Tuesday, December 3, 2024

ईश्वरभाव

अठराव्या अध्यायात श्रीकृष्णांनी वर्णानुसार गुणांचं वर्णन करण्यास सुरुवात केली आहे. क्षत्रियांच्या ठिकाणी असणारा एक अत्यंत महत्वाचा गुण म्हणजे ‘ईश्वरभाव’ होय. प्रजेला उत्तमरीतीने वागविणे यालाच ‘ईश्वरभाव’ असे म्हणतात. सध्या पाहिले, तर राजेशाही जाऊन लोकशाही आली आहे. वर्णव्यवस्था आपण सारे दूर सारू पाहत आहोत. पूर्वी प्रजा राज्याच्या आज्ञेचं पालन करत असत. त्यावेळी आदर्श राजा होऊन गेले. त्यांनी प्रजेला जणू आपले अवयव मानले. म्हणून त्यांच्यासाठी प्राण अर्पण करण्यासाठी सुद्धा मावळे, सैनिक सदा सज्ज असायचे.

ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

आता निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. वर उन्हाचा वणवा आणि खाली प्रचारसभा, फेऱ्या इत्यादींच्या या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासकांनी आठवावी अशी ज्ञानेश्वरीतील ओवी! अठराव्या अध्यायात श्रीकृष्णांनी वर्णानुसार गुणांचं वर्णन करण्यास सुरुवात केली आहे. यात क्षत्रियांच्या ठिकाणी असणारा एक अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे ‘ईश्वरभाव’ होय. आज राजेशाही जाऊन लोकशाही आली आहे. वर्णव्यवस्था आपण दूर सारू पाहतो आहोत. परंतु ‘ज्ञानेश्वरी’तील या ओव्या मात्र आजही किती महत्त्वाच्या आहेत! पाहुयात.

‘आपल्या हस्तपादादिक अवयवांचे चांगले पोषण केले असता, त्याजकडून वाटेल ते काम करून घेता येते. त्याप्रमाणे प्रजेचे प्रेमाने पालन केले असता, सर्व प्रजा आनंदाने आज्ञापालन करते.’ ओवी क्र. ८७१. ही ओवी अशी –

पोषुनि अवयव आपुले। करविजती मानविले।
तेविं पालणें लोभाविलें। जग जे भोगणें॥
प्रजेला उत्तम रीतीने वागविणे यालाच ‘ईश्वरभाव’ असे म्हणतात. हा ‘ईश्वरभाव’ स्पष्ट करताना माऊली दाखला देतात, तो किती सार्थ!

आपल्याला मिळालेली देणगी म्हणजे मानवी जन्म होय. यात माणूस म्हणून आपल्याला लाभलं आहे, एक संपन्न शरीर होय. या शरीराचे हात, पाय इत्यादी विविध अवयव आहेत. या प्रत्येक अवयवाचं महत्त्व किती! अनमोल आहेत, हे सारे अवयव! पण माणूस म्हणून आपली जबाबदारी आहे, त्यांचं नीट पोषण करणं होय. त्यासाठी या अवयवांना योग्य तो आहार म्हणजे अन्न-पाणी, सूर्यप्रकाश देणं. यापुढे जाऊन त्यांचं योग्य ते चलनवलन करणं. त्यांना योग्य त्या प्रकारे, योग्य त्या प्रमाणात कामाला लावणं. हे सगळं केलं, तर त्यांच्याकडून आपल्याला वाटेल, ते काम करून घेता येतं, वाटेल त्या वयापर्यंत. याची उदाहरणं आपल्या भोवताली सापडतात. एव्हरेस्टवीर, अंतराळवीर हे यातील आदर्श होत. हे सर्व का होऊ शकतं? कारण मुळात हे अवयव आपले आहेत, त्यांना नीट राखणं, ही आपली जबाबदारी आहे, असं त्या माणसांना वाटत असतं.

हाच नियम राजा आणि प्रजेलाही लागू आहे. राजा प्रजेला आपलं मानेल, त्यांना आवश्यक त्या गोष्टी उपलब्ध करून देईल, तर प्रजा आनंदाने राजाच्या आज्ञेचं पालन करेल. इतिहासात आपले शिवाजी महाराज, सम्राट महाराणा प्रताप यांसारखे आदर्श राजे होऊन गेले. त्यांनी प्रजेला जणू आपले अवयव मानले. म्हणून त्यांच्यासाठी प्राण अर्पण करण्यासाठी सुद्धा मावळे, सैनिक सदा सज्ज असायचे.

आता या पार्श्वभूमीवर आपण आजच्या राजकारणाकडे नजर टाकली तर काय दिसतं? बहुतेक ठिकाणी आनंदी आनंदच आहे. हाताच्या बोटांवर मोजता येतील, असे राज्यकर्ते आहेत. जे ‘ईश्वरभावा’ने नागरिकांशी वागतात. त्यांचे प्रश्न समजून, उमजून घेतात. ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. अशा मंडळींना मग मताचा ‘जोगवा’ मागण्याची देखील गरज उरत नाही. अशा नेत्यांची संख्या वाढती राहो, हीच सदिच्छा!

manisharaorane196@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -