नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ यांनी २० मे रोजी अरविंद केजरीवालांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचाराने बरबटलेला पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील एका जाहीर सभेत योगी आदित्यनाथ म्हणाले की, आम आदमी पार्टीने राष्ट्रीय राजधानी दिल्लीला ‘नरक’ बनवले आहे. विरोधी पक्षांचा समूह ‘इंडिया’ ही विकासासाठी नव्हे, तर भ्रष्टाचारासाठी स्थापन झालेली आघाडी असल्याचेही ते म्हणाले. मयूर विहार फेज-३ येथील निवडणूक रॅलीदरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नावाचा उल्लेख करत ‘आप’ला कोंडीत पकडले.
मुख्यमंत्री योगी म्हणाले, “आप भ्रष्टाचारात बुडाली आहे. आपण त्यांना शक्तिशाली होऊ देऊ नका. तुम्ही त्यांना मत दिल्यास ते रक्तबीज सारखे पसरतील.”