समर्थ कृपा – विलास खानोलकर
अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांच्या कृपा-प्रसादाने भक्तांचे भले होत असे. त्यांची सारी संकटे स्वामी दूर करत. परिसाच्या स्पर्शाने जसे लोखंडाचे सोने होऊन जाते, तसेच त्यांच्या कृपेने नराचा नारायण होत असे. हा अनुभवही भक्तांनी घेतला आहे.
अक्कलकोटपासून काही कोस अंतरावर मैदर्गी नावाचे एक गाव होते. या गावात एक यवन राहत होता. तो श्री स्वामींचा मोठा भक्त होता. धर्माचा विचार बाजूला ठेवून, तो यवन महाराजांची मनापासून भक्ती करायचा. अनेक वेळेला तो अक्कलकोटला श्री स्वामींच्या दर्शनाला जाऊन आला होता. त्याला वेळ मिळताच, तो स्वामींच्या दर्शनासाठी जात असे.
तो यवन एका तुरूंगात जमादार म्हणून नोकरीला होता. आयुष्यभर त्याने प्रामाणिकपणे सेवा केली होती. एकदा त्याच्या तुरूंगात अनेक कैदी दाखल झाले. ते कैदी मोजून, त्यांना तुरूंगात डांबायची जबाबदारी त्या यवनाकडे होती.
तो आपले कर्तव्य चोख बजावत होता. पण त्याची नजर चुकवून एक कैदी फरार झाला. कैदी मोजल्यावर त्याच्या लक्षात ही बाब आली. जबाबदारी त्याच्यावर असल्यामुळे, तो यवन घाबरला. त्याने फरार कैद्याच्या शोधासाठी शिपाई पाठवले; पण काहीही उपयोग झाला नाही.
आपल्या आयुष्यभराच्या सेवेत असा प्रकार घडला नसल्याने आणि नोकरीच्या शेवटी शेवटी हा प्रकार घडल्यामुळे, तो यवन नाराज झाला. त्याच्यावर ठपका तर आलाच असता; पण त्याचे नावही बदनाम झाले असते. याचे त्याला फार वाईट वाटत होते. आता आपल्याला या संकटातून फक्त स्वामीच वाचवू शकतात, हे त्याला पक्के माहीत होते.
त्याने मनापासून श्री स्वामींचा धावा केला. आपल्याला या संकटातून फक्त स्वामीच तारू शकतात, अशी त्या यवनाला खात्री वाटत होती. त्यामुळे तो नित्य स्वामींची प्रार्थना करत असे. कैदी सापडला तर आपण नोकरी सोडून, स्वामी चरणी सेवा करू, असा नवस त्याने मनाशी केला होता.
इकडे तो कैदी फरार झाला. तो रात्रीच्या अंधारात धावत सुटला. धावता धावता त्याला समोर एक भव्य आणि दिव्य आकृती दिसली. हळूहळू तिचा आकार वाढत गेला. कैदी ते बघून घाबरला. समोर पळणे थांबवून, तो बाजूच्या दिशेने धावत सुटला. पण काही अंतरावर गेल्यावर समोर त्याला तीच आकृती आपल्या दिशेने येताना दिसली.
तो ज्या वाटेने धावायचा, त्या वाटेला ती दिव्य आकृती दिसायची! शेवटी तो माघारी धावू लागला आणि नेमका गस्तीवर असणाऱ्या शिपायांच्या हाती सापडला. शिपायांनी त्याला धरून तुरूंगात नेले. कैदी सापडल्याचा आनंद यवन जमादाराला झाला. त्याने मग तिथून महाराजांना वंदन केले, त्यांचे आभार मानले. नवस केल्याप्रमाणे मग त्याने नोकरी सोडली आणि तो घरदार सोडून श्री स्वामींच्या सेवेत दाखल झाला. त्याने मनोभावे महाराजांची सेवा सुरू केली. तो आल्यामुळे स्वामींना सुद्धा आनंद झाला होता. स्वामींच्या सेवेत एक यवन जमादार आल्याचे बघून, अन्य सेवेकऱ्यांना ते अजिबात आवडले नाही. त्यांच्यात नाराजी पसरली. काही दिवस चांगले गेले; पण नंतर धुसफूस वाढली. सेवेकरी नाना प्रकारे जमादाराला त्रास देऊ लागले.
महाराजांच्या लक्षात ती गोष्ट आली. एके दिवशी त्यांनी यवन जमादाराला आपल्या जवळ बोलावले. त्यांनी आपल्या खडावा त्याला दिल्या आणि सांगितले, ‘तू माझी मनापासून सेवा केलीस. मी प्रसन्न आहे! मी तुला माझ्या खडावा देतो. त्या घेऊन तू तुझ्या गावी जा. खडावांची पूजा करीत जा. त्यातच तुझे कल्याण आहे!’
श्री स्वामींची आज्ञा मानून, तो जमादार मैदर्गीला परत आला. घरात त्याने खडावांची स्थापना करून, पूजा-अर्चा सुरू केली. हिंदू साधूची भक्ती करतो म्हणून घरच्यांनी त्याला विरोध केला. तेव्हा कंटाळून त्याने घर सोडले आणि गावाबाहेर एक झोपडी बांधून त्यात राहून, श्री स्वामींच्या पादुकांची सेवा करू लागला.
काही दिवसांतच ही वार्ता बघता बघता गावात पोहोचली. मग लोक स्वामींच्या खडावांच्या दर्शनाला येऊ लागले. तेथूनच आपले दुःख दूर करण्याची प्रार्थना करू लागले. गावकऱ्यांची दुःखे दूर होऊ लागली. मनोकामना पूर्ण होऊ लागल्या. तशी गर्दी वाढतच गेली.
जमादाराच्या घरी हे समजताच, ते खजिल झाले. त्यांनी सन्मानाने जमादाराला घरी आणले. श्रद्धेने खडावा घरात स्थापन केल्या. तेथेही स्वामींनी सर्वांवर कृपा केली. भक्तांचा मेळा जमू लागला. श्री स्वामींनी मग जमादाराला ‘पीरसाहेब’ ही पदवी दिली.
सुखी जीवनासाठी श्री स्वामी समर्थांची नित्यआरती
जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था।
आरती ओवाळू चरणी, ठेवुनियां माथा।
छेलीखेडे ग्रामीं तू अवतरलासी।
जगदोद्धारासाठी राया तूं फिरसी ।।
भक्तवत्सल खरा तूं एक होसी।
म्हणुनि शरण आलो तुझ्या चरणांसी।।१।।
त्रैगुण परब्रम्ह तुझा अवतार।
त्याची काय वर्ण लीला पामर।
शेषादिक शिणले नलगे त्यां पार।
तेथे जगमूढकैसा करूं मी विस्तार ।।२।।
देवाधिदेव तूं स्वामीराया ।
निर्जर मुनिजन ध्याती भावें तव पायां ।
तुजसी अर्पण केली आपुली ही काया ।।
शरणागता तारी
तूं स्वामीराया ।।३ ।।
अघटीत लीला करुनी जगमूढउद्घारिले ।
किर्ती ऐकूनि
कानीं चरणी मी लोळे ।
चरण-प्रसाद
मोठा मज हें अनुभवलें ।
स्वामीसूता नलगे
चरणावेगळे ।।४।।