सेवाव्रती: शिबानी जोशी
ठाणे आता मुंबई खालोखाल अफाट पसरत चाललेलं शहर बनत चाललं आहे; परंतु एके काळी ठाणा शहर म्हणजे एक टुमदार वस्ती होती. या लहानशा ठाणे शहरात ९० वर्षांपूर्वी संघाची पहिली शाखा सुरू झाली होती. कार्यकर्ते जमू लागले आणि शाखे व्यतिरिक्त आजूबाजूला समाजात दिसून येणाऱ्या त्रुटींवर कामही करू लागले होते. त्यासाठी त्यांनी विविध संस्थाही स्थापन केल्या. त्यापैकीच एक संस्था म्हणजे प्रताप व्यायामशाळा सेवा संस्था. ही संस्था मागील ७० वर्षांपासून ठाणे महानगरात तसेच अन्य भागात वेळोवेळी आवश्यकतेनुसार सेवाकार्य करीत आली आहे.
१९४२ साली अण्णासाहेब जोशी यांनी आता जिथे प्रताप व्यायामशाळा उभी आहे, त्या जागेत बॅटरीला लागणारे सेल्स बनविण्याचा कारखाना सुरू केला होता. पण दोन वर्षांनी कारखाना बंद पडला. त्यामुळे ती जागा पडून होती. संघाचे कार्यकर्ते असलेले माधव कुलकर्णी यांनी अण्णा जोशी यांच्या परवानगीने पुढील मोकळ्या मैदानावर शाखा भरवण्याची अनुमती मिळवली आणि त्या ठिकाणी सुरुवातीला संघाची शाखा भरू लागली. प्रभात, सायं, रात्र अशा शाखा चालत. शाखेच्या स्वयंसेवकांच्या उत्साही, संयमित वागण्यामुळे अण्णा जोशी अत्यंत प्रभावित झाले. १९५१-५२ च्या सुमारास जोशी आजारी पडले. त्यावर त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी कोरड्या हवेच्या ठिकाणी राहावयास जाण्याचा सल्ला दिला आणि जोशी पुण्याला वास्तव्याला गेले.
माधव कुलकर्णी यांना ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी अण्णासाहेब जोशी यांच्याकडे जागेचा विषय काढला व आपण ठाणे शहर सोडून पुणे येथे जात आहात तरी आम्ही संघ शाखेसाठी वापरत असलेली जागा शाखेच्या कामासाठी ठेवावी अशी आग्रहाची मागणी केली. त्यांनी विचार करून कळवतो असं सांगितलं. त्यानुसार बोलणे होऊन वीस हजार रुपये इतकी जागेची किंमत ठरली आणि पहिले पाच हजार रुपये देऊन उर्वरित रक्कम हप्त्याहप्त्याने देण्याचे ठरलं. ठाण्यातील सुप्रसिद्ध वकील वामनराव ओक यांनी सारासार विचार करून त्यांस संमती देऊन ट्रस्ट डीड तयार केलं आणि १३ जुलै १९५२ रोजी ट्रस्टची नोंदणी झाली. ट्रस्टचे विश्वस्त म्हणून अण्णासाहेब जोशी, वामनराव ओक, माधवराव तेंडुलकर, परशुराम वैद्य आणि माधव कुलकर्णी यांची नावे निश्चित करण्यात आली. संघाच्या कार्यकर्त्यांनी तसेच इतरांनीही मोठा हातभार लावत ही रक्कम जमा करण्यात आली.
प्रताप व्यायामशाळेच्या आवारात संघाची शाखा भरते, बालवाडी चालते तसेच विविध उपक्रम आयोजित केले जातात. आपत्कालीन परिस्थितीमध्येही मदत उपलब्ध केली जाते. संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका चालवणं आणि त्यांना राष्ट्रीय विचार, संस्कृती याबाबत जागृत करणे यासाठी मोठ्या प्रमाणावर काम चालतं. त्याशिवाय प्रताप व्यायामशाळेच्या पहिल्या तीन मजल्यांवर कै. वामनराव ओक रक्तपेढी चालते. वर्षाला साधारण सहा हजार रक्त पिशव्या जमा केल्या जातात, ज्या आधारे बारा हजार रुग्णांना रक्त घटक उपलब्ध होतात. कोविड १९ या अत्यंत आव्हानात्मक काळात संस्थेच्या माध्यमातून कम्युनिटी किचन चालवण्यात आले. तसेच सुमारे अडीच लाख आयुर्वेदिक गोळ्या ठाणे महानगरातील सेवा वस्त्यांमध्ये वाटण्यात आल्या. त्याचबरोबर महाड व चिपळूण पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदतीची रचना करण्यात आली होती. रक्तदान शिबिराचे आयोजन देखील संस्थेच्या माध्यमातून करण्यात येते.
ठाणे महानगरातील झोपडपट्ट्यांमध्ये (सेवा वस्त्या) पुढील काळात आरोग्य, शिक्षण, संस्कार या क्षेत्रांत विविध प्रकारचे उपक्रम सुरू करण्याची आवश्यकता जाणवत आहे. ठाणे महानगरातील नौपाडा, ठाणे (पूर्व), वृंदावन सोसायटी या परिसरातील २४ सेवा वस्त्यांपैकी काही सेवा वस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून विविध सेवा कार्य उभी करण्याचा विचार चालू आहे. अभ्यासिका, संस्कार केंद्र, वाचनालय, विशेष शिकवणी वर्ग, वार्षिक आरोग्य तपासणी इत्यादी उपक्रमांची गरज लक्षात येत आहे. त्याचाच विचार करून काही भागात अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या एकूण १६ अभ्यासिका सुरू आहेत.
घरात असलेला जागेचा अभाव, कुटुंबातील सदस्य संख्या, परिसरातील व्यसनाधिनता, शिक्षणाबद्दलची उदासीनता, हे सर्व होतकरू विद्यार्थ्यांपुढचे अडसर लक्षात घेऊन अभ्यासिकेसारखा उपक्रम वस्तीतच सुरू करणे आवश्यक वाटते. निम्नस्तरातील किंवा मध्यमवर्ग घरातील विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, व्यक्तिमत्त्व विकास करणे तसेच यामुळे मुलांचं शाळा सोडण्याचं प्रमाणही कमी होणं असे या उपक्रमाचे उद्देश आहेत. या उपक्रमाद्वारे खेळ, व्यायाम, सहली, विविध स्पर्धा, सण-उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे आपली संस्कृती तसंच सामाजिक एकीकरण होऊन मुलांचा सर्वांगीण विकास अपेक्षित असतो व तसे परिणाम दिसतही आहेत.
रोज २ तास व आठवड्याचे सहा दिवस अभ्यासिका चालू असते. यामध्ये प्रार्थना, गाणी, गोष्टी, खेळ, प्राणायाम, इंग्रजी, गणित यांसारख्या विषयांचा मूलभूत अभ्यास घेतला जातो. तसेच विविध सण-उत्सव, थोर व्यक्तींचे स्मरण, विविध स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत संस्कार व मूल्य शिक्षण वाढीस लागेल याचा देखील प्रयत्न केला जात आहे. पाठ्यपुस्तकातील धडे त्याचे शंका निरसन समजून सांगणे व शिकविलेल्या पाठाचे स्वाध्याय सोडवून पाठांतर करायला सांगणे इ. घेतले जाते. २ ते १५ पाढे लिहिणे, मुळाक्षरे वाचन व लेखन, मराठी व हिंदी विषयाची शुद्धलेखन इ., लेखनाचा व वाचनाचा नियमित अभ्यास, नियमितपणे गणिताचा अभ्यास करून घेतला जातो. त्याशिवाय पाठांतर करून घेतले जाते. २ ते १५ पाढे पाठांतर, मुळाक्षरे पाठांतर, मराठी व हिंदी विषयाचे समानार्थी व विरुद्धार्थी शब्द पाठांतर, मराठी हिंदी व इंग्रजी विषयाच्या कविता पाठांतर करणे तसेच महिन्यातून दोन वेळा चित्रकला विषय घेतला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येऊन विज्ञान दिनाविषयी माहिती देण्यात येते.
सावित्रीबाई फुले पुण्यतिथी व छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महावीर जयंती इत्यादी विषयी मुलांना माहिती पण दिली जाते. सामान्यज्ञान स्पर्धा घेतली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुलांना संविधानाची माहिती दिली जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी दिंडी काढण्यात येते. अशा विविध उपक्रमांतून वर्षभर मुलांचे सामान्य ज्ञान वाढेल व त्यांच्यात शिक्षणाबद्दल ओढ निर्माण होईल असे बघितले जाते. ह्या सर्व अभ्यासिका विनाशुल्क चालविल्या जातात. सध्या सुरू असलेल्या अभ्यासिकांव्यतिरिक्त येत्या शैक्षणिक वर्षात ९ नवीन अभ्यासिका सुरू करण्याचे ठरविले आहे. त्या दृष्टीने साधारणतः १२ सेवा वस्त्यांमध्ये सर्वेक्षण झाले आहे. अभ्यासिकेला जागा व सेवक निश्चित करण्याचे काम चालू आहे. अशा प्रकारे येत्या वर्षात एकूण २५ अभ्यासिका ठाणे महानगरात सुरू होतील.
कोव्हिड १९ या महामारी काळात संस्थेने त्यांचे कार्यकर्ते, हितचिंतक व देणगीदार यांच्या सहकार्यातून धान्य वाटप केले. कम्युनिटी किचन चालवून गरजूंना अन्न वितरण करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक काढा, गोळी तसेच होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप ठाणे महानगरातील काही भागांत केले होते. जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे महाड, चिपळूण परिसरात महापुरात आर्थिक नुकसान झाले होते. त्यावेळी इथल्या लोकांना मदत करण्यात आली होती. औषध वाटप, कपडे, पाणी, धान्य इत्यादींचे वाटप तसेच आर्थिक मदत करण्यात आली होती. इतरही धार्मिक राष्ट्रीय सण संस्थेमार्फत साजरे केले जातात. ध्यान साधना वर्ग प्रताप व्यायामशाळा सेवा संस्था ठाणेमार्फत आयोजित करण्यात येतो. अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनींची प्राथमिक आरोग्य तपासणी देखील केली जाते.
अभ्यासिकेत येणाऱ्या मुलांचे आरोग्य चांगले असावे. आजार असल्यास, कुपोषणासारख्या समस्या असल्यास वेळेवर याबाबत काही कृती केली जाते. या बरोबरीने याच वस्त्यांमधील काही निवडक ठिकाणी इ. ९वी, १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग घेण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. सेवाभावी शिक्षकांच्या मार्फत इंग्रजी, गणित, विज्ञान यांचे वर्ग घेणे, तसेच परीक्षेची तयारी कशी करावी इ. बाबत वर्ग घेण्यात येतील. तसेच काही ठिकाणी वाचनालय सुरू करण्याचा संस्थेचा विचार आहे. लहान मुलांची गाण्याची, गोष्टींची पुस्तके ठेवण्यात येतील. संस्थेने नागरिकांना आपली जुनी, नवी पुस्तके देण्याचे आवाहन केले आहेच. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढेलच, तसेच भाषेचे ज्ञान देखील समृद्ध होईल. २०२३-२४ करिता एकूण १५ अभ्यासिका, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, मोठ्या मुलांचे विशेष मार्गदर्शन वर्ग, संस्कार वर्ग, वाचनालय, विविध स्पर्धा, सहली, सेवक प्रशिक्षण, पालक सभा घेण्याची योजना आहे.
संस्कार वर्ग हे आता एकल कुटुंब पद्धती आल्यामुळे काळाची गरज बनली आहे. येणाऱ्या काळात ठाणे महानगरातील सेवावस्त्यांमध्ये काही संस्कार वर्गाचे आयोजन करण्याचे संस्थेने ठरविले आहे. वय वर्ष ६ ते १२ मधील मुलांचे शनिवार व रविवार २ तासांचे हे वर्ग असतील. मुलांना मूल्यशिक्षण, आरोग्याच्या सवयी, स्वयंशिस्त, पर्यावरण, मुलभूत शालेय अभ्यास (अक्षर ओळख, अंक ओळख इ.) इ. बाबत या मधून शिक्षण व संस्कार करण्याचा मानस आहे. सेवावस्तीमधील व्यक्ती सेवा वस्तीतच हे वर्ग घेतील. या बरोबरच विविध छोटे छोटे खेळ, स्पर्धा यांचेही आयोजन असेल. पुढील वर्षभरात एकूण २५ संस्कार वर्ग चालू करण्याचा संस्थेचा मानस आहे.
joshishibani@yahoo. com