Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडी‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सुधारित ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेस मुंबईत शुक्रवार, १७ मेपासून सुरूवात झाली आहे. ऑनलाईन प्रवेशाची अंतिम मुदत शुक्रवार, ३१ मे २०२४ पर्यंत असणार आहे. तत्पूर्वी पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असला तरी त्याचा या प्रवेशप्रक्रियेत विचार केला जाणार नाही. पालकांनी नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे, असेदेखील शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

आरटीईअंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्याच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून विनामूल्य प्रवेश दिले जातात. त्यानुसार, मुंबईतील ३१९ पात्र शाळांमधील आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ५,६७० जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशासाठी पालकांना महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal (www नाही) या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतील.

यापूर्वी सन २०२४-२०२५ या वर्षाकरिता ‘आरटीई’ २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यामुळे यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असला तरी बालकांच्या पालकांनी नव्याने प्रवेशअर्ज करणे बंधनकारक आहे. यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाचा सन २०२४-२५ या वर्षाच्या सुधारित आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी विचार केला जाणार नसल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.

सुधारित प्रवेशप्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन १७ मेपासून पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत. प्रवेशप्रक्रियेच्या अर्जासोबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता असणार नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांनी दिली आहे.

आरटीईअंतर्गत दुस-यांदा प्रवेश घेता येणार नाही

ज्या बालकांनी यापूर्वीच आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेश घेतला आहे, अशा बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेशअर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक व खासगी प्राथमिक शाळा विभाग) राजू तडवी यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -