
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सूनचा वेग मंदावला आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच उन्हाचा कडाका बसत आहे. मान्सूनचा वेग मंदावल्याने शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे.
मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या मात्र विदर्भात पुरेसा पाऊस झालेला नाही. दरम्यान, पावसाचा वेग वाढण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. मात्र यांचा जोर तितका नाही. दरम्यान, पावसाची प्रगती मंदावल्याने काही ठिकाणी उन्हाचे पुन्हा चटके बसू लागते. अनेक ठिकाणी तर तापमान वाढून ३५ ते ४० अंशापर्यंत पोहोचले आहे.
येत्या तीन ते चार दिवसांत अरबी समुद्रात नैऋत्य मोसमी पावसाच्या शाखा मजबूत होतील आणि त्यानंतर पावसाचा जोर २० जूननंतर वाढेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
अद्याप उन्हाचे चटके सहन करणारा विदर्भ मात्र पावसाच्या प्रतीक्षेत आहे. विदर्भात हवा तितका पाऊस झालेला नाही त्यामुळे तेथील लोक पावसाची प्रतीक्षा करत आहेत.