Monday, July 1, 2024
Homeब्रेकिंग न्यूजरक्त नमुने बदलल्याने ससूनमधील दोन डॉक्टरांसह शिपाई निलंबित

रक्त नमुने बदलल्याने ससूनमधील दोन डॉक्टरांसह शिपाई निलंबित

मुख्यमंत्र्यांची पोलीस आयुक्तांशी चर्चा

पुणे : ससून रुग्णालयात अपघातग्रस्त कारचालक अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले होते. तसेच मुलाची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली होती. मात्र, संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांनी रक्ताचे नमुने हे तपासणीसाठी प्रयोगशाळेत न पाठवता ते डस्टबीनमध्ये टाकून दिले. दुसऱ्याच्या रक्त नमुन्याच्या आधारे पोलिसांना चुकीचा अहवाल दिला गेला. याप्रकरणात अडकलेले ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर व डेड हाऊसचा शिपाई अतुल घाटकांबळे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येऊन त्यांना सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणातील गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी फोनवरून बोलणे करून केसच्या प्रगतीची माहिती घेतली. याप्रकरणात कोणताही मंत्री, आमदार, खासदार किंवा बांधकाम व्यावसायिक असेल तर त्यांना सोडू नका, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. समाजात याप्रकरणातून चांगल्या प्रकारचा संदेश गेला पाहिजे, असे त्यांनी आयुक्तांना सांगितले.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात येऊन त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पुणे पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत या घटनेचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, याप्रकरणात सदर अपघात नेमका कसा झाला, यात कशाप्रकारे चुका झाल्या आहेत, याबाबतची माहिती मिळविण्यासाठी अपघाताची घटना ‘एआय’द्वारे जिवंत करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे.

दरम्यान, अपघातात आलिशान पोर्श कारचा भीषण अपघात झाल्याने त्यामध्ये तांत्रिक अडचणी होत्या, असा मुद्दा बचाव पक्षाने उपस्थित केला आहे. त्यामुळे याबाबत जर्मनीच्या पोर्श कार कंपनीच्या पथकाने पुण्यात येऊन कारची पाहणी करण्याचे ठरविले आहे. सदर पोर्श कार कंपनी मुळची जर्मनीची असून त्याठिकाणचे त्यांचे प्रतिनिधीदेखील या कारची पाहणी करुन तांत्रिक गोष्टी तपासून त्याबाबतची माहिती आरटीओ व पोलिसांसोबत आदानप्रदान करणार आहेत.

कल्याणीनगर येथील अपघातातील दोन कोटी ६४ लाख रुपये किमतीची महागडी पोर्श कार पिवळी ताडपत्री टाकून पोलिसांनी झाकून टाकली आहे. तसेच कारच्या बाजूने बॅरिकेट लावले आहेत. अपघातातील गाडीचे पार्ट चोरीस जाऊ नयेत किंवा त्यातील पुरावे नष्ट होऊ नये, याकरिता संबंधित कार झाकली गेली आहे. तसेच पावसाळा सुरु होणार असल्याने गाडीतील तांत्रिक गोष्टींना धोका निर्माण होऊ नये याकरिता ती झाकण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रथमच एखादी अपघातातील पोलीस स्टेशनमधील गाडी झाकल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

पुणे अपघात प्रकरणात ‘ससून’च्या डीनवर कारवाई, सक्तीच्या रजेवर पाठवले

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला जामीन मिळावा, यासाठी ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातल्या तीन जणांवर गुन्हे दाखल करत त्यांचे निलंबन केले आहे. त्यानंतर आता राज्य शासनाने थेट डीनवर कारवाई केली आहे. ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन अपघात प्रकरणातील कारवाईची माहिती दिली होती. त्यानंतर काही वेळातच डीन काळे यांच्यावर राज्य शासनाने कारवाई करत काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

ससून रुग्णालयातील ज्या डॉक्टर अजय तावरेने अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले आहेत, त्याच्यावर आणखी आरोप होत आहेत. तावरे हा रिपोर्टसाठी पोलिसांकडूनदेखील चिरीमीरी घ्यायचा, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांकडून तो शंभर-दोनशे रुपये घ्यायचा, कुठल्याही हद्दीमध्ये पार्ट्या करायचा आणि बिल मात्र पोलिसांना द्यायला लावायचा, अशी माहिती पोलिस दलामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे.

पुणे अपघात प्रकरणी यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये, ४८ तासात अहवाल सादर

पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणात ससूनच्या दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक झाली. या प्रकरणी जे जे रुग्णालयाच्या डीन पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने अॅक्शन मोडमध्ये येत ४८ तासात तपास पूर्ण केला असून गंभीर कृत्य केल्याचे देखील अहवालात नमूद केले आहे. तसेच ब्लड सॅम्पल अफरातफरी प्रकरणी आज दुपारपर्यंत कारवाई होणार आहे.

पुण्याच्या कल्याणीनगरमधील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातल्या आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार प्रकरणात दोन डॉक्टर अडकल्यानं ससून हॉस्पिलटची पुरती नाचक्की झाली आहे. या धक्कादायक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारनं नियुक्त केलेल्या समितीने दिलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालात संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीर स्वरूपाचे कृत्य केल्याचे नमूद केले आहे. डॉक्टर आणि शिपाई यांनी गंभीर स्वरूपाचे केलेलं कृत्य पाहता आज दुपारी ३ पर्यंत निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी तयार करण्यात आलेल्या एसआयटीच्या प्रमुख डॉ. पल्लवी सापळे यांनी आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवातकर यांना सादर केला. आता तो अहवाल वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना देखील प्राप्त झाला. अहवाल प्राप्त झाल्याने तातडीने क्लास वन अधिकारी डॉ. अजय तावरे यांच्या कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांना कळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर डॉ. श्रीहरी हरनोळ हे क्लास टू रँकचे अधिकारी आहेत. हरनोळ आणि शिपाई घटकांबळे यांची तातडीने शासन स्तरावर निलंबन होणार आहे.

एसआयटी समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे आहेत. याशिवाय, या समितीमध्ये डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या एसआयटी समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यामुळे एसआयटी समितीच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -