देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून पाहण्याची संधी मिळत नाही. मुंबईतील घाटकोपर परिसरात बुधवारी रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. या रोड शोमध्ये झालेली अलोट गर्दी पाहता, मोदींची लोकप्रियता किती आहे, याचा प्रत्यय आला. घाटकोपरमधील अशोक सिल्क मिल समोरून रोड शोला सुरुवात झाली, तर पार्श्वनाथ मंदिर परिसरात रोड शोचा समारोप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रोड शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. पंतप्रधानांचा रोड शो होत असलेल्या मार्गावर दोन्ही बाजूंच्या फुटपाथवरही लोकांची गर्दी पाहायला मिळाली. संपूर्ण घाटकोपर भगवेमय झाले होते.
साधू-संत महात्मेदेखील रोडवर उतरले आहेत, तर काही वारकरी देखील मोदींचे स्वागत करण्यासाठी आले होते. समारोप होणाऱ्या जागेवर प्रभू श्रीरामांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. पुतळ्याला अभिवादन करून रोड शोचा समारोप झाला. या रोड शोसाठी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला. स्थानिकांनी नरेंद्र मोदी यांची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र होते. मात्र, शो मुळे मेट्रो सेवा काही काळ बंद ठेवण्यात आल्याने मुंबईकर प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे पंतप्रधानाच्या नियोजित कार्यक्रमामुळे मेट्रो सेवावर परिणाम होणार आहे याची कल्पना आधी एक दिवस प्रशासनाने दिली असती तर प्रवाशांची गैरसोय टळली असती.
विरोधकांकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर कितीही वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करण्यात येत असले तरी, जनतेच्या मनात आजही मोदी नावाची जादू कायम असल्याचे दिसून येते. मुंबई शहरात सर्व जाती-धर्माचे लोक राहतात. त्यामुळे मुंबईत लोकसभा निवडणुकीत सहा जागांपैकी जास्त जागा मिळतात, तोच पक्ष केंद्रात सत्तेवर असतो, असा आजवरचा इतिहास राहिलेला आहे. २०१४ आणि २०१९ या पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघांतून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने सहापैकी सहा जागा जिंकल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाला तीन खासदारकीच्या जागा मिळाल्या होत्या. त्यात मोदी नावाचा ब्रँड कारणीभूत होता, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.
ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही तत्त्वाशी तडजोड केली नव्हती, त्याच मुद्द्याला बगल देऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर घरोबा केला. त्यामुळे दुखावलेला हिंदुत्ववादी मतदार हा मोदींच्या पाठीशी आहे, हे सुद्धा पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोमुळे दिसून आले. भाजपावर टीका करणारे हे नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीवाले लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा अंदाज पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राच्या भूमीवरून मतदारांना दिल्यामुळे, हिंदू व्होट बँकेवर डल्ला मारणाऱ्या उबाठा सेनेचे पितळ उघडे पडले आहे. केंद्रात इंडी आघाडीचे सरकार आणण्याची भाषा नकली शिवसेनावाले करत आहेत; परंतु जे लोक स्वत:चा पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार असा टोला मोदी यांनी पवार-ठाकरेंना लगावला आहे.
२०१४ नंतर देश निराशेच्या गर्तेतून बाहेर पडला आणि आज घोडदौड सुरू आहे. येत्या काळात देश हा जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. २०४७ पर्यंत हा देश विकसित देश असेल असा सर्वांना विश्वास आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या कामामुळे लोक आता चांगले जाणतात, काय चांगले आणि काय वाईट याची लोकांना प्रचिती आली आहे. याचा धागा पकडून पंतप्रधान मोदी सांगतात की, माझे पूर्ण जीवन हे देशवासीयांना समर्पित आहे. भारतीय जनता पक्षाला ४०० पार नेण्याची लोकांची इच्छा असल्याने आम्ही पु्न्हा सत्तेत येणार आहोत. मुंबईतील रोड शोच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये विराट सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी उसळलेली दिसली. यावेळी बोलताना मोदी यांनी सांगितले की, हिंदू-मुस्लीम वाद केला जात असल्याचा आरोप आमच्यावर केला जातो. पण हा खेळ खेळणाऱ्यांचा ‘कच्चा चिठ्ठा खोल रहा है,’ असे बोलत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला आव्हान दिले.
आई-वडिलांची आठवण काढण्यासाठीही काँग्रेसवाले अल्बम उघडून पाहतात, अशी काँग्रेसची स्थिती आहे, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी मारला. ओबीसी, दलित आणि आदिवासींचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्यासाठी काँग्रेसने कर्नाटक ही प्रयोगशाळा केली आहे. कर्नाटकात सत्ता मिळाल्यावर एका रात्रीत ओबींसीचे आरक्षण मुस्लिमांना दिले गेले. देशात अशाच पद्धतीने मुस्लिमांना आरक्षण दिले जाण्याचा डाव आहे. ‘वोट जिहाद’ घडविले जात आहे. मात्र त्याचा महाराष्ट्रातील इंडी आघाडीच्या एकाही नेत्याने विरोध केला नाही, अशा काँग्रेसला महाराष्ट्रातील जनता मत देईल का?, असा सवालही मोदी यांनी केला. पंतप्रधान मोदी यांच्या रोड शोनंतर मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचे वातावरण तसेच कल्याण, भिंवडीमध्ये भाजपा आणि मित्रपक्षांना अनुकूल झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीवर मुंबईत तीन उमेदवार रिंगणात आहेत. मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे, यात तिळमात्र शंका नाही.