विशेष – भालचंद्र ठोंबरे
भीष्मपितामह हे महाभारताचे एक प्रमुख पात्र आहे. पितामह भीष्माशिवाय महाभारत अपूर्ण आहे. पितामह भीष्माचे मूळ नाव देवव्रत होते. देवव्रत हे गंगा आणि हस्तिनापूरचे महाराज शंतनू यांचे पुत्र होते. देवव्रताचे भीष्म कसे झाले, याची एक कथा आहे.
हिंदुशास्त्राप्रमाणे ३३ कोटी देवता आहेत. कोटी म्हणजे प्रकार. म्हणजे ३३ प्रकारच्या देवता आहेत. त्यात आठ वसू; अकरा रूद्र; बारा आदित्य; एक इंद्र व एक प्रजापती आहेत. हे आठ वसू देव, इंद्र व विष्णूंचे रक्षक देव मानले जातात. यांचा जन्म दक्षाची कन्या वसू व धर्म यांच्या पोटी झाला. वेद पुराणात यांची वेगवेगळी नावे आहेत. स्कंद, विष्णू व हरिवंश पुराणानुसार वसूंची नावे आप, ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्युष आणि प्रभास अशी आहेत, तर महाभारतानुसार त्यांची नावे धर्म, अनू, सूर्य, चंद्र, पुष्य, अर्ची, अंजन आणि ध्रुव अशी आहेत.
त्याकाळी देवांचे पृथ्वीवर ये-जा होत असे. एकदा आठही वसू आपल्या पत्नीसह पृथ्वीवर फिरत होते. ते वशिष्ठ ऋषींच्या आश्रमाजवळ आले असता, आश्रमात असलेल्या नंदिनी नामक गाईला पाहून, वसूंपैकी सर्वात लहान असलेल्या ध्रुव याच्या पत्नीला आश्रमातील नंदिनी नामक गाय आवडली. त्यांनी त्या गाईसाठी हट्ट केला. त्यामुळे ध्रुवने त्या नंदिनी गाईचे अपहरण केले. वशिष्ठ ॠषी आल्यावर, त्यांना हे कळतात, त्यांनी “हे कृत्य मनुष्यासारखे आहे, त्यामुळे तुम्ही आता मनुष्य होऊन पृथ्वीवर राहाल” असा शाप दिला. हे कळतात, सर्व वसूंनी वशिष्ठांची क्षमा मागितली. तेव्हा वशिष्ठांनी धृव वगळता सात वसूंना उ:शाप देऊन सांगितले की, “ तुम्ही जन्मानंतर काही वेळातच मुक्त व्हाल; परंतु आठवा वसू ध्रुव ज्याने आपल्या पत्नीच्या सल्ल्यावरून नंदिनीचे अपहरण केले, त्याला मात्र या कृत्याबद्दल पृथ्वीवर जीवन व्यतीत करून कष्ट सहन करावे लागतील.” त्याचप्रमाणे त्याने पत्नीच्या सल्ल्याने हे कृत्य केल्यामुळे, त्याला पृथ्वीवर पत्नी सुखही मिळणार नाही; तसेच त्याची वंशवृद्धीही होणार नाही.” असा शाप ध्रुवला दिला. यानंतर वसूंनी गंगेला पृथ्वीवर आपली माता होऊन आम्हाला मुक्ती दे, अशी विनंती केली व गंगेने ती मान्य केली.
एके दिवशी राजा प्रतिप (शंतनूचे पिता) नदीतीरावर तपश्चर्या करीत असताना, गंगेने त्यांना पाहताच, ती त्यांच्याकडे मोहित होऊन, त्यांच्या उजव्या मांडीवर जाऊन बसली. राजा प्रतिप यांच्याशी विवाहाची इच्छा प्रदर्शित केली. तेव्हा प्रतिप महाराज म्हणाले, उजव्या मांडीवर सुनेचा आणि मुलीचा अधिकार असतो व पत्नी ही अर्धांगिनी असल्याने, तिचे स्थान डाव्या मांडीवर असते, तू उजव्या मांडीवर बसली आहेस म्हणून तू माझ्या सुनेसमान आहेस, तेव्हा सून म्हणून मी तुझा स्वीकार करेन. कालांतराने गंगेचा विवाह शंतनूशी झाला. मात्र विवाह करताना, “तुम्हाला माझे ऐकावे लागेल व माझ्या कोणत्याही कृत्यासाठी मला थांबवू नये, अथवा जाबही विचारू नये. असे केल्यास मी त्याचक्षणी निघून जाईल.” अशी अट तिने शंतनूला घातली. शंतनूने हे सर्व मान्य केले आणि शंतनू व गंगेचा विवाह झाला. कालांतराने तिला पुत्र झाला. या पुत्राला तिने गंगेत विसर्जित केले. शंतनूला हे पाहून धक्का बसला व दु:खही झाले. अशा प्रकारे एका मागून एक करत, सात मुलांना तिने गंगेत सोडून दिले.(सात वसूंना मुक्त केले) परंतु आठव्या पुत्राच्या वेळेस सातही पुत्रांच्या निधनाने व्यथित झालेल्या शंतनूने तिला रोखण्याचे व जाब विचारण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्याने तू हे असे का करीत आहेस? असे विचारताच, गंगेने तुम्ही वचन भंग केल्यामुळे, मी आता निघून जात आहे. मात्र लहान बाळाला सोबत नेत आहे व त्याचे संगोपन करून योग्य वेळी त्याला तुम्हाला सोपविन, असे सांगून निघून गेली. पुढे बऱ्याच वर्षांनंतर एकदा गंगा नदीतील पाण्याचे प्रमाण अचानक कमी झाल्याचे लक्षात आल्याने, त्याच्या कारणाचा शोध घेण्यासाठी, महाराज शंतनू नदीतीराने जात असता, एका ठिकाणी एक तरुण तेजस्वी युवक आपल्या धनुर्विद्येच्या कौशल्याने नदीला बांध घालून पाणी अडवित असल्याचे, त्यांच्या लक्षात आले. शंतनूने त्याला तू कोण आहेस? अशी विचारणा करताच, प्रत्यक्ष गंगा प्रकट होऊन म्हणाली की, हा तुमचाच मी सोबत नेलेला पुत्र आहे. हा सर्वगुण संपन्न, ज्ञानी, पराक्रमी झाला असून याचे नाव देवव्रत आहे. आता मी त्याला तुम्हाला सोपवित आहे, असे सांगून देवव्रताला शंतनूच्या हवाली केले. देवव्रत म्हणजेच पूर्वजन्मीचा आठवा वसू होता. देवव्रताला शंतनूने प्रेमाने वाढविले.
एके दिवशी शंतनू नदीकाठी विहार करीत असताना, त्याला एक सुंदर कन्या दिसली. तिला पाहून शंतनू मोहित झाला. तिची चौकशी केलेली असता, तिचे नाव सत्यवती असून, ती एका कोळ्याची (धीवर) कन्या असल्याचे कळले. तेव्हा शंतनूने तिच्या वडिलांची भेट घेऊन, सत्यवतीशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा धीवराने म्हटले की, “महाराज माझ्या मुलीचा विवाह आपल्यासोबत लावून देण्यास मला आनंदच होईल; मात्र लग्नानंतर माझ्या मुलींच्या मुलालाच जर राज्याचा वारस करणार असाल, तरच मी आपल्या सोबत मुलीचा विवाह करण्यास मान्यता देईन,” अशी अट घातली; परंतु स्वतःच्या सुखासाठी देवव्रताच्या अधिकारावर गदा आणणारी, ही अट मान्य नसल्याने, शंतनू परत फिरला; परंतु सत्यवतीच्या आठवणीने तो उदास राहू लागला. तिच्या आठवणीने तो हळूहळू खंगू लागला. पित्याची ही परिस्थिती पाहून, देवव्रताला वाईट वाटले. त्याने चौकशी केली असता, त्याला सत्यवती संदर्भातली माहिती कळली. तेव्हा तो धीवराला भेटण्यासाठी त्याच्या झोपडीत गेला. त्याने सत्यवतीच्या व शंतनूच्या मुलालाच राज्य देण्यात येईल, असे धीवराला वचन दिले व आपण राज्यावर हक्क सांगणार नाही, असेही वचन दिले. मात्र भावी आयुष्यात आपल्या मुलांकडून अशा प्रकारचा दावा करण्यात आला तर? असा प्रश्न धीवराने उपस्थित करताच, अशी परिस्थिती येऊ नये, यासाठी “मी विवाहच करणार नाही, आजन्म ब्रह्मचारी राहील व हस्तिनापुरीचे रक्षण करीन,” अशी प्रतिज्ञा देवव्रताने केली. यामुळे धीवराने सत्यवतीच्या शंतनू सोबत विवाहाला संमती दिली. देवव्रत सत्यवतीला शंतनूकडे घेऊन आला व सर्व वृत्तांत कथन करून सत्यवतीशी विवाह करण्याची विनंती केली.देवव्रताच्या या कृतीने व पितृभक्तीने अत्यंत प्रसन्न, आनंदी होऊन शंतनूने तुझ्या या पितृभक्तीमुळे मी तुला इच्छा मरणाचे वरदान देत असून, अशा प्रकारची प्रतिज्ञा तू केल्याने ‘भीष्म’ या प्रतिज्ञेला ‘भीष्मप्रतिज्ञा’ म्हणून ओळखले जाईल, असा वर दिला. अशाप्रकारे देवव्रताचा भीष्म झाला. त्याची प्रतिज्ञा ‘भीष्मप्रतिज्ञा’ म्हणून नावारूपाला आली. भीष्म हे कौरव व पांडवाचे आजोबा होते म्हणून त्यांना पितामह भीष्म म्हणतात.
तात्पर्य : देवस्वरूप वसूंनाही आपल्या चुकीच्या वर्तनामुळे मिळालेल्या शापाचे परिणाम भोगावे लागले. हे लक्षात घेऊन, मनुष्याने आपले वर्तन ठेवावे.