Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Powai news : पवईतील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेले पालिकेचे पथक आणि पोलिसांवर दगडफेक!

Powai news : पवईतील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेले पालिकेचे पथक आणि पोलिसांवर दगडफेक!

स्थानिक नागरिकांचा प्रचंड रोष; पाच ते सहा पोलीस गंभीर जखमी

मुंबई : पवई (Powai) शहराची ओळख उच्चभ्रू परिसर म्हणून असली तरी, पवई ही अर्ध्याअधिक झोपडपट्टी, चाळकऱ्यांची वस्ती आहे. जयभीम नगर (Jay bhim nagar) हीदेखील पवईतील एक झोपडपट्टीवासियांची (Slums) वस्ती आहे. ही जागा शासकीय वसाहतीसाठी राखीव असल्याने पालिकेने अनेकदा याठिकाणी अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवेळी हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यानंतर आज पुन्हा अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पथकावर आणि पोलिसांवर (Mumbai Police) तुफान दगडफेक (Stone pelting) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. या दगडफेकीत पाच ते सहा पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.

जय भीमनगर हा झोपडपट्टीचा परिसर आहे. येथील काही झोपड्या पाडण्यात आल्या होत्या. मात्र, स्थानिकांच्या जमावाने वस्तीच्या तोंडाशी उभे राहून वाट अडवून धरली. त्यानंतर या जमावाने पालिका अधिकाऱ्याच्या दिशेने दगडांचा तुफान मारा केला. यावेळी केवळ मुंबई पोलीस दलातील जवान प्रोटेक्शन शील्ड घेऊन उभे राहिल्यामुळे पालिका अधिकारी थोडक्यात बचावले. मात्र, या तुफान दगडफेकीत पाच ते सहा पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.

२००५ साली पवईतील जयभीमनगर परिसरात कामगारांना तात्पुरता ट्रान्झिस्ट कॅम्प तयार करण्याची परवानगी देण्यात आली होती. नंतरच्या काळात याठिकाणी झोपड्यांची मोठी वसाहत निर्माण झाली. ही जागा शासकीय वसाहतीसाठी राखीव असल्याने पालिकेने अनेकदा याठिकाणी अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते असफल झाले. दोन महिन्यांपूर्वी या झोपडपट्टी भागात आगीची घटना घडली होती. त्यानंतर या ठिकाणच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना मुंबई महापालिकेकडून जागा खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आज कारवाईसाठी अधिकारी आले असताना अधिकाऱ्यांवर जमावाने दगडफेक केली. रहिवासी आक्रमक झाल्यानंतर तात्काळ मुंबई महापालिकेने कारवाई थांबवली.

झोपडपट्टीवासियांचं झोपडपट्टी वाचविण्यासाठी आवाहन

पवईतील जयभीम नगर येथील सुमारे ८०० झोपड्यांना मुंबई महानगरपालिकेने बेकायदेशीर ठरवत त्यांना ४८८ अंतर्गत निष्कासनाची नोटीस बजावली आहे. यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या दलित- गरीब व शोषित घटकांना बेघर करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे, असा आरोप या झोपडपट्टीवासियांनी केला आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रकात पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांवर दडपशाहीचा आरोप करण्यात आला आहे. तसेच झोपडपट्टीच्या अस्तित्वाच्या संघर्षात येथील स्थानिक नागरिकांना झोपडपट्टीवासियांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment