श्रीनिवास नार्वेकर तसं नाट्यक्षेत्रातलं एक सातत्य राखून काही ना काही प्रयोगक्षम नाट्यकृती करणारं नाव. सावंतवाडीतून मुंबईत स्थिर झाल्यावर, नार्वेकरांनी नाट्यक्षेत्रासाठी केलंलं कार्य नक्कीच दखल घेण्याजोगं आहे.
नाट्यशिबिरं, बालनाट्य शिबिरं, आवाजाविषयक कार्यशाळा, प्रायोगिक नाटकं, लहान मुलांसाठी मासिक असे अनेकविध उपक्रम ते आजही करताना दिसतात. एवढं करूनही एकला चलो रेचा त्यांचा स्वभाव वाखाणण्याजोगा आहे. यात त्यांना साथ होती, त्यांच्या पत्नीची, डाॅ. उत्कर्षा बिर्जे यांची. काही वर्षांपूर्वी त्यांच्या दुर्दैवी निधनाने खचून न जाता, रंगभूमीसाठी करत असलेल्या कार्यात कुठेही खंड न पडू देता, सातत्याने प्रयोग करत राहण्याची जिद्द बाळगलेला खरा रंगकर्मी म्हणून श्रीनिवास नार्वेकरांचा उल्लेख करावा लागेल. हल्लीच उत्कर्षा बिर्जे यांच्या स्मृतिदिनी शिवाजी मंदिरात दोन दीर्घांकाचे प्रयोग सादर करण्यात आले, त्याचा हा संक्षिप्त आढावा.
दरवर्षी हा स्मृतिदिन नाटक या विषयाशी निगडित असलेल्या एखाद्या सादरीकरणाने पार पाडला जातो. यंदा नार्वेकरांनी दोन दीर्घांक सादर केले. पैकी एक होता अमृता मोडक अभिनित ‘छोटी डायरी’ आणि दुसरा योगेश सोमण लिखित ‘कबर.’ छोटी डायरी ही आन् गायल बाल्प या फ्रेंच लेखिकेची एकपात्री एकांकिका. अगदी सुरुवातीपासूनच पकड घेणारा विषय आणि अमृता मोडक यांच्या सहजाभिनयामुळे आपण त्यात अडकले जातो. स्वकर्तृत्वावर जगणारी एक प्रथितयश लेखिका पूर्ण अंकात तिच्याकडून अनावधानाने हरवलेली छोटी डायरी शोधतेय आणि या शोधकार्यात घडून गेलेल्या मागील काही तासांची उजळणी करता करता मनातल्या भाव भावनांच्या मनोविश्लेषणाचा लेखाजोखा ती मांडत जाते. सिग्मंड फ्रॉइड (१८५६-१९३९) यांनी मांडलेल्या मानवी मनाविषयीच्या सिद्धांत प्रणालीला आणि मानसोपचार पद्धतीला मनोविश्लेषण ही संज्ञा वापरली जाते. मनोविश्लेषण म्हणजे फ्रॉइड यांच्या सिद्धांत चौकटीला धरून केलेले मनाचे अन्वयन आणि स्पष्टीकरण. मानवी मनोव्यवहाराच्या विश्लेषणाचा आरंभ जरी फार प्राचीन असला, तरी एकोणिसाव्या शतकातील वैज्ञानिक विचारांची प्रगती अभूतपूर्वच आहे. या सिद्धांताची व्यवस्थित मांडणी आणि सर्व मानवी वर्तनाला कवेमध्ये घेण्याची त्याची क्षमता या दोन वैशिष्ट्यांमुळे फ्रॉइड हे विसाव्या शतकातील सर्वांत महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ समजले जातात. त्यांच्या नंतरच्या प्रत्येक मानसशास्त्रज्ञाला त्यांची दखल घ्यावीच लागली. त्याचाच आधार घेत आन् गायल बाल्प या लेखिकेने स्वतःला त्या सिद्धांतात गोवून ‘छोटी डायरी’ चा प्लाॅट उभा केला.
निर्णयापर्यंत नेऊ न शकणाऱ्या मानसिक अवस्थेला केवळ अधोरेखित करणे, हे या दीर्घांकातून सादर करायचे, हाच मूळ हेतू असल्याने अन्य स्त्रीसुलभ व्यावहारिक बाबींचा ही लेखिका विचारही करत नाही. मनोविकृतीग्रस्त, गुन्हेगार, कलावंत अशा वेगळ्या माणसांच्या वेगळेपणाचा अन्वयही मनोविश्लेषणाच्या चौकटीतून दाखवला गेला असल्यामुळे, त्यामागे काही अनाकलनीय ईश्वरी वा दिव्य संकेत असतात, या समजुतीलाही तडा देण्याचे काम लेखिका घडवून आणते, जे तात्कालिक युरोपियन ‘रॅशनॅलिझम’ च्या अनुषंगाने आवश्यक होते. भारतीय त्यातही मराठी रंगभूमीवर सादर झालेला ‘छोटी डायरी’चा प्रयोग ही विशेष लक्षवेधी घटना आहे. त्यासाठी प्रसाद बर्वे आणि श्रीनिवास नार्वेकर यांचे अभिनंदन करावेच लागेल. अमृता मोडक या दीर्घांकासाठी सहज अभिनय कशास म्हणतात, याचा वस्तुपाठ उभा करतात. मंचावरील प्रत्येक मुव्हमेंट एखाद्या नटाने विश्वासक पद्धतीने हाताळल्यास, ती कृत्रिम न वाटता, सहजतेकडे घेऊन जाते. रंगमंच कवेत घेण्यासाठी सातत्याने प्रेक्षकांना प्रत्येक मुव्हमेंटमध्ये खिळवून ठेवण्याचे दिग्दर्शिकीय आणि अभिनयाचे कसब खरोखर वाखाणण्याजोगे आहे.
दुसरी एकांकिका एका काल्पनिक ऐतिहासिक घटनेचे सादरीकरण होते. छत्रपती संभाजी पुत्र शाहू महाराज यांच्याकडे रायगड ताब्यात घेतल्यानंतर औरंगजेबाने दोन मागण्या केल्या होत्या. पैकी दिल्लीच्या तख्तावर मराठे कधीही बसणार नाहीत व औरंगजेबाचा मृत्यू मराठी मुलखात घडून आल्यास, त्यास याच भूमीत दफन केले जावे, या त्या दोन मागण्या होत्या, अशी वदंता आहे. या घटनेचे नाट्यरुपांतरण हा एक कल्पनाविलासच म्हणायला हवा. पारंपरिक ऐतिहासिक नाटकाची ठेवण जशी असते, त्याच पठडीतला हा प्रयोग होता. नार्वेकर आणि त्यांचे सहकारी समीर दळवी यांनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखांचे सादरीकरण कंटाळवाणे नव्हते. मात्र उल्लेश खंदारे यांची रंगभूषा विशेष लक्षवेधी होती.
एखादी व्यक्ती कायमस्वरुपी स्मरणात राहावी, यासाठी अनेक संस्था, अनेक व्यक्ती, शासकीय उपक्रम आपापल्या परीने कर्तव्य म्हणून अशा स्मरणयात्रा घडवून आणत असतात. हल्ली याचे स्वरुप प्रेक्षकांना बघायला काय आवडेल, जेणे करून गर्दी जमवता येईल ? हा अप्रोच विचारात न घेता, नाटक सादरीकरणातील नावीन्य जे मराठी रंगभूमीला किमान एक पाऊल पुढे नेईल, अशा क्रिएटिव्ह नोटवर आधारित असावे, हे माझे वैयक्तिक मत आहे. निदान त्यानिमित्त वेगळ्या अनुभवाला सामोरे जाता येईल, ही छोटीशी अपेक्षा.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…