Thursday, July 18, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यआपल्यासोबत कोणी माफिया गेम तर खेळत नाही ना?

आपल्यासोबत कोणी माफिया गेम तर खेळत नाही ना?

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

सन १९८७ मध्ये Dmitry Davidoff नावाच्या मानस शास्त्रज्ञाने माफिया गेम हा एक सोशल गेम शोधून काढला होता. ही ऐक सायकॉलॉजिकल संकल्पना असून आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला समजल्यास आपण त्यातून खूप काही शिकू शकतो आणि आपले आयुष्य सुखावह करू शकतो. या गेमबद्दल थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, एका छोट्याशा गावात १०-१५ जण रहिवासी मिळून हा गेम खेळतात. या १०-१५ नागरिकांच्या गावात नागरिकांपैकीच २-३ जण हे माफिया म्हणजेच गुंड असतात. कोणत्याही नागरिकाला हे माहीत नसते की आपल्यात नेमके कोण माफिया आहे. या गेमचा उद्देश असा असतो की, जर तुम्ही माफिया असाल, तर कोणालाही तुम्ही लक्षात यायच्या आत सर्व नागरिकांना मारून टाकायचे आहे. जर तुम्ही सर्वसामान्य नागरिक असाल, तर तुम्हाला आपल्यातील नेमके कोण माफिया आहे हे शोधून काढायचे आहे. गेम खेळत असताना कोणाचाही खून होण्याआधी माफिया ओळखणे आणि त्याचा बंदोबस्त करणे हे खूप मोठे आव्हान सगळ्यांसमोर असते.

सायकॉलॉजिस्टने जितक्या वेळा हा गेम खेळायला लावला, तेव्हा या गेममध्ये सातत्याने हेच पाहिले गेले की ९० टक्के वेळी यात माफियाच जिंकले आहेत. असे का झाले? सर्वसामान्य नागरिक का जिंकू शकले नाहीत? ते माफियाचा नायनाट का करू शकले नाहीत? स्वतःला का वाचवू शकले नाहीत? जास्त संख्या चांगल्या नागरिकांची असून पण कमी संख्येने असलेले माफिया का भारी पडले? या प्रश्नाचे उत्तर आपण या लेखाद्वारे समजावून घेऊन सायकॉलॉजीची आणि manupulation ची अजून एक नवीन संकल्पना समजावून घेणार आहोत. हा गेम सर्वसाधारण गेम नसून, अर्धवट माहितीचा आधार घेणं, खरी माहिती समजावून न घेणं, चुकीचं बोलणं, खोटी बाजू पटवून देणं, खोटं बोलणं, गैरसमज पसरवणं, अफवा पसरवणं, खरी माहिती लपवून ठेवणं, दुसऱ्याला वेड्यात काढणं यावर केलेले खूप मोठे संशोधन आणि प्रयोग (research and experiment) आहे.

सर्वसामान्य नागरिक का हरतात?, त्यांची संख्या जास्त असून पण ते सत्य का शोधून काढू शकत नाहीत? तर त्यांच्यामध्ये असलेल्या एकीचा अभाव, आपापसातील मतभेद, एकमेकांवरील अविश्वास याचा माफिया टीम पूर्णपणे गैरफायदा घेते. एकत्र येणे, बोलणे, विचारविनिमय करून योग्य निष्कर्ष काढणे यापासून माफिया लोक नागरिकांना कायम लांब ठेवतात. नागरिकांचे एकमेकांत भांडण कसे होईल, ते कधीच एकत्र कसे येणार नाहीत, यांना आपण ओळखूच येणार नाही याची पुरेपूर तयारी माफिया टीमने केलेली असते. नागरिकांमध्ये मिसळून, त्यांच्यात राहून माफिया रोज एकाचा खून करत असतात. नागरिकांना रोज प्रश्न पडतो की, आपल्यातील कोण असे आहे जो हे कृत्य करत आहे? या ठिकाणी माफिया मात्र अत्यंत शांतपणे सगळ्यांशी वागताना, बोलताना, वावरताना त्यांना त्यांची ओळख लागू देत नाहीत, तर उलट असे काही प्रश्न आणि शंका उपस्थित करतात ज्यामुळे नागरिकांना एकमेकांचा संशय येईल. नागरिकांमध्ये तेढ निर्माण होईल, bluff ( जी गोष्ट खरी नाही ती खरी आहे असे लोकांना खात्रीपूर्वक सांगून त्यांचा त्यावर विश्वास बसवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणे) चा वापर करून, इतरांना स्वतःच्या चुकीच्या विचारांनी प्रभावित करून, माफिया स्वतःचे हेतू साध्य करण्यात यशस्वी होत राहतात. यात चांगल्या लोकांचा बळी जात राहतो, त्यांच्यात भांडण लागत राहतात, ते एकमेकांपासून दुरावत जातात.

खरे माफिया कोण? आपल्यासमोरील खरं संकट काय? त्यातून कसा मार्ग काढायचा हे सोडून सर्व चांगले नागरिक भलत्याच किरकोळ विषयावर वाद घालत राहतात. कारण त्यांची तशी दिशाभूल केलेली असते आणि त्यांच्या कमकुवत बुद्धिमत्तेचा आणि माहितीच्या अभावाचा माफियांनी फायदा करून घेतलेला असतो. आपल्यासोबत, आपल्या कुटुंबात, ऑफिसमध्ये, समाजात, नात्यात सुद्धा आपल्याला हा माफिया गेम अनेकदा अनुभवायला मिळतो.

आपल्याच घरातील, ओळखीतील, नात्यातील, संपर्कातील लोक त्यांचे वैयक्तिक हेतू, स्वार्थ साधण्यासाठी आपला तसेच इतरांचा सुद्धा खूप चुकीच्या पद्धतीने वापर करत असतात. आपण देखील लोकांची खरी पारख करू न शकल्यामुळे, त्यांना ओळखू न शकल्यामुळे, त्यांचं खरं रूप आणि व्यक्तिमत्त्व समजण्यात चूक केल्यामुळे, त्यांच्या उद्देशांची शहानिशा करू न शकल्यामुळे स्वतःचं अतोनात नुकसान करून घेत असतो.

आपण ज्या घरात, कुटुंबात, समुदायात, समाजात राहतो, जिथे काम करतो, तिथे वाईट, चुकीच्या लोकांची संख्या खूप कमी असते. चांगल्या सद्गुणी, सदविचारी लोकांची संख्या खूप असते. पण चांगल्या लोकांमध्ये एकमत, एक विचार, एक ध्येय आणि एकच ध्यास नसल्याने, कमी संख्या असणाऱ्या चुकीच्या लोकांचे फावते आणि ते चांगल्या लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात.

माफिया टीमला म्हणजेच वाईट हेतू असणाऱ्या लोकांना प्रत्येकाबद्दल सखोल आणि खरी माहिती असते. प्रत्येकाचे स्वभाव, त्यातील बारकावे, गुण, अवगुण, कमजोरी, भावना त्यांनी ओळखलेल्या असतात. यांनाच एकमेकांच्या विरुद्ध वापरून स्वतःचा डाव कसा साधायचा याचा अभ्यास माफिया टीमने केलेला असतो. याच कौशल्याचा वापर ते चांगल्या वृत्तीच्या पण एकी आणि सामंजस्य नसलेल्या लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी करतात.

आपल्याला जर माफिया टीमचा शिकार व्हायचे नसेल, तर माफिया टीममध्ये आपल्यातीलच कोणकोणते लोक सहभागी आहेत हे ओळखायला शिका. माफिया टीमवाले आपल्याबद्दल उलट-सुलट चर्चा करत आहेत का? आपला अपप्रचार करून, बदनामी करून आपल्याला इतरांच्या नजरेत कमी करत आहेत का? आपले एकमेकांबद्दल मत कलुशीत करत आहेत का? जास्त संख्या असून पण योग्य वैचारिक कुवत नसल्याने आपल्यामध्ये ते भांडण लावत आहेत का? स्वतःची खरी ओळख आणि नाव लपवून, हेतू लपवून, आपल्यात राहून, आपले बनून आपलेच नुकसान करत आहेत का? आपल्या सगळ्यांमध्ये अंतर वाढेल, दुश्मनी होईल, फूट पडेल यासाठी प्रयत्न करत आहेत का? यावर सावध राहून विचार करणे आवश्यक आहे.

अनेकदा आपण हेच पाहतो की चुकीची वृत्ती, प्रवृत्ती चांगल्या वृत्तीला कायम वरचढ ठरतात. If the majority is not united a small minority can always rule them या उक्तीनुसार नुसते सदस्यांची किंवा लोकांची जास्त संख्या असून उपयोग नाही, तर त्यांच्यात एकी आणि एकविचार पण हवा अन्यथा अल्प संख्या असलेले तुमच्यावर राज्य करू शकतील. अशा माफिया टीम आपल्या कुटुंबात, घरापासून ते समाजात, राजकारणात सगळीकडे सक्रिय असतात. दोन-तीन लोकं जे चुकीच्या गोष्टी करत असतात, नैतिकता सोडून वागत असतात, मनमानी करत असतात. त्यामुळे नुकसान सगळ्यांचे होत असते. त्रास सगळ्यांना होत असतो.

मन:स्तापाला सगळे सामोरे जात असतात. पण केवळ या वाईट प्रवृत्ती आणि त्यांचे स्वार्थी हेतू वेळेत लक्षात न आल्यामुळे आपण त्यांना ओळखू शकत नाही. अनेकदा आपल्या घरात, आजूबाजूला, समाजात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी लक्षात येऊन पण त्याकडे दुर्लक्ष करत राहिल्यामुळे, वेळीच त्याला लगाम न घातल्यामुळे चुकीच्या लोकांचा बेरडपणा, आत्मविश्वास, अहंकार वाढत जातो. चांगल्या प्रवृत्तीला, चांगल्या विचारांना पायदळी तुडवून ही वाईट आणि चुकीची माणसं अजून चुकीचं वागत राहतात. चांगल्या वृत्तीना ते एकत्र येऊ देत नाहीत, त्यांच्यातील वातावरण कायम कसे धुमसत राहील, ते कायमच कसे एकमेकांना जबाबदार धरून आपापसात मारामाऱ्या करतील हेच माफिया टीम करत राहते.

चुकीचे काम करणारे लोक त्यांच्या चुका इतरांना लक्षात येऊ नये म्हणून दुसराच, संदर्भहीन विषय मोठा करून मूळ मुद्द्यावर कसे कोणी एकत्र येणार नाही हेच पाहतात. यामुळे आपल्याला आपल्या चुकांबद्दल कोणी प्रश्न विचारू शकणार नाही, असे दाणे टाकून कोंबड्या झुंझवत ठेवायच्या आणि आपले कुकर्म, दुराचार सुरू ठेवायचे याप्रमाणे सुरू राहते. चांगली माणसे मात्र बौद्धिक, मानसिक, भावनिक बाबतीत कमकुवत ठरतात आणि स्वतःची दिशाभूल करून घेतात.
meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -