Wednesday, April 23, 2025
Homeब्रेकिंग न्यूजडॉ. बाबासाहेबांची बनवलेली घटना बदलणे शक्य नाही

डॉ. बाबासाहेबांची बनवलेली घटना बदलणे शक्य नाही

काँग्रेसने ६५ वर्षात ८० वेळा घटना बदलली त्याचे काय? – नारायण राणे यांचा सवाल

लांजा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपाचे सर्वच लोक हे लोककल्याणाच्या माध्यमातून काम करत आहेत. त्यामुळे कोणत्याही रागाने, द्वेषाने डॉ.बाबासाहेबांची घटना बदलणार नाहीत. मात्र ६५ वर्षे सत्ता भोगलेल्या काँग्रेसने ८० वेळा देशाची राज्यघटना बदलली, त्याचे काय? असा परखड सवाल केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी लांजा येथील महायुतीच्या सभेत उपस्थित केला.

केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शहरातील शहनाई हॉल या ठिकाणी प्रचारसभा पार पडली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे लोकसभा संयोजक आणि माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार मधु चव्हाण, संदीप कुरतडकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की, शिवसेना आता संपलेली आहे. उद्धव ठाकरेंनी कोकणासाठी काय दिले? दोन-चार कंपन्या तरी आणल्या का? पाच पन्नास लोकांना रोजगार दिला का? तो कोकणात येतो ते मासे आणि कोंबडीवडे खायला. दहा वर्षे खासदार असणाऱ्या राऊतने काय केले? उद्धव ठाकरे म्हणतो मोदींनी दहा वर्षात काय केले?, आता हे शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स लावतील. मात्र शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स लावत नाहीत, तो उद्योगधंद्यांना का लावला जातो याची त्याला काहीही माहिती नाही. देशाच्या, राज्याच्या लोकांच्या अपेक्षा काय आहेत काही माहिती नाही. केवळ कॅमेरा उघडायचा आणि बंद करायचा एवढेच काम. एक नंबरचा खोटारडा माणूस.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, दाढी वाढवून आणि खिशात हात घालून ते फिरतात. मोदींनी घटना बदलली, मोदीजी घटना बदल रहे है अशा बोंबा मारतात. मात्र काँग्रेसची ६५ वर्षे सत्ता असताना ८० वेळा घटना बदलली त्याचे काय? असा रोखठोक सवाल नारायण राणे यांनी करतानाच कोणत्याही रागाने, द्वेषाने बाबासाहेब यांची घटना बदलणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले.

विरोधी पक्ष म्हणतात भाजप हा जातीयवादी पक्ष आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी सांगितले की आमचा पक्ष जातीवादी पक्ष नाही. माझ्यासमोर चारच जाती आहेत महिला, युवा, शेतकरी आणि गरीब. आणि माणसाला जात नाही तर पोट असते.आणि पोटाला जात नसते. पंतप्रधान मोदी हे दिवसातून १८-१८ तास काम करत असतात, असे नारायण राणे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -