मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट
ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राजकीय पक्षांच्या (Political Parties) प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. अनेक मोठमोठे नेते आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेत आहेत. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज महायुतीचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या प्रचाराकरता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात पोहोचले. यावेळेस त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. दिघेसाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी सगळ्यात पहिला प्रश्न त्यांच्या प्रॉपर्टीविषयी विचारला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. शिवाय ठाकरे आपल्याला आनंद दिघेंवर सिनेमा काढू देत नव्हते, असंही शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आनंद दिघे (Anand Dighe) यांचे निधन झाल्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न होता की, दिघे यांची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे? ते ऐकून मला वाटलं की, आपण चुकीच्या जागी आलो. उद्धव ठाकरे मला दिघे साहेबांचा सिनेमाही काढून देत नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांचा सिनेमा निघाल्यानंतर दिघे साहेबांचा सिनेमा काढला म्हणून वेळ लागला. त्यातही अर्धा सिनेमा पाहून उद्धव ठाकरे निघून गेले. आता पार्ट २ येतोय, आता जे काय खरं खरं आहे ते या सिनेमामध्ये दिसेल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांच्यावरही टीकास्त्र डागले. ते म्हणाले, निवडणुकीच्या काळात राजन विचारे कार्यकर्त्यांना ना पैसे द्यायचा, ना वडापाव खाऊ घालायचा. तरीही मी सांगायचो म्हणून सगळे काम करायचे. आता राजनचा सीझन संपला, नरेशचा विजय आता पक्का आहे. पण संजय केळकरांची विनंती आहे की, नरेश तुला थोडं बदलावं लागेल, असे शिंदे यांनी म्हटले. ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांनी चिंता करु नका. मला काही जणांना तिकडे पाठवायचे आहे, काहीजणांना इकडे ठेवायचे आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेंचा नगरसेवकांना इशारा
या सभेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचा इशारा आणि काही सूचना दिल्या. २० तारखेपर्यंत कोणीही सुट्टी घेऊ नका. मोदीजींनी एकही सुट्टी घेतली नाही. एकनाथ शिंदेही एकही दिवस सुट्टी घेत नाही. घराघरात जा आणि लोकांना मतदान करायला सांगा. सकाळी सकाळी जाऊन लोकांना भेटा. सुट्टीत गावी जाणाऱ्या लोकांना मतदान करायला सांगा. मतदार बाहेर गेले असतील तर त्यांना इकडे आणण्याची प्रक्रिया आपण करु. नगरसेवकांची ही ट्रायल निवडणूक आहे. काम केलं तर तिकीट नाहीतर मग?, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.