Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीकर्मांच्या नागांची मनधरणी

कर्मांच्या नागांची मनधरणी

ऋतु राज – ऋतुजा केळकर

मी फुलांची वाट स्वप्नी चालते…
चांदण्यांची पैंजणे मी बांधते…’
हे गीत कानावर पडलं आणि जाणवलं गरीब असो किंवा श्रीमंत स्वप्नांवर कुणाचीच मक्तेदारी नसते, पण आपण जी स्वप्नं अहोरात्र पाहतो ना ती खरोखरच प्रत्यक्षात किती येतात, हे अलहिदा.

मला वाटतं अशी ही स्वप्नं… ‘दिवा स्वप्नच’ राहण्यामागे बरीच म्हणजे बरीच कारणं आहेत. पण त्यातील सर्वात महत्त्वाची दोन कारणं म्हणजे ‘प्रारब्ध’ आणि ‘प्राब्धन’ आता तुम्ही म्हणाल प्रारब्ध काय किंवा प्राब्धन काय दोन्हीही सारखंच. नाही तसं नसतं. प्रारब्ध म्हणजे जे सटवाईनं लिहून ठेवलेलं असतं, ते ‘नशीब’ आता अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर ज्यांना हात नसतात ना त्यांच्याही नशिबाच्या रेषा या असतातच की. अर्थातच नशीब हे अवलंबून असतं, ते आपापल्या कर्मांवर आणि ‘प्राब्धन’ म्हणजे त्या कर्माचे फळ किंवा… भोग… त्यामुळे कुठलेही कर्म करताना, त्याचा सारासार तसेच सर्वांगीण विचार करणं अत्यंत अपेक्षित तसेच गरजेचे आहे. आता अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं, तर आपल्या समोर एक भलं थोरले लाल मुंग्यांचं वारूळ येणं, हे आपलं प्रारब्ध आहे, पण त्यावर पाय ठेवून पुढे जाणं हे आपलं कर्म. मग त्या मुंग्यांनी चवताळून आपल्यावर हल्ला करून, आपल्याला दंश केला, तर ते आपलं प्रारब्ध होय. म्हणजेच ते आपण केलेल्या कर्माचं आपल्याला ताबडतोब मिळालेलं फळं होय.

जीवनाच्या संग्रामभूमीवर बरेचदा प्रलयकारी अशा अनेक प्रसंगांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. मग किंकर्तव्य मूढ होऊन, पाठ दाखवून पळपुटेपणाने शस्त्र‌ टाकून पळून जाण्यापेक्षा अजिंक्यपदाची आस धरून प्रतिहल्ला केला, तरच त्या संकटाचे निवारण सहजगत्या होऊ शकते. फक्त त्यासाठी थोडासा संयम अंगी असणे गरजेचे आहे.

प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात हा ‘श्रीकृष्णच’ असतो, कारण आत्मा जरी वेगवेगळा असला तरीही प्रत्येक जण आपल्या ‘सेवा… त्याग तसेच समर्पण…’ या त्रिसूत्री धोरणानुसार स्वतःच्या कर्माची गाठ सैल करून, सर्व ऋणांतून उतराई होण्याचा यत्न करतच असतो. अर्थातच व्यक्ती तितक्या प्रवृत्ती तसेच प्रत्येकाचे त्याकरिता अवलंबलेले मार्ग हे वेगवेगळेच असतात.

तरीही काही जीव हे सर्वात पुढे राहून, यशाच्या रथाच्या दोऱ्या आपल्याच हातात कायमच्या राहिल्या पाहिजेत, या लालसेपायी इतर निरपराध पक्ष्यांची पारध करतात, त्या पक्ष्यांना जर का दाणा-पाणी देऊन जिवंत ठेवलं, तर ती आपल्याच संचिताच्या वृक्षावर‌ विसावतील. मग ते पक्षी… तसेच त्यांच्या पुढील पिढ्या जीवनाचे निर्मिती गीत सुख-दुःखाच्या रंग बदलत्या माळावर झुलत असे. सुखकर गीत गुणगुणलं की, आपल्याच विचारांना नवनवीन दिशा तसेच चालना मिळून आपल्याच कृतीची नौका हाकण्यास आपल्याला मदत होईल, जेणेकरून नादब्रह्माच्या या सुरात आपल्या सत्कर्माचे सूर या सुरेल सुस्वर जीवन गीतात मिसळून जातील. मग स्वतःलाच स्वतःचा शोध नव्याने लागून, या विश्वात आपण भरून राहू, ते साऱ्यांच्या नेकीच्या प्रार्थनेत.

मग काय… आपल्या जीवनाच्या रंगपुष्करणीतील रंगपंचमीने साऱ्यांचेच जीवन रानभुलीतील शिशिर फुंकरीसारखे अलवार होईल, यात संशयच नाही.

म्हणूनच पडवीतल्या कॅकटसप्रमाणे कुणाच्या तरी दयेवर दुर्लक्षित आयुष्य जगायचे की, केवड्याच्या पातीप्रमाणे लखलखीत…? हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. म्हणूनच इच्छातृप्तीच्या तहानेने हाजी हाजी करत, वासनेच्या चिखलात बरबटून वर्षानुवर्ष जगण्यापेक्षा सत्कर्माच्या कोवळ्या किरणांत आपल्या अस्तित्वाचे मळे ऋतू बांधणीकरिता असे फुलवा की, मृत्यूलाही आपली धडकी भरली पाहिजे.

कारण प्रत्येक उगवता सूर्य ही आपल्याला नव्याने मिळालेली एक सुसंधी असते. त्या उज्ज्वल प्रकाशात प्रसंगानुरूप, नेकीने तसेच नेटाने स्वरलतेच्या दुधारी बंदिशीप्रमाणे आपल्या जीवनाचे गोंदणगीत सुरमयी करा.
मग पुढे-मागे आपल्या देहाची आणि आत्म्याची जरी ताटातूट झाली तरी… चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्या चाकरमान्यांच्या मनात आपली छबी कायमची कोरलेली राहील. अखेरीस माझ्याच शब्दांत सांगायचं झालं तर…

“गुलमोहर फुलतो स्मशानी…
त्यास कर्मयोगी …
कुणी संबोधिती ….
स्वप्न कुळातील…
लसलसती केवड्याची …
पाती मात्र …
कर्माच्या नागांची …
मनधरणी करती …”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -