Saturday, July 6, 2024
Homeताज्या घडामोडीCannes 2024 : ‘ऑल वुई इमॅजिन अ‍ॅज लाईट’ने रचला इतिहास; भारताला ३०...

Cannes 2024 : ‘ऑल वुई इमॅजिन अ‍ॅज लाईट’ने रचला इतिहास; भारताला ३० वर्षांनंतर मिळवून दिला ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कार!

चित्रपटातील मराठमोळ्या छाया कदमचं सर्व स्तरांतून कौतुक

पॅरिस : जगातील मोठ्या फिल्म फेस्टिव्हल्सपैकी एक अशा ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये (Cannes film festival) यंदा भारतीय चित्रपटांचा (Indian Films) डंका वाजत आहे. भारतातील अनेक चित्रपटांना यात विविध श्रेणींमध्ये नामांकने मिळाली असून ही भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. मराठमोळी अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) हिच्या ‘ऑल वुई इमॅजिन अ‍ॅज लाईट’ (All we imagine as light) या सिनेमाला कान्समध्ये उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांकडून स्टँडिंग ओव्हेशन मिळालं. त्यामुळे छायाचं सर्वच स्तरांतून भरभरुन कौतुक होत आहे. यानंतर या चित्रपटाने पुन्हा एकदा भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाचं स्क्रीनिंग नुकतंच कान्स सोहळ्यात पार पडलं होतं. या भारतीय चित्रपटाला कान्समध्ये भरभरून प्रेम मिळालं. यानंतर चित्रपट महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पायल कपाडियाच्या या चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळाला. या चित्रपटाने महोत्सवात ऐतिहासिक कामगिरी करत ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कारावर (Grand Prix Award) आपलं नाव कोरलं आहे. पाल्मे डी’ओर नंतर ‘ग्रँड प्रिक्स’ हा चित्रपट महोत्सवातील दुसरा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे.

‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’चा प्रीमियर २३ मे रोजी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण्यात आला. गेल्या ३० वर्षांत महोत्सवाच्या मुख्य विभागात प्रदर्शित होणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. १९९४ मध्ये शाजी एन करुण यांचा ‘स्वाहम’ हा कान्सच्या मुख्य विभागात पोहोचणारा शेवटचा भारतीय चित्रपट होता.

पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटात कानी कुसरुती, दिव्या प्रभा, छाया कदम आणि हृदयू हारून यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पायल कपाडिया लिखित ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ ही केरळमधील दोन नर्सेसची कथा आहे. कथेच्या केंद्रस्थानी नर्स प्रभा आहे, तिची भूमिका कानी कुसरुतीने साकारली आहे. दरम्यान, मराठमोळ्या छाया कदम या चित्रपटाचा भाग असल्याने सध्या मराठी कलाविश्वातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. याशिवाय यंदा पाल्मे डी’ओर पुरस्कारावर ‘अनोरा’ चित्रपटाने आपलं नाव कोरलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -