Saturday, June 21, 2025

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप


मुंबई : कपट कारस्थान करण्यात आणि घराघरांमध्ये आग लावण्यात तरबेज असलेल्या संजय राजाराम राऊत यांनीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्या नावाला विरोध केला होता, असा पलटवार भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.


मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्यास देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह त्यांच्याच मंत्रिमंडळातील नेत्यांनी विरोध केला होता, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला आमदार नितेश राणे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. इतकेच नाही तर संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना ब्लॅकमेल करत होते, असा खळबळजनक आरोपही आमदार राणे यांनी केला आहे.


संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याकडे स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठी आग्रह धरला होता. इतकेच नाहीतर सामनाच्या कार्यालयातून देखील सर्व आमदारांना फोन करून संजय राऊत यांचे नाव घेण्यासाठी सांगण्यात आले होते, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. मुख्यमंत्री पदासाठी माझंच नाव सुचवा, त्यासाठी संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना ब्लॅकमेल करत होते, असा आरोप देखील नितेश राणे यांनी केला आहे. मला मुख्यमंत्री केले नाही तर मातोश्री मधील अनेक महत्त्वाची माहिती मी बाहेर सांगेन, अशी धमकी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना दिली होती, असा आरोपही आमदार राणे यांनी केला आहे.


दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांना विरोध करत होते. त्यांच्या नेतृत्वात आपण काम करणार नसल्याचा निरोप भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी मातोश्रीवर पाठवला होता. त्या नंतरच्या काळात महाविकास आघाडीची स्थापना झाली. त्यावेळी देखील एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर आल्यानंतर अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे यांनी त्याला विरोध केला, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या या दाव्याला आमदार नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Comments
Add Comment