Saturday, July 6, 2024
HomeदेशIndia Nuclear Power : अण्वस्त्रांच्या बाबतीत भारताने पाकिस्तानला टाकले मागे

India Nuclear Power : अण्वस्त्रांच्या बाबतीत भारताने पाकिस्तानला टाकले मागे

भारताकडे १७२, तर पाकिस्तानकडे १७० अण्वस्त्रांची संख्या

नवी दिल्ली : अण्वस्त्रांच्या बाबतीत भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे. स्वीडिश थिंक-टँकच्या अहवालानुसार जानेवारी २०२४ पर्यंत भारताकडे १७२ अण्वस्त्रे होती. तर पाकिस्तानकडील अण्वस्त्रांची संख्या १७० इतकी आहे. या अहवालात दावा केला आहे की भारताने २०२३ मध्ये नव्या अण्वस्त्रांची निर्मिती करून आपल्याकडील अण्वस्त्रांची संख्या वाढवली आहे. दुसऱ्या बाजूला चीननेही त्यांच्या अणू कार्यक्रमात अधिक लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी २०२४ पर्यंत त्यांच्याकडे ५०० अण्वस्त्र होती. तसेच चीनने पहिल्यांदाच त्यांची हाय ऑपरेशनल शस्त्रे अलर्ट मोडवर ठेवली आहे. जानेवारी २०२३ पर्यंत चीनकडे ४१० आण्विक शस्त्रं होती, जी आता ९० ने वाढली आहे.

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (SIPRI) अहवालानुसार भारत, चीन, पाकिस्तानसह जगभरातील एकूण नऊ देशांकडे आण्विक शस्त्रं आहेत. अण्वस्त्रधारी देशांचे अण्वस्त्रांवरील अवलंबित्व वाढत चालले आहे. या अहवालात म्हटले आहे की, ज्या ज्या देशांकडे अण्वस्त्रे आहेत ते देश त्यांच्याकडील आण्विक शस्त्रे अत्याधुनिक करत आहेत.

अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या देशांमधील सरकारे यावर अधिक लक्ष देत आहेत. भारत, चीन, पाकिस्तान, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, उत्तर कोरिया आणि इस्रायल या देशांकडे अण्वस्त्रे आहेत. जगभरात जितकी अण्वस्त्रे आहेत त्यापैकी ९० टक्के केवळ अमेरिका आणि रशियाकडे आहेत. उर्वरित १० टक्के अण्वस्त्रे इतर सात देशांकडे आहेत. २०२३ मध्ये अनेक देशांनी आण्विक सक्षम शस्त्रे तैनात केली आहेत. याबाबतीतही रशिया आणि अमेरिका हे देश आघाडीवर आहेत. जगभरात तयार करण्यात आलेल्या १२,१२१ अण्वस्त्रांपैकी जवळजवळ ९,५८५ अण्वस्त्र संभाव्य वापरासाठी सैन्याच्या शस्त्रागारात ठेवण्यात आली आहेत.

या अहवालानुसार, चीन हा देश सर्वात वेगाने त्यांच्या सैन्याचे आधुनिकीकरण करत आहे. चीनने अधिकाधिक अण्वस्त्रांची निर्मिती करण्याचा संकल्प केला आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी ९० नवी आण्विक शस्त्रे तयार केली आहेत. या दशकाच्या अखेरपर्यंत त्यांना रशिया आणि अमेरिकेची बरोबरी करायची असल्याचे सांगितले जात आहे. सध्याच्या घडीला रशिया आणि अमेरिकेकडे चीनच्या अनेक पटींनी अधिक आण्विक शस्त्रे आहेत. अमेरिकेकडे चीनच्या सात पट तर रशियाकडे आठ पट अधिक आण्विक शस्त्रे आहेत. दरम्यान, चीन एका खंडातून दुसऱ्या खंडापर्यंत मारा करता येईल अशी बॅलेस्टिक क्षेपणास्रे तयार करत आहे. चीन त्यांच्या शस्त्रागाराच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात पैसे देखील खर्च करत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -