भुवनेश्वर : आदिवासी नेते मोहन चरण माझी यांनी बुधवारी प्रसिद्ध जनता मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे अनेक मंत्री आणि भाजपशासित नऊ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओडिशाचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा अध्यक्ष नवीन पटनायक हे देखील यावेळी उपस्थित होते.
ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास यांनी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, आठ कॅबिनेट मंत्री आणि पाच राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
हा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून एक लाखाहून अधिक लोक जनता मैदानावर जमले होते.
यावेळी कनक वर्धन सिंग देव आणि प्रवती परिदा या दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली.
सुरेश पुजारी, रबी नारायण नायक, नित्यानंद गोंड, कृष्ण चंद्र पात्रा, पृथ्वीराज हरिचंदन, डॉ मुकेश महालिंग, बिभूती भूषण जेना, डॉ कृष्ण चंद्र महापात्रा या कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली.
यावेळी पाच राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. गणेश राम सिंगखुंटिया, सूर्यवंशी सूरज, प्रदीप बाळा सामंत, गोकुळानंद मल्लिक आणि संपद चंद्र स्वेन अशी त्यांची नावे आहेत.
नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बीजेडी सरकारच्या २४ वर्षांच्या राजवटीचा भंग करून २०२४ च्या निवडणुकीत एकूण १४७ विधानसभा जागांपैकी ७८ जागा भाजपाने जिंकल्या.
त्यानंतर तीन अपक्ष आमदारांनीही भाजपामध्ये प्रवेश केल्याने विधानसभेत पक्षाचे एकूण संख्याबळ ८१ वर पोहोचले.
ओडिशाच्या राजकीय इतिहासात भाजपाचे हे पहिले सरकार आहे. यापूर्वी २००० आणि २००४ च्या निवडणुकीत सलग दोन वेळा बीजेडी-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले होते.
मात्र बीजेडीने २००९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपसोबत युती तोडली आणि तेव्हापासून बीजेडी २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुका पूर्ण बहुमताने जिंकून राज्य करत होते.