Thursday, October 30, 2025
Happy Diwali

Mumbai Metro 3 : आता होणार नाही ट्रॅफिक जाम; मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याचे पूर्ण झाले काम!

Mumbai Metro 3 : आता होणार नाही ट्रॅफिक जाम; मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याचे पूर्ण झाले काम!

'असा' असेल भूयारी मेट्रो ३चा पहिला टप्पा

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सोपा, जलद आणि आरामदायी होणार असल्याची आनंदाची माहिती मिळत आहे. मुंबईकरांना लवकरच भूमिगत मेट्रोमध्ये प्रवास करता येणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो ३ (Mumbai Metro 3) कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यावर मेट्रोची एकात्मिक चाचणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यानंतर आता लवकरच संशोधन डिझाइन आणि RDSOची चाचणी सुरू होणार आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर लवकरच मुंबई मेट्रो ३ सुरू होण्याची शक्यता असून मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

एमएसआरसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोची पहिली चाचणी पार पाडल्यानंतर मेट्रोची चाचणी घेण्यासाठी मेट्रो रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्डस ऑर्गनायझेशन (RDSO)कडे अर्ज पाठवण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील आरडीएसओ चाचणी जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. यावेळी मेट्रोचा वेग, यंत्रणा, सुरक्षा आणि रोलिंग स्टॉक तपासला जाणार आहे. RDSOकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अंतिम CRS चाचणीसाठी अर्ज केला जाणार आहे. त्यानंतर जुलैपर्यंत मुंबई मेट्रो ३ सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कारशेडही तयार

मेट्रो-३ कॉरिडॉरच्या पहिला टप्पा आरे कॉलनी ते बीकेसी दरम्यान सुरू होणार आहे. यासाठी गेल्या वर्षभरापासून मेट्रोची ट्रायल रन सुरू आहे. सिग्नलिंग सिस्टीम, टेलिकम्युनिकेशन, प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर आणि ट्रॅकच्या चाचणीचे कामही पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर एमएसआरसीने आरे कॉलनीत मेट्रो कारशेड उभारण्याचे कामही जवळपास पूर्ण केले आहे. पहिल्या टप्प्यात ९ गाड्यांसह मेट्रो सेवा सुरू होणार असून या ९ गाड्यांच्या तपासणीचे कामदेखील पूर्ण झाले आहे.

मुंबई मेट्रो ३ ची वैशिष्टये

मुंबई मेट्रो ३ कॉरिडॉरचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी अतिरिक्त ११ ट्रेन मुंबईत पोहोचल्या असून या गाड्यांच्या चाचणीचे काम सुरू करण्यात आले आहे. मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाची एकूण लांबी ३३ किमी असून यामध्ये एकूण २७ स्थानके असतील. पहिला टप्पा आरे ते बीकेसी दरम्यान असून यात १० स्थानके असणार आहेत.

मुंबई मेट्रो ३ मध्ये कोणती स्थानके असतील?

कफ परेड , विधान भवन , चर्चगेट मेट्रो , हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्टरोड , मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी , नेहरू विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिध्दीविनायक, दादर, शितळादेवी मंदिर, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रुज, विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी , सिप्झ, आरे ही स्थानकं असतील. यापैकी आरे सोडून सर्व स्थानकं भूमिगत असतील.

मुंबई मेट्रो ३ 'या' वेळेत धावणार

आरे-बीकेसी मार्गावर मेट्रो सुरु झाल्यानंतर येथे सुमारे ९ मेट्रो ट्रेन धावणार आहेत. त्यापैकी केवळ दोन मेट्रो ट्रेन देखभाल आणि स्टँडबायसाठी ठेवण्यात येणार आहेत. या ट्रेन सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत धावणार आहेत.

Comments
Add Comment