Wednesday, March 26, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखदहावीचा निकाल मोठा, मुलांसमोर आव्हानेही मोठी

दहावीचा निकाल मोठा, मुलांसमोर आव्हानेही मोठी

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. शालेय वर्ष समाप्त झाल्याचे संकेत या निकालाने विद्यार्थ्यांना मिळत असून महाविद्यालयीन, अभियांत्रिकी, वैद्यकीय व अन्य विभागाकडे शिक्षण भरारी मारण्याची दालने विद्यार्थ्यांना खुली झाली आहेत. दहावीचा यंदाचा एकूण निकाल ९५.८१ टक्के इतका लागला आहे. यंदाच्या १० वीच्या निकालात नेहमीप्रमाणे आणि १२ वीच्या निकालाप्रमाणेच मुलींनी बाजी मारली आहे. एकूण ९ विभागात घेण्यात आलेल्या परीक्षेत यंदाच्या निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. राज्यात बारावीपाठोपाठ दहावीच्या निकालात कोकणच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याने यंदाच्या निकालावरून कोकणची मुलेच हुश्शार असे म्हणावे लागेल.

एकेकाळी दहावी-बारावीच्या निकालामध्ये लातूर पॅटर्नचा दबदबा असायचा. दहावी-बारावीचा निकाल म्हटल्यावर लातूरचीच मुले बाजी मारणार, हे हमखासपणे ठरलेले चित्र असायचे. पण इतर विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रमाच्या व बुद्धिमत्तेच्या बळावर हे चित्र बदलले. गेल्या काही वर्षांत लातूर पॅटर्न मागे पडल्याने त्या पॅटर्नची चर्चाही थंडावली होती. पण यंदा मात्र लातूर पॅटर्नने दहावीच्या निकालात पुन्हा उसळी मारली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेत लातूर विभागाचा दबदबा कायम असून, राज्यातील १८३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले आहेत. यात लातूर विभागाच्या १२३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. लातूर मंडळाचा ९५.२७ टक्के निकाल लागला असून, लातूर पॅटर्नचा दबदबा यंदाही कायम आहे. २०२३ मध्ये राज्यात १५१ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण घेतले होते. यात १०८ विद्यार्थी लातूर मंडळाचे होते. यंदा १०० टक्के गुण मिळविणाऱ्यांमध्ये लातूरच्या १५ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. केवळ कोकणातच नाही, तर यवतमाळ, अकोला यांसह राज्याच्या विविध भागांत मुलांपेक्षा मुलींनीच अधिक गुण मिळविल्याने सावित्रीच्या मुली हुश्शार म्हणण्याची वेळ आली आहे. निकाल म्हटल्यावर कोणीतरी उत्तीर्ण होणार, कोणीतरी अनुत्तीर्ण होणार, हे ओघाने आलेच.

सर्वांचीच बुद्धिमत्ता व परिश्रम घेण्याची तयारी समान नसल्याने त्याचा परिणाम निकालपत्रिकेवर पाहावयास मिळत आहे. ८५ टक्के ते १०० टक्के गुण मिळविणाऱ्यांचे अभिनंदन होते; परंतु ३५ ते ६० टक्के गुण मिळविणाऱ्यांची फारशी दखल घेतली जात नाही. मुलांनी चांगले गुण मिळविणे हा आजच्या समाज जीवनात प्रतिष्ठेचा विषय झाल्याने मुलांनी चांगले गुण मिळवावे, यासाठी मुलांनी दहावीला प्रवेश केल्यानंतर पहिल्या दिवसांपासूनच चांगले गुण मिळविण्यासाठी घरातून त्यांच्यावर वाढता दबाव असतो. शैक्षणिक गुणवत्तेसाठी निर्माण झालेली स्पर्धा ही निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी कट ऑफची लागलेली टक्केवारीची यादी पाहता त्या ठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी ९० टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांमध्येही स्पर्धा लागल्याचे पाहावयास मिळत आहे. शहरी भागात, निमशहरी भागात कॉलेजची संख्या मर्यादित राहिलेली आहे, पण दिवसागणिक विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. मुंबई शहर, उपनगरात प्रवेश न मिळाल्यावर ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल-उरण आदी सभोवतालच्या भागातील कॉलेजेसला प्रवेशासाठी पसंती देण्यात येत आहे.

मुंबई शहर व उपनगरातील मुलेच शेजारच्या भागांमध्ये प्रवेशासाठी शैक्षणिक अतिक्रमण करू लागल्याने तेथील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागांचा पर्यायी शोध घेण्याची वेळ आली आहे. यंदाच्या दहावीच्या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांकडून १५ लाख ६० हजार १५४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जवळपास १५ लाख विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाची पुन्हा गंभीर समस्या निर्माण होणार आहे. चांगले कॉलेज म्हणजेच शिक्षण ही भ्रामक संकल्पना आजही प्रतिष्ठेची बाब करून घेतली आहे. सायन्स म्हणजे चांगले, तिथे नाही मिळाले, तर वाणिज्य, त्यातही कमी उत्तीर्णांसाठी कला शाखा हे वर्षानुवर्षाचे समीकरण आजही कायम आहे. त्यात अभियांत्रिकीचा डिप्लोमा, संगणक, आयटीआय याकडे कल वाढू लागल्याने महाविद्यालयांवरील प्रवेशाचा भार काही अंशी कमी झाला आहे. यशाला वाली असतो, अपयशाला कोणीही दावेदार नसतो, हे चित्र दहावीच्या निकालातही पाहावयास मिळाले.

गुणवंतांच्या यशाबद्दल त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी पुढाकार घेणारे कमी टक्के मिळविणाऱ्यांचे अभिनंदन करताना तितका उत्साह दाखवत नाहीत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना सल्ला देण्यासाठी, त्यांच्या अपयशाचे विच्छेदन करण्यासाठी जणू काही त्यांना स्फुरण चढलेले असते. यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी एकीकडे जल्लोष सुरू असताना कमी टक्के मिळवून उत्तीर्ण झालेल्यांच्या घरी एक प्रकारची मरगळ आलेली दिसून येते, तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या घरावर सुतकी अवकळा पसरलेली असते, हे चित्र दरवर्षीच पाहावयास मिळते. हे चित्र बदलले पाहिजे. त्यासाठी पालकांचीच नाही, तर समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे पुढील शैक्षणिक विश्वात गरुड भरारी मारण्यास सक्षम असतात. पण कमी टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्या तसेच अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सांभाळणे ही त्यांच्या घराचीच नाही, तर समाजाची जबाबदारी आहे.

दहावीच्या परीक्षेतील गुण म्हणजे जीवन नाही, तर जीवनाच्या वाटेवरील एक टप्पा आहे. कमी गुण मिळालेल्यांना पुन्हा परिश्रम करून बारावीच्या परीक्षेत नावलौकिक कमविण्याची संधी असते. तसेच अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यास करून नव्याने परीक्षा देऊन अपयशाचा कलंक पुसण्याची संधी असते. त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. कमी गुण मिळालेल्या तसेच अनुत्तीर्ण झालेल्या केवळ विद्यार्थ्यांचेच नाही, तर त्यांच्या पालकांचेही समुपदेशन करण्याची गरज आहे. हताश झालेल्या त्यांच्या खांद्यांना सावरण्याची आज गरज आहे. त्यांना सल्ला देण्याची नाही, तर मार्गदर्शन करण्याची, त्यांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे. खेळाच्या संघातही सर्वच खेळाडूंना समान यश मिळत नाही. कोणत्या सामन्यात कोणी चमकतो, तर कोणी अपयशी ठरतो. आज अपयशी ठरलेल्या खेळाडूला पुढच्या सामन्यात सूर गवसतो. परीक्षेतील यशापयश म्हणजे आयुष्याचे सार नव्हे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना तसेच अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा गरुड भरारी मारण्यासाठी शुभेच्छा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -