Share

कथा – रमेश तांबे

मराठवाड्यातल्या प्रसन्नपूर या गावात धोंडू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. एक छोटासा जमिनीचा तुकडा, दोन बैल, एक झोपडं, बायको आणि दोन मुलं, असा छोटासा संसार होता धोंडूचा. त्याची बायको दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करायची. धोंडू बैल घेऊन दुसऱ्याच्या शेतात कामासाठी जायचा. कधी वेळ मिळाला, तर स्वतःच्या शेतातदेखील तो मेहनत करून, चार पैसे कमवत होता.

एके दिवशी धोंडू गावातल्या चावडीवर गेला होता. तिथे काही गावकरी पेपर वाचत होते. धोंडूला पाहताच, त्यातला एक जण म्हणाला की, “काय धोंडूभाऊ बैलांच्या झुंजीत भाग घेणार का? तब्बल पाच लाख रुपयांचं बक्षीस आहे बरं, पाच लाखांचे बक्षीस!” हे शब्द ऐकताचेे धोंडू चमकला. पुढच्या आठवड्यात गावात होणाऱ्या बैलांच्या झुंजीत आपण भाग घ्यायचा का? त्याचं मन त्याला विचारू लागलं. जिंकलो तर आयुष्याची कमाई. एकदम पाच लाख रुपये!

धोंडू गावातली कामं आटोपून घरी आला अन् तडक गोठ्यात गेला. त्याने बैलांच्या अंगावरून मायेने हात फिरवला. धन्याचा हात पाठीवर फिरताच, त्या इमानदार बैलांनी आपली पाठ थरथरवून आनंदाने मान हलवली. धोंडू विचार करू लागला. काय करूया, कोणाला झुंजीला उतरवूया. दोन्ही खिलारी बैल दृष्ट लागण्यासारखे होते. उंच, तगडे, पांढरे शुभ्र, मोठ्या शिंगाचे! थोडा वेळ विचार करून, धोंडूने मनाशी ठरवले, आपल्या ‘सरदार’ या रुबाबदार बैलाला झुंजेत उतरवायचे.

धोंडू घरात आला आणि बायकोला म्हणाला की, “अगं लक्ष्मी बैलांच्या झुंजी होणार आहेत गावात. मी ठरवलंय भाग घ्यायचा आणि पाच लाखांचं बक्षीस आहे. जिंकलो तर आपल्या आयुष्याचा प्रश्न मिटेल.” “नाही जिंकलो, तर आपल्या सरदारचं काही बरं-वाईट झालं तर!” लक्ष्मी म्हणाली. “अगं नको वाईट बोलूस, जरा चांगलं बोल की” धोंडू बायकोवर खेकसला. त्यानंतर रात्रभर धोंडूला झोप लागली नाही. रात्रभर एकच विचार… पाच लाख मिळाले तर आणि सरदार गमावला तर! चार-पाच दिवस भरभर गेले आणि स्पर्धेचा दिवस उजाडला. परिस्थितीशी झुंज देणाऱ्या धोंडूने आपला बैल झुंजीत उतरवला होता. त्यासाठी तो बैलांसह स्पर्धेच्या ठिकाणी हजर झाला.

मैदान गर्दीने फुलून गेले होते. बैलांच्या झुंजी सुरू झाल्या होत्या. धोंडूच्या आधी दोन झुंजी झाल्या; पण त्या बक्षिसास पात्र ठरल्या नव्हत्या. आता धोंडूचा नंबर होता. तो आपल्या आवडत्या ‘सरदार’ला आखाड्यात घेऊन गेला. त्याच्या समोरदेखील एक उंचापुरा बैल उभा होता. त्याचे लालभडक डोळे धोंडूच्या छातीत धस्स करून गेले. शिट्टीचा आवाज होताच, त्याने बैलाचा कासरा सोडला अन् बैलाला मोकळे केले. मग दोन्ही बैल एकमेकांना भिडले. कधी धोंडूचा सरदार समोरच्या बैलाला पुढे रेटत होता, तर कधी समोरचा बैल सरदारला मागे रेटायचा! शिंगांचा खडखडाट होत होता. पाच मिनिटे यातच गेली; पण पुढे जे घडले, ते पाहून धोंडूने कपाळालाच हात लावला. त्याचं असं झालं, रेटारेटीत पाय अडकून, धोंडूचा सरदार खाली पडला. सरदार पडताच धोंडू पुढे धावला; पण तोपर्यंत प्रतिस्पर्धी बैलाने त्याच्या पोटात अणकुचीदार शिंग खुपसले आणि रक्ताची एक जोरदार चिळकांडी उडाली अन् सरदार रक्ताच्या थारोळ्यात पडला. लोकांनी पुढे येऊन, प्रतिस्पर्धी बैलाला बाजूला केलं. धोंडू आपल्या उपरण्याने सरदारचे रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत होता; पण पाचच मिनिटांत सरदारने डोळे मिटले आणि धोंडू धायमोकलून रडू लागला.

त्याच मैदानात आपल्या आवडत्या बैलाचं क्रियाकर्म करून अत्यंत निराश आणि दुःखी अंतःकरणाने तो घरी परतला. घरात शिरताच त्याची बायको लक्ष्मी धावत त्याच्याकडे आली आणि म्हणाली, “काय हो! काय झालं? झाली का झुंज? कोण जिंकलं आणि आपला सरदार कुठे आहे?” लक्ष्मीच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू असतानाच, धोंडू लहान मुलासारखा रडू लागला आणि म्हणाला की, “लक्ष्मी आपला सरदार गेला गं! त्याच्या पोटात शिंग घुसले आणि तिथेच तो पडला!” लक्ष्मी संतापाने फणफणत म्हणाली, “पैशाच्या मोहापायी बैल गमावला. आता मरा उपाशी सगळ्यांनी!” लक्ष्मीचा जिभेचा पट्टा सुरू झाला. मग धोंडू घरातून निघाला अन् बैलाच्या गोठ्यात जाऊन बसला. किती तरी वेळ तो समोरच्या एकट्या बैलाकडे बघत, आपल्या आवडत्या सरदाराच्या आठवणीने रडत राहिला. तिकडे सरदार मैदानातली झुंज हरला होता आणि इकडे धोंडू जीवनातली!

Recent Posts

Mahesh Babu : तेलुगू सुपरस्टार महेश बाबूला मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून समन्स

हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…

5 minutes ago

Earth Day : पृथ्वीचे वाढते तापमान पर्यावरणासाठी ठरतेय धोक्याची घंटा!

वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…

29 minutes ago

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

1 hour ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

3 hours ago