Wednesday, July 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाजमुंबई लोकल...

मुंबई लोकल…

विशेष – मेधा दीक्षित

मुंबईमध्ये लोकलने प्रवास करणाऱ्यांचे एक स्वतंत्र जग आहे. प्रत्येकाचा एक ७.५९, ९.१३, ५.२३, ६.०३ अशा लग्नाचा मुहूर्त असल्यासारख्या वेळा असलेल्या गाड्यांचे ग्रुप असतात. आपली नेहमीची ट्रेन इंडिकेटरला लावलेली असली की तो एकदम निवांत असतो चढायला. मग कितीही गर्दी असली तरी त्याला त्याची चिंता नसते.

आणखी एक खासियत अशी की, प्रत्येकाचा डबा ठरलेला असतो. डब्याला तीन दरवाजे असल्यामुळे त्यातला एक दरवाजा ठरलेला असतो. त्या दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडे मुसंडी मारायची की उजवीकडे हेदेखील ठरलेलं असतं. अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळा दिसत असतो तसं त्याला आपण पकडायची सीट दिसत असते. नेहमीची जागा पकडली की आजचा दिवस चांगला जाणार याची त्याला खात्री पटते. जागेवर बसल्यानंतर शेजारी आपले सखे सोबती आहेत ना याची खातरजमा केली जाते. मग गप्पा, भंकस, तर काही ग्रुपमध्ये भजन, काहीजण पत्ते काढतात. लेडीज डब्यात अशीच परिस्थिती असते. भजन, पत्ते मात्र नसतात, तिथेही आपला सगळा ग्रुप जमला की नाही ते बघितलं जातं. गप्पा लगेचच सुरू होतात. त्यात एकमेकींच्या साड्या, ड्रेस, हेअर स्टाईल, मुलंबाळं, त्यांची आजारपणं, शिक्षणातली प्रगती अनेक विषय क्वचित घरच्या, ऑफिसच्या कुरबुरी या ग्रुपमध्ये वय वर्षे २० ते ६० एवढी ‘रेंज’असते. ट्रेनमध्ये ओळख झालेल्या प्रत्येक सखीचा वाढदिवस, केळवण, डोहाळे जेवण, कुणी रिटायर होणार असेल तिला सेण्ड ऑफ, त्याशिवाय हळदीकुंकू, भोंडला सगळं यथासांग पार पाडलं जातं. खायचं प्यायचं एकेक जण स्वतः करून किंवा विकत घेऊन येतात. पेपर डीश, चमचे, टिशू पेपर सगळं साग्रसंगीत.

आपल्या नेहमीच्या गाडीबद्दल प्रत्येकाला एक विशेष जिव्हाळा असतो. दसऱ्याला लवकर येऊन त्या गाडीचे प्रवासी गाडी, आपला डबा सजवतात. गाडीचा मोटरमन, गार्ड रिटायर होतो तेव्हा गाडीचे नेहमीचे प्रवासी त्याला निरोप देतात. सगळे प्रवासी मिळून प्लॅटफॉर्मवरच अतिशय हृद्य असा सोहळा साजरा करतात.

लोकलमधील ‘शॉपिंग’ हा आणखी एक पैलू आहे. सकाळच्या वेळी, टिकल्या, रुमाल, पर्सेस, कानातले, बांगड्या, हेअरपिन्स, थंडीत स्कार्फ, मफलर या गोष्टी विकणाऱ्यांचा सुळसुळाट. आणखी एक व्हरायटी स्टोअरमध्ये मिळतात. तेवढ्या वस्तू विकणारा असतो. लायटर, बॅटरी, सेलोटेप, नेलकटर, कात्री, इअरबड्स, नाडी बंडल. हे सगळं एका हुकवर अडकवलेले. चार साडेचारनंतर भाजीवाल्या, फळवाल्या, फ्रायम, वेफर्स, चकल्या, राजगिरा लाडू यांची छोटी छोटी पाकिटं विकणारे. त्यात भाजीवाल्यांना जास्त डिमांड. कारण भाजी खरेदी झाली की मोठं काम झालं. अनेक बायका पालेभाजी घेतली तर ती निवडायचं काम पण गाडीतच उरकून घेतात. फुलवाल्या, गजरेवाल्यांचाही फेरा होतो. मुसळधार पाऊस पडत असताना सोनचाफ्याची फुलं, मोगऱ्याचे, जाई जुईचे गजरे विकणारी बाई गाडीत चढली की अख्ख्या डब्याला फुलांचा सुवासिक वास पसरला जातो. त्यामुळे आपसुकच ट्रेनमधल्या स्त्रियांची पावले गजरा खरेदी करण्याकडे गर्दी करतात. या फेरीवाल्यांची चढायची, उतरायचे स्टेशन ठरलेले असतात. सेंट्रल रेल्वेवर विद्याविहार, कांजूर, नाहूर जिथे एक, दोन प्लॅटफॉर्म एकत्र असतात. एक चिकुवाली किंवा संत्रे विकणारी असेल तर ती गाडीतूनच आवाज देणार “चिकुवाली हाय गं” म्हणजे प्लॅटफॉर्मवर कोणी चिकुवाली असेल तर ती गाडीत चढणार नाही. एकाच डब्यात दोन दोन चिकुवाल्यांचा ‘व्यवसाय’ कसा होणार? शाळेचं तोंडसुद्धा न पाहिलेल्यांची ही ‘बिझिनेस मॅनेजमेंट’ कौतुकास्पदच. या प्रवाशांची परिभाषा पण ठरलेली असते. किचन म्हणजे डब्यातील सगळ्यात टोकाचा छोटा भाग. पूर्वी गाड्या बारा किंवा नऊ डब्याच्या असत. सतत इंग्लिशमध्ये बोलणाऱ्या तामिळ, केरळी बायकासुद्धा त्या गाड्यांना बारा डब्बा, नऊ डब्बा’ असेच म्हणणार.

समानता हे या जगाचं वैशिष्ट्य. रेल्वे स्टेशनबाहेर स्त्रिया कुणीही असोत एकदा का गाडीत चढल्या की सगळ्या ‘प्रवासी’ होतात. बँकेत मोठ्या हुद्द्यावर असणारी, कोर्टात वकिली करणारी, दुकानात सेल्स गर्लचं काम करणारी, कुणी प्रायव्हेट कंपनीत काम करणारी सगळ्या जणी गुण्यागोविंदाने डब्यात नांदत असतात.

या जगात सचोटी तर ओतप्रोत भरलेली असते. कुठल्याही विक्रेत्याचे पैसे बुडत नाहीत. कानातले विकणारा, कानातल्यांचे बॉक्स खरेदी करणाऱ्या बाईकडे देऊन दरवाजात हवा खायला जातो. आपण समोर नसताना एखादं कानातले कोणी पर्समध्ये टाकेल अशी शंका सुद्धा त्याच्या मनात येत नाही. कारण त्याचा विश्वास अगदी सार्थ असतो. उलट त्याला उतरायची घाई असेल आणि पैसे पर्समधून काढेपर्यंत तो उतरला तर खिडकीतून त्याला हाका मारून किंवा प्लॅटफॉर्मवरच्या एखाद्या दुसऱ्या विक्रेत्याचं लक्ष वेधून तिच्याकडे ते पैसे द्यायला सांगितले जातात. विक्रेते पण त्याचा शोध घेऊन त्याचे पैसे देतात. यातले कुणीही फारसे श्रीमंत नसतात. पैसे ढापले, बुडवले तरी पकडलं जाण्याची शक्यता नसते. तरी कोणी कोणाला फसवत नाही. चिकूवाली चिकूची मोठी टोपली एका ठिकाणी ठेवून डबाभर फिरत असते पण तिच्या टोपलीतून चिकू निवडून घेताना एखादा जास्त चिकू घेतला जात नाही.

परोपकार हा तसा मुंबईचाच गुण. त्यामुळे तो गाडीत दिसतोच दिसतो. तुफान गर्दी असलेल्या ट्रेनमध्ये एखादीला चक्कर आली तर तिला सावरायला अनेक हात पुढे येतात. महत्प्रयासाने मिळालेली विंडो सीट तिला बसायला दिली जाते. मग पाणी, लवंग, वेलची, आवळा सुपारी, कॅडबरी या गोष्टी दिल्या जातात. ती कुठे उतरणार याची विचारपूस करून त्या स्टेशनवर उतरणारी कुणीतरी तिची जबाबदारी घेते. तिला हाताला धरून स्टेशनवर उतरते. ती सावरली असेल तर रिक्षात बसवून दिले जाते. हे सर्व नावगाव सुद्धा माहीत नसलेल्या स्त्रिया करतात आणि कसलीही अपेक्षा न ठेवता, त्याचा गाजावाजा न करता, अजून अनेक गोष्टी, किस्से सांगता येतील. त्याला अंत नाही. पण आता आवरतं घेते. चैतन्य, उत्साह, सचोटी, आपुलकी, निरपेक्ष परोपकार, अशा दुर्मीळ गुणांनी ठासून भरलेल्या या धावत्या जगाला सलाम.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -