मिलिंद बेंडाळे, वन्य प्राणी आणि पर्यावरण अभ्यासक
वाढत्या उष्णतेमुळे अवघे जग आजारी पडण्याची शक्यता आहे. पृथ्वीवरील वाढत्या तापमानाचा मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. स्थिर हवामानापासून दूर जाण्याचे परिणामदेखील आश्चर्यकारक असतील. यामुळे काही जुने रोग नव्याने पसरू शकतात, तर काही नवे रोग उद्भवू शकतात. काही तज्ज्ञांच्या मतानुसार पूर्णपणे नवे रोगही उद्भवू शकतात. वाढत्या उष्णतेचा शेतीवर आणि अर्थकारणावरही प्रतिकूल परिणाम होतो.
यंदा केवळ राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि भारतातच नाही तर संपूर्ण आशिया खंडात उष्णतेच्या लाटांची तीव्रता वाढलेली बघायला मिळाली. वर्ल्ड वेदरच्या एका नवीन अभ्यासात आढळून आले की, हवामानबदलामुळे सरलेल्या एप्रिलमध्ये संपूर्ण आशियातील उष्णतेच्या लाटेची तीव्रता लक्षणीयरीत्या वाढली आहे. या काळातील विक्रमी तापमानाचा परिणाम कोट्यवधी लोकांवर झाल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. उष्णतेच्या लाटांची वारंवारता आणि तीव्रता वाढवण्यात मानवी हस्तक्षेपामुळे झालेल्या हवामानातील बदलांनी मोठी भूमिका बजावली. एप्रिलमध्ये आशियातील अनेक प्रदेशांनी आतापर्यंतचे सर्वात उष्ण दिवस अनुभवले. म्यानमार, लाओस, व्हिएतनाम आणि फिलिपिन्स या देशांमध्ये प्रथमच उच्च तापमान दिसून आले. उष्ण रात्रीही अनुभवायला मिळाल्या. भारतातील तापमान ५२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले तर पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्येही ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उष्णतेचा सामना करावा लागला. अतिउष्णतेमुळे अनेकांचा मृत्यूही झाला.
असह्य उष्णतेमुळे भारतात निवडणुकीच्या काळात एकाच दिवशी १६६ जणांचा मृत्यू झाला. त्यात निवडणूक कामामध्ये असणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. उष्णतेच्या लाटेमुळे पीक निकामी होणे, पशुधनाचे नुकसान, पाण्याची कमतरता, मासे मरणे आणि शाळा बंद पडणे असे प्रकार घडले. संशोधकांनी सध्याच्या हवामानाची तुलना पूर्व-औद्योगिक हवामानाशी केली आहे. मानवी हस्तक्षेपामुळे सध्याचे तापमान सुमारे १.२ अंश सेल्सिअसने वाढले. विश्लेषण दर्शवते की, पश्चिम आशियामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा आता पाचपट जास्त असून तापमानवाढ १.७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. फिलिपिन्समध्ये एल निनोच्या काळात उष्णतेच्या लाटांची वारंवारता आणि तीव्रता वाढत आहे. दक्षिण आशियामध्ये अशाच उष्णतेच्या लाटा पूर्वीच्या तुलनेत ४५ पट अधिक वारंवारतेने आणि ०.८५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढीने धडकत आहेत. एकंदरच वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले असून हा अभ्यास असुरक्षित लोकसंख्येवर अतिउष्णतेचा असमान परिणाम अधोरेखित करतो.
गाझामध्ये बरेच विस्थापित लोक उष्णतेपासून सुरक्षित राहण्यासाठी तंबूमध्ये राहतात. मात्र तिथे आरोग्य सेवा आणि स्वच्छ पाण्याची बोंबाबोब आहे. दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये लाखो लोक अनधिकृत वस्त्यांमध्ये राहतात. उष्ण झळांमुळे शेतकरी आणि रस्त्यावरील विक्रेते प्रभावित झाले आहेत. संशोधक असुरक्षित गटांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उष्णता कृती योजनांच्या गरजेवर भर देतात. हवामानबदलाचे परिणाम कमी करण्यासाठी आणि पुढील तापमानवाढ रोखण्यासाठी उत्सर्जन कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, असेही अभ्यासक सांगत आहेत. तज्ज्ञांच्या मते, हा अभ्यास हवामानातील बदलांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आणि अतिउष्णतेच्या वाढत्या धोक्यापासून असुरक्षित लोकांचे संरक्षण करण्याची तातडीची गरज अधोरेखित करतो. जागतिक तापमान वाढत असताना दुष्परिणाम कमी करण्यासाठी सर्वसमावेशक कृती योजना राबवणे महत्त्वाचे आहे. मलेरियाच्या डासांमुळे पसरणाऱ्या संसर्गामुळे गेल्या दशकात दर वर्षी अर्ध्या दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतेक मुले होती आणि जवळजवळ सर्व (२०२२ मध्ये ९५ टक्के) आफ्रिकेतील होती. संसर्गजन्य डासांच्या उत्पत्तीस ऊबदार तापमान, दमट हवा आणि प्रजननासाठी डबके या तीन गोष्टी कारणीभूत असतात. हवामान आणि मलेरियाचा प्रसार यांच्यातील संबंध गुंतागुंतीचा आहे आणि जवळपास तीन दशकांपासून त्यावर सखोल अभ्यास सुरू आहे.
ताज्या संशोधनाचा बराचसा भाग आफ्रिकेवर केंद्रित आहे. स्मिथ आणि थॉमस या अभ्यासकांनी मलेरियाच्या जोखमीचे संपूर्ण खंडव्यापी विश्लेषण तयार करण्यासाठी तापमान आणि जल परीसंचरण अंदाज एकत्रित केले. त्यांच्या बंधनातून उष्णकटिबंधीय रोग मुक्त होऊ शकतील, कारण त्यांना वाहून नेणारे कीटक विषुववृत्ताच्या पलीकडे टिकून राहतील. हे आधी फ्रान्समध्ये घडत आहे. तिथे २०२२ च्या कडक उन्हाळ्यात डेंगी तापाची प्रकरणे वाढलेली आढळली. वेनेटो (इटली)तील सखल प्रदेश क्युलेक्स डासांसाठी एक आदर्श निवासस्थान म्हणून उदयाला येत आहे. संशोधनानुसार वाढत्या तापमानामुळे मलेरिया आणि डेंगी यांसारख्या डासांपासून पसरणाऱ्या रोगांचा जागतिक प्रसारही बदलेल. ब्लूटंग हा लहान कीटकांद्वारे प्रसारित होणारा विषाणू, आशिया आणि आफ्रिकेपेक्षा मध्य आफ्रिका, पश्चिम रशिया आणि अमेरिकामध्ये मेंढ्यांना संक्रमित करण्याची शक्यता जास्त आहे. हवामानातील बदल मेंदूच्या बदलाच्या स्थितीची काही लक्षणेही वाढवत आहे. आपला मेंदू तापमान श्रेणीच्या मर्यादेत उत्तम कार्य करतो. मात्र त्याच्यासाठी तापमानातील थोडीशी वाढदेखील महत्त्वाची असू शकते. हवामानबदलाशी संबंधित अति तापमानाशी मेंदू त्याच्या तापमानाचे नियमन करण्यासाठी संघर्ष करतो तेव्हा काही प्रतिकूल परिणाम दिसतात. हा धोकाही लक्षणीय आहे. निरोगी राहणे हे काय खावे किंवा किती वेळा व्यायाम करता यावर नियंत्रण ठेवण्याइतके सोपे नाही.
कँटरबरी विद्यापीठातील एपिडेमियोलॉजी आणि पर्यावरणीय आरोग्याचे सहयोगी प्राध्यापक अरिंदम बसू म्हणतात, तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत जागतिक आरोग्य संघटनेने दोन सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केल्या आहेत. फेब्रुवारी २०२० मध्ये कोविड आणि जुलै २०२२ मध्ये मंकीपॉक्स. जागतिक तापमान वाढीदरम्यान अधिवासातील बदलांमुळे मानव आणि प्राणी यांच्यातही बदल होतो. शेतीसाठी जंगले नष्ट होत असल्याने तसेच विदेशी प्राण्यांचा व्यापार सुरू असल्याने मानव आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष वाढत आहे. त्याच वेळी, हिमनद्या वितळल्याने बर्फाखाली लपलेले सूक्ष्म जंतू बाहेर पडत आहेत. मानव आणि प्राण्यांच्या संसर्गासारखीच रोगजंतूंची परिसंस्था असल्याने आरोग्याच्या नवीन संकल्पनेची तातडीची गरज आहे. येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेची स्थिती आणखी गंभीर होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. या उन्हाळ्याच्या स्थितीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. भारतात, मे-जून महिन्यांमधील तीव्र उष्णता आणि उष्णतेची लाट आता सामान्य बनत आहे. हवामानबदल आणि जंगलतोडीचा प्रभाव यापेक्षा जास्त कधीच दिसून आला नाही; मात्र वाढती उष्णता आणि उष्णतेच्या लाटेचा सर्वात वाईट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे आता समोर येत आहे. मोठ्या लोकसंख्येला रोजगार देणारे हे अर्थव्यवस्थेचे स्वरूप आहे.
आज देशातील ५० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळेच धोरणकर्त्यांसाठी वाढती उष्णता ही चिंतेची बाब आहे कारण यामुळे केवळ ५० टक्के लोकसंख्येच्या उपजीविकेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही, तर देशाची अन्नसुरक्षाही धोक्यात येते. दुसरी बाब म्हणजे देशातील सुमारे ८३ टक्के कामगार या क्षेत्रात काम करतात. जागतिक नाणेनिधीचा अंदाज आहे की, देशातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक कष्टकऱ्यांना उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे एकूण अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहिल्यास प्रश्नाचे गांभीर्य समोर येते. सध्या देशातील प्रमुख १५० जलाशयांमधील पाण्याची पातळी ३० टक्क्यांहून अधिक खाली गेली आहे. दक्षिण भारतात परिस्थिती अधिक धोकादायक आहे. त्याचा परिणाम बंगळुरूसारख्या मोठ्या शहरातील जलसंकटाच्या रूपात दिसून आला. जलाशयांमध्ये पाणी कमी असल्याने पिण्याचे अपुरे पाणी, सिंचनासाठी कमी पाणी, चाऱ्याची कमी उपलब्धता, बागायती पिकांचे होणारे नुकसान, दूध आणि भाजीपाल्याचे वाढलेले भाव अशा समस्या दिसत आहेत. अलीकडेच रिझर्व्ह बँकेने वार्षिक अहवालात म्हटले की, २०२३-२४ मध्ये अन्नधान्याचे चढे भाव हे महागाई उच्च राहण्याचे सर्वात मोठे कारण आहे. अन्नधान्य महागाई फारशी खाली येण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. याशिवाय कामगारांचे आरोग्य बाधित होत असल्याने पायाभूत सुविधा आणि उद्योग उत्पादनावरही परिणाम बघायला मिळत आहे. त्यामुळेच लोकांचा अनारोग्यापायी होणारा खर्च कमी करायचा असेल, अर्थव्यवस्थेची वाढ राखायची असेल, तर ठोस उपाययोजना गरजेची आहे.