गुंतवणुकीचे साम्राज्य – डॉ. सर्वेश सुहास सोमण
सध्या तेजीच्या लाटांवर स्वार असणाऱ्या भारतीय शेअर बाजाराची या आठवड्याची सुरुवात घसरणीने झाली. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी गेल्या काही दिवसांच्या तेजीनंतर थोडी विश्रांती घेणेच पसंद केले. त्यामुळे निर्देशांक नकारात्मक अवस्थेतच बंद झाले. मंगळवारच्या सत्रात मात्र निर्देशांकामध्ये जोरदार घसरण दिसून आली. या घसरणीनंतर बुधवारच्या सत्रात पुन्हा थोडी तेज आली आणि गुरुवारच्या सत्रात पुन्हा निर्देशांकानी मोठी घसरण दर्शविली. आता निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणाचे मतदान पूर्ण झालेले असून, काही ठिकाणचे मतदान अजून शिल्लक आहे.
सत्ता कोणाची येणार, हे कळण्यासाठी जून महिन्याची वाट बघावी लागणार आहे. मात्र या कालावधीत गुंतवणूक करीत असताना, अत्यंत सावधानता बाळगणे आवश्यक आहे. उरलेले मतदान प्रक्रियेचे टप्पे जसे जसे पूर्ण होऊ लागतील, तशी शेअर बाजारात तेजी आणि मंदी अशा दोन्ही बाजूने हालचाल होणे अपेक्षित आहे. थोडक्यात शेअर बाजारात मोठी हालचाल होऊ शकते. सध्या जरी शेअर बाजाराची दिशा तेजीची असली, तरी ज्यावेळी निवडणुकीचे निकाल हाती येतील आणि सत्ता कोणाची येणार हे निश्चित होईल, त्यानंतरच शेअर बाजाराचा मध्यम मुदतीचा ट्रेंड अधिक सुस्पष्ट होईल.
त्यामुळे पुढील महिन्यात येणारा निकाल लक्षात घेता घाई-गडबड करून एकदम शेअर्सची खरेदी करणे टाळावे. निर्देशांकाची दिशा आणि गती ही तेजीची असून, निर्देशांक निफ्टीची २१७०० ही महत्त्वाची पातळी आहे. जोपर्यंत निर्देशांक या पातळीच्यावर आहेत, तोपर्यंत निर्देशांकामधील तेजी कायम राहील. शेअर्समध्ये व्यवहार करीत असताना, निर्देशांकाच्या वरील पातळ्या लक्षात ठेवून, तेजीची दिशा असणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
शेअर बाजारात या आठवड्यात झोमॅटो, हिरोमोटो कोर्प, पॉलीकॅब, व्ही गार्ड यांनी चमकदार कामगिरी केली. सद्यस्थितीला अल्पमुदतीचा विचारकरिता टीमकेन, थॉमस कुक, कॅम्स यांसह अनेक शेअर्सची दिशा ही अल्प तसेच मध्यम मुदतीसाठी तेजीची आहे. सध्या निर्देशांक जरी तेजीत असले, तरी यापुढे शेअर्स खरेदी करीत असताना सावध पवित्रा आणि मर्यादित जोखीम घ्या. या आठवड्यात देखील कच्चे तेलामधील घसरण कायम राहिली. यापुढे जोपर्यंत कच्चे तेल ६८०० या पातळीच्या खाली आहे, तोपर्यंत अल्पमुदतीच्या चार्टनुसार कच्च्या तेलामध्ये आणखी घसरण होणे अपेक्षित आहे. कच्च्या तेलाची ६३०० ही अत्यंत महत्त्वाची पातळी असून, याच्या खाली कच्चे तेल आले, तर कच्च्या तेलात आणखी घसरण होऊ शकते.
(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)