Friday, May 9, 2025

रिलॅक्ससाप्ताहिक

शुगरकोटेड समुपदेशन अर्थात नकळंत सारे घडले...!

शुगरकोटेड समुपदेशन अर्थात नकळंत सारे घडले...!

भालचंद्र कुबल - पाचवा वेद


मी जेव्हा पहिल्यांदा हे नाटक पाहिलं तेव्हा जगातले सर्वात मूर्ख, बिनडोक आणि फालतू आईबाप माझ्या वाट्याला आले आहेत, असं वाटण्याचं ते वय होतं. तेव्हा आयुष्यात जर काही काँक्रीट करायचे असेल, तर मला माझ्याशिवाय पर्याय नाही, यादेखील विचारांचं ते वय होतं. स्वतःच्या आयुष्याची आणि करिअरची गाडी ताशी दोनशे किलोमीटर वेगाने मीच चालवू शकतो, अशा फाजिल आत्मविश्वासाचं ते वय होतं. पहिल्या अंकातील राहुल माझे प्रतिनिधित्व करत होता आणि बटूमामा माझ्या वडिलांचे. छोट्या छोट्या कारणांवरून घरात आदळआपट होत असे. आवाज चढत असत. आज ते सर्व आठवण्याचं कारण होतं ‘नकळंत सारे घडले’ हे नाटक.


माझ्या बघण्यात आलेली या नाटकाची ही तिसरी आवृत्ती. दुसऱ्यांदा पाहिलं ते कोविड काळात युट्यूबवर. ते नाटक म्हणजे एक नासका आंबा पूर्ण पेटीची वाट लावतो, त्या प्रकारात मोडते, त्यामुळे त्याबद्दल न बोललेलंच बरं...! (वाचकांनी जमल्यास नासका आंबा शोधावा, असो.) तर.. या नाटकाच्या पहिल्या आवृत्तीने तसे काही विशेष परिणाम वगैरे साधले होते, असं काही माझ्या बाबतीत झालं नव्हतं, परंतु हल्लीच पाहिलेल्या या तिसऱ्या आवृत्तीने मात्र जे मला वाटलं, त्याचे हे निरीक्षण म्हणायला हरकत नाही.


एम. बी. ए. करायचं सोडून भौतिक सुखाच्या कल्पनेने चित्रपटात करिअर करायच्या वेडाने पछाडलेल्या एका तरुणाला पुन्हा मार्गावर आणून सोडण्याची ही कथा. व्यावसायिक नाटकाला अभिप्रेत असलेले सारे घटक यात इतके चपखलपणे बसवलेत की, त्यात गुंतवून ठेवणारी ही कथा... आणि मुख्यत्वे आधीच्या आवृत्तीतील रेखाटलेला अभिनयाचा फळा पुसून टाकून, त्यावर नव्याने नकळत, तिच नाट्याकृती ताजी वाटावी इतपत रेखाटावी, अशी ही कथा.


(कसै ना...!) आपण ज्यावेळी एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा पाहतो, त्यावेळी “हे असं का?” अशा प्रश्नांचा बागुलबुवा आपल्याला सतत छळत रहातो. आपण त्याचा कार्यकारणभाव शोधण्याचा चिक्कार आणि बेक्कार प्रयत्न करतो, पण तो सापडतचं नाही. पण मग मी तरी जमेल तसं इथे विचारतोच (म्हणजे या लेखाद्वारे). त्याचं झालं असं की, नाटक बघून घरी जाता जाता मला साक्षात्कार झाल्यासारखं हे नाटक जे पूर्वी बटूमामा नामक पात्राचं वाटायचं, ते अचानक मीरान्नी या कॅरेक्टरचं कसं वाटू लागलं? ती भूमिका साकारणाऱ्या श्वेता पेंडसे या स्वाती चिटणीसांपेक्षा अ‍ॅग्रेसिव्ह वाटल्या का? तर नाही...! मग आताचं हे नाटक काऊंन्सिलरचं का वाटतंय? तर... त्या कॅरेक्टरचं आताच्या आवृत्तीतील पोझिशनिंग...! विक्रम गोखल्यांचा बटूमामा उर्वरित तीन पात्रांकडे बघूच द्यायचा नाही. पण आनंद इंगळे तसं करताना दिसले नाहीत. मग विचार येतो की, ही समज नटांची की दिग्दर्शकाची? वर म्हटलंय ना, प्रश्नांचा बागुलबुवा छळू लागतो...तो हा...!


मुळात लेखकाने नाटक बघण्याचा अॅगल ‘मनोविश्लेषणात्मक’ अंशात सेट करून ठेवला आहे आणि जस जसं कथानकावर मीरान्नी या पात्राची पकड घट्ट होत जाते, तस तसं ते अधिक इमोशनल होत जातं. त्यामुळे चालू नाटकात प्रेक्षकांनी खिशातून रुमाल काढले की समजायचे, फाॅर्म्युला हिट्ट आहे. मग पुन्हा पूर्वपदावर येत प्रश्न पडतो की, लेखकाने मीरान्नीला इतकी मुळमुळीत आणि सहज ‘एंट्री’ का दिली ? म्हणजे राहुल फोनवर दुबईतल्या आईशी बोलतोय आणि मोनिका सोबत मीरान्नी प्रवेश करते. राहुल आणि मोनिकाचा बचपनका याराना आहे, हे त्या फोनवरील संभाषणामुळे जरी कळत असलं, तरी मीरान्नीचा इंट्रो त्यातच घुसडावा? आणि त्या दोघी राहुलचं बोलणं आता संपेल, मग संपेल करत मुकाभिनयाचा पिट्ट्या पाडत, दीड पायावर उभ्या राहत ब्लाॅक होतात. त्याऐवजी मोनिका-राहुल संभाषणानंतर मीरान्नीची एण्ट्री अधिक अंडरलाईन्ड वाटली नसती का? कारण (कसै ना..) मीरान्नी हे पात्र बटूमामाच्या पंक्तीत बसवायचं, तर त्यावरील दिग्दर्शकीय संस्कार आरंभापासून घडायला हवेत. तिच गोष्ट बटूमामाची. मध्येच त्यांचा पाॅज विरहित विक्रम गोखले होतो. बरं ही जाणीव त्यांना होते देखील आणि ते पुन्हा आनंद इंगळे होतात. अर्थात ही गंमत दुसराच प्रयोग असल्यामुळे अनुभवता आली. तशीच एक गोष्ट मात्र मान्य करावी लागेल की, बऱ्याच दिवसांनी वेल-रिहर्सड् प्रयोग बघायला मिळाला. हल्लीच्या ट्रेंडनुसार पहिले दहा प्रयोग पेड रिहर्सल्स असतात. कच्च्या पाठांतरामुळे पाट्या टाकणे, ढेल्या वाटणे, फंबल्स, चुकीच्या मुव्हमेंट्स, अवाजवी अॅडिशन्स या हमखास किमान पहिल्या पाच प्रयोगात आमच्या नजरेतून न सुटणाऱ्या गोष्टी. परंतु नटसंचाकडून दुसऱ्याच प्रयोगात प्रचंड सफाई दिसून आली. प्रशांत केणी आणि तनिषा वर्दे या दोघांच हे पहिलेचं व्यावसायिक नाटक. परंतु मंचावरील दोघांचाही वावर अत्यंत सहज आहे.


प्रशांत या अगोदर अनेक स्पर्धांमधून गाजलेल्या उकळी एकांकिकेत दिग्दर्शक म्हणून दिसला होता, इथे नकळंत अभिनेता म्हणून दिसला. नाटकात आवर्जून उल्लेख करावी अशी बाब म्हणजे मंगल केंकरे यांची वेशभूषा. मीरान्नी, राहुल आणि मोनिका यांच्या कपड्यांची रंगसंगती विजातीय असल्याचे लक्षात येईल. विशेष उल्लेख करावा अशी मीरान्नीच्या कपड्यांची रंगसंगती. फ्लॅटच्या रंगामुळे तिच्या कपड्यांच्या रंगाचा काँट्रास्ट ते कॅरेक्टर पुढे आणतं. कारण पूर्ण फ्लॅट बटूमामाने रामदासी हिंदू ब्राह्मण असूनही हिरव्या रंगात का बरं रंगवून घेतला असेल? नाव बटू असूनही त्याने शेंडी-जानव्याचे ब्राह्मण्य त्यागले तर नसेल ना? (कसै ना..) नवविचारांनी प्रेरित झालेल्या पात्रांना लेखक तसं वागायला भाग पाडत असतात म्हणून मग असल्या शुल्लक का असेना, प्रश्नांचे बागुलबुवा मागे लागतात. असो...!


अजून दोन जणांचा या नाटकाच्या निर्मितीत उल्लेख करणं फार महत्त्वाचं आहे, ते म्हणजे या नाटकाचे निर्माते. सद्याच्या दोलायमान व्यावसायिक अवस्थेत कुठले नाटक निवडावे, जे प्रेक्षकांना आपलेसे वाटेल, याची जाण राहुल पेठे आणि नितीन भालचंद्र नाईक यांना पुरेपुर असल्याचे जाणवते. कमी पात्रसंचात अचूक लक्ष्य साधलेला, हा वेध आहे. कित्येक दिवसांनी लेखक शेखर ढवळीकर यांच्या वाक्यांना मिळणारी वाहवा नाटकाचे सामर्थ्य दर्शवणारी आहे. एका प्रसंगी मीरा म्हणते, लहानपणी आपल्या पालकांइतके शक्तिमान पालक जगात कोणाचेच नसतील, असंच मुलाना वाटत असतं. ते वयच तसं असतं. पण आणखीही एक वय असतं. कोणत्याही पूर्वसूरींची पुण्याई न मानण्याचे वय. या वयात आपल्या पालकांइतके वेडे पालक जगात कोणालाही लाभले नसतील, असंच मुलांना वाटतं. बहुतांशी वेळा या प्रतिक्रिया टोकाच्या असल्या, तरी क्वचित प्रसंगी त्या सत्यही असू शकतात.” हेच पालकवर्गाने आपल्या पाल्यांना दाखवणे आजमितीला गरजेचे आहे.

Comments
Add Comment