाली. केजरीवाल असो नाहीतर संजय राऊत असो, हे सर्वजण जामिनावर बाहेर आहेत. त्यामुळे ज्या अविर्भावात संजय राऊत सकाळी सांगतो की घोटाळा झालाच नाही, तो टँगो पंचचा इफेक्ट असावा, अशी टीका नितेश राणे यांनी केली.