Sunday, May 11, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीनाशिक

Nashik News : नाशिकवर डेंग्यूचे सावट! रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

Nashik News : नाशिकवर डेंग्यूचे सावट! रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

'अशी' घ्या काळजी


नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) गेल्या वर्षी डेंग्यूने (Dengue) थैमान घातले होते. आता स्वाइन फ्लूपाठोपाठ (Swine Flu) डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले असून, नाशिकमध्ये डेंग्यूने सध्या थैमान घातले आहे. सावधानता बाळगूनही अलीकडच्या आठवड्यात डेंग्यूच्या रुग्ण संख्येत नव्याने वाढ दिसून आली आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून सध्या नाशिकमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा आकडा ओलांडल्यामुळे घराघरांत कूलर, एसी आणल्यामुळे शहरात डेंग्यूच्या रुग्णांची वाढ झाली आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात अनेक घरांतील कूलरमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय विभागाने नागरिकांना सतर्क केले असून, रोज कूलरचे पाणी बदलण्याचे आवाहन केले आहे. तीन आठवड्यांत डेंग्यूचे १९ रुग्ण आढ‌ळले आहेत. तर जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ९० पर्यंत पोहोचली असून हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



यामुळे होतो डेंग्यू


डेंग्यू आजारांचा प्रादुर्भाव ‘एडीस एजिप्ती’ या प्रजातीच्या डासांमार्फत होतो. एडीस डासांची उत्पत्ती चार ते पाच दिवसांपेक्षा जास्त काळ साचलेल्या पाण्यात होते. यंदा उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे नाशिक शहरात कूलर आणि एसीचा वापरही वाढला आहे. कूलर आणि एसीमध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊन या ठिकाणी डेंग्यूच्या अळ्यांचे रूपांतर डासांमध्ये होत आहे. त्यामुळे अचानक तीव्र उन्हातही शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. वैद्यकीय विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे.



चिकनगुणियाचाही वाढला धोका


डेंग्यू आणि व्हायरलने शहर आधीच तापले असताना आता चिकनगुणियाचीही एंट्री झाली असून, महिनाभरात चिकनगुणियाचे १३ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे.



अशी घ्या काळजी



  • डेंग्यू, चिकनगुणिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घर आणि परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी.

  • नागरिकांनी पाण्याच्या टाक्या, बॅरल, हौद, रांजन, ओहरहेड टँक आदी आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ करून घासूनपुसून कोरडे करावे.

  • फ्रीजमागील ट्रे, कूलर, फिशटँक, एसी यामध्‍ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.


Comments
Add Comment