अवघ्या देशाचेच नाही, तर साऱ्या जगाचेच लक्ष भारतात झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. भाजपा व मित्र पक्षाचे सरकार येणार, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार अथवा इंडिया आघाडीचे सरकार येणार, भाजपा सत्तेवरून पायउतार होणार, याचीच चर्चा देशाच्या कानाकोपऱ्यातच नव्हे, तर अवघ्या जगभर सुरू आहे. आता अवघ्या काही तासांनी लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात होईल आणि मतमोजणी सुरू झाल्यानंतर देशाचा कारभार कोणी चालवायचा, याचा देशवासीयांनी घेतलेला निर्णय स्पष्ट होईल. एक्झिट पोलवाल्यांनी देशात पुन्हा भाजपा व मित्र पक्षांचे सरकार सत्तेवर येणार असून, मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सर्वच वृत्तवाहिन्यांनी तसेच खासगी संस्थांनी, वृत्तपत्रांनी निवडणूक निकालाबाबत एक्झिट पोलचे अंदाज व्यक्त करताना, एनडीएच्या जागांबाबत थोड्या फार फरकाने कमी-जास्त आकडे सांगितले असले, तरी येणार तर ‘मोदी सरकारच’ असे संकेत स्पष्टपणे दिले आहेत. कोणत्याही शुभ कार्यासाठी घराबाहेर पडताना, मांजर आडवे गेल्यास आपण अशुभ मानतो; पण त्याचवेळी गोमातेचे मुखदर्शन झाल्यास, आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ मानले जाते. तसेच लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच एक्झिट पोलच्या माध्यमातून मिळालेल्या संकेतातून भाजपा व मित्र पक्षांचा नक्कीच उत्साह दुणावला असणार; पण त्याहून भाजपासाठी समाधानाची व उत्साहाची बाब म्हणजे लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दोन दिवस आधी रविवारी पार पडलेल्या, अरुणाचल प्रदेश विधानसभा निकालामध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवित, सलग तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशाची सत्ता संपादन केली आहे.
अरूणाचल प्रदेशात पुन्हा भाजपाची सत्ता आल्याने भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते मंडळी जल्लोष करू लागली आहेत आणि ‘अरूणाचल प्रदेश झाकी, अभी तो लोकसभा निकाल बाकी है’ अशा राणा भीमदेवी थाटात घोषणाही करू लागली आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यात भाजपाबरोबर सत्तेत असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही अरूणाचल प्रदेशामध्ये आपले खाते उघडले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अरूणाचल प्रदेशमध्ये एंट्री झाली आहे. अरूणाचल प्रदेशमध्ये विधानसभेत अजित पवारांचे ३ उमेदवार विजयी झाले आहेत. टोको तातूंग, लिखा सोनी आणि निख कमिन हे उमेदवार विजयी झाले आहेत. अजित पवार गटाकडून एकूण १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. २ उमेदवारांचा थोडक्यात पराभव झाला आहे, तर ३ उमेदवार जिंकून आले आहेत.
अरूणाचल प्रदेशात विधानसभेच्या ६० जागांपैकी ४६ जागांवर भाजपाने दणदणीत विजय मिळविल्याने, तेथील जनाधार स्पष्ट झाला आहे. या राज्यात भाजपाची यापूर्वी १० वर्षे सत्ता होती. पुन्हा तिसऱ्यांदा तेथील जनतेने भाजपाला राज्याची सत्ता सोपविली आहे. याचाच अर्थ भाजपाने तेथील स्थानिक जनतेचा विश्वास जिंकला आहे. या राज्याची वर्षानुवर्षे काँग्रेसने सत्ता उपभोगली होती; पण काँग्रेसला निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारच मिळत नव्हते. मागच्या वेळपेक्षा भाजपाला काही जागा अधिक मिळाल्या आहेत. मात्र दुसरीकडे अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक वर्षे सत्ता असणाऱ्या काँग्रेसची यावेळी बिकट अवस्था झाली असून, पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. एवढेच नाही तर काँग्रेसला ४१ जागांवर निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारच मिळाले नाहीत. २०१९ मध्ये काँग्रेसने अरुणाचल प्रदेशमध्ये ४ जागांवर विजय मिळवला होता. मात्र यावेळी काँग्रेसला राज्यातील ६० पैकी केवळ १९ जागांवरच निवडणूक लढवता आली.
अनेक काँग्रेस नेत्यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या आखाड्यातून पळ काढला. अनेक जण भाजपामध्ये गेले. काँग्रेसने अरुणाचल प्रदेशमधील निवडणुकीसाठी ३५ उमेदवारांची यादी तयार केली होती. मात्र या मधील १० जणांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. उर्वरित उमेदवारांपैकी ५ जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली. कानुबारी लोकसभा मतदारसंघातील सोम्फा वांगसा यांनी उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर उमेदवारी मागे घेत, भाजपामध्ये प्रवेश केला. दरम्यान भाजपासोबत कथितपणे हातमिळवणी केल्याच्या आरोपामुळे काँग्रेसने अनेक नेत्यांना पक्षातून बाहेरची वाट दाखवली. यामधील ९ जणांची उमेदवारी निश्चित करण्यात आली होती. मात्र त्यांनी निवडणूक लढवली नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाला अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणूक निकालाचे टॉनिक मिळाले आहे. आता अवघ्या काही तासांनी अठराव्या लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात होणार असली, तरी ‘आयेगा तो भाजपाही’, ‘अब की बार फिर मोदी सरकार’ अशा घोषणा आतापासूनच देण्यास सुरुवात झाली आहे.
गुजरात, उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांत भाजपाला एकतर्फी यश मिळून, या विविध राज्यांतून निवडून येणारे खासदारच भाजपाला सत्तासंपादन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. अरुणाचल प्रदेशातून सुरू झालेल्या विजयी जल्लोषामुळे भाजपाच्या देशभरातील छावणीत कमालीचा आनंद व्यक्त केला जात आहे. लोकसभा निवडणूक निकालाला अजून काही कालावधी असला, तरी भाजपाच्या उत्साही मंडळींनी गुलाल, फटाक्यांची आतापासूनच जय्यत तयारी केली आहे. अनेक ठिकाणी मिठाई, लाडू यांची ऑर्डरही देण्यात आली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आपलाच उमेदवार विजयी होणार, याची शक्यता गृहीत धरून, प्रिंटिंगवाल्यांकडून बॅनरही बनवून घेतले आहेत. केंद्रात भाजपा पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज असला, तरी महाराष्ट्रात मात्र महाआघाडी आणि महायुतीमध्ये अटीतटीची झुंज आहे. आता निवडणुकांच्या निकालांची उत्सुकता असल्याने महाआघाडी व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी निकालावर पैजाही लावल्याचे ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहेत. अनेक ठिकाणी प्रतिष्ठेच्या लढती असल्याने, समर्थकांनी आपल्या नेत्यांच्या विजयासाठी देवालाही साकडे घातल्याचे, अनेक मतदारसंघामध्ये पाहावयास मिळत आहे.