उबाठा सेनेचे पक्षप्रमुख नुकतेच कोकणात जाऊन आले, कोकणवासीयांना काही देण्यासाठी नव्हे, तर आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मते मागण्यासाठी गेले होते. बरे झाले. निवडणुकीच्या निमित्ताने पक्षप्रमुखांना कोकणवासीयांची आठवण झाली. जमवलेल्या गर्दीपुढे मोठा आवेश आणून राणा भीमदेवी थाटात त्यांनी भाजपाला, मोदींना आणि नारायण राणेंना आव्हान दिले. नरेंद्र मोदी-अमित शहा आणि नारायण राणे यांच्यावर टीका केल्याशिवाय पक्षप्रमुखांचे भाषण पूर्ण होत नाही. किंबहुना या त्रयींवर शिवराळ भाषेत टीका करणे हाच त्यांचा अजेंडा बनला आहे.
पक्षप्रमुख हे कोकणातील मतदारांकडे मते मागायला गेले होते की, आग लावायला असा प्रश्न तेथील जनतेला पडला आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, आता विरोधी पक्षात आहेत. त्यांचा पक्ष आता कुठेच सत्तेवर नाही. राज्याची सत्ता, मुख्यमंत्रीपद, पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह गमावल्यापासून पक्षप्रमुख अस्वस्थ आहेत. म्हणूनच प्रत्येक सभेत ते अब की बार, भाजपा तडीपार अशी घोषणा देत आहेत. आपली ताकद किती, आपली कुवत किती, देशपातळीवर सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला तडीपार करण्याची घोषणा देणे म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात वावरण्यासारखे आहे. पाच खासदारांच्या जीवावर आणि सोळा आमदारांच्या ताकदीवर शक्तिशाली भाजपाला तडीपार करणे कसे शक्य आहे. समोर बसलेली काही टोळकी टाळ्या वाजवतात म्हणून ते बोलत असावेत.
भाजपाला निर्यात करा, भाजपाला सातासमुद्रापार पाठवा अशा वल्गना करणे पक्षप्रमुखाला शोभते का? आता आपण भाजपाबरोबर नाही, म्हणून मोदींविषयी काहीही बोलावे, हे परिपक्वपणाचे लक्षण नव्हे. मोदींना मत म्हणजे विनाशाला मत असे सांगणे म्हणजे पक्षप्रमुखांचा तोल सुटला आहे. दहा वर्षांच्या कारकिर्दीत मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशाचा चेहरा-मोहरा बदलला. महिला, शेतकरी, गोरगरीब, सामान्य जनतेच्या हिताच्या अनेक योजना सुरू केल्या, हे कदाचित पक्षप्रमुखांना ठाऊक नसावे. मोदींचे फोटो लावूनच सन २०१९ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकीला महाराष्ट्रात पक्षप्रमुखांनी मते मागितली होती, याचाही पक्षप्रमुखांना विसर पडला असेल. अविभाजित शिवसेनेचे जे आमदार, खासदार निवडून आले त्यात मोदींच्या लोकप्रियतेचा वाटा मोठा होता, हे पक्षप्रमुख आता मान्य करणार नाहीत.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्यावर पक्षप्रमुखांना ते दोन पक्ष गोड वाटू लागले व हिंदुत्वावर आधारित असलेली भाजपाबरोबरची युती नकोशी वाटू लागली. स्वत: मुख्यमंत्री व आपला मुलगा कॅबिनेटमंत्री अशी चारही बोटे दुधा-तुपात अडीच वर्षे होती. पण तेव्हा त्यांना कोकणातील जनतेची आठवण झाली नाही. वादळ, पाऊस, अतिवृष्टी व पुराचा तडाखा अशी आपत्ती कोकणावर कोसळली असतानाही राज्याच्या प्रमुखपदावर असताना पक्षप्रमुखांनी एक दमडाही कोकणाला दिला नाही. आता मात्र मोदी-शहा व राणेंवर बेलगाम टीका करून कोकणातील जनतेकडे मतांचा जोगवा मारत ते फिरत आहेत.
गेली अनेक वर्षे शिवसेनाप्रमुखांच्या काळात कोकण हा सेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. नारायण राणे शिवसेनेत असताना त्यांनी मोठी मेहनत घेऊन कोकण हा शिवसेनेचा भक्कम किल्ला बनवला. कोकणात घराघरांत शिवसेना पोहोचली त्यात राणे यांचे योगदान सर्वात मोठे आहे. आज उदय सामंत व दीपक केसरकर हे राज्याचे दोन्ही कोकणातील मंत्री राणे यांच्याबरोबर भक्कमपणे उभे आहेत. सामंत किंवा केसरकर हे राणे यांचे काम करणार नाहीत अशा किती तरी पुड्या उबाठाच्या गोटातून सोडण्यात आल्या. शिवसैनिकांमध्ये चलबिचल निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खंबीरपणे राणेसाहेबांच्या पाठीशी उभी आहे. राणे म्हणे तीन दशके सत्तेच्या परिघात सातत्याने आहेत म्हणून त्यांनी कोकणला काय दिले असा प्रश्न पक्षप्रमुख विचारतात. पण त्याचे उत्तर मतदारच ७ मे रोजी मतपेटीतून देणार आहेत. जेव्हा राणेंकडे तुम्ही एक बोट दाखवता तेव्हा तुमची चार बोटे, स्वत:कडे रोखलेली असतात हे पक्षप्रमुखांनी विसरू नये.
पक्षप्रमुख अडीच वर्षे मुख्यमंत्री होते त्यांनी कोकणाला या काळात काय दिले, याचा हिशेब त्यांनी जाहीरपणे मांडावा. कोकणात त्यांनी किती रोजगार दिले, किती लहान- मोठे उद्योग आणले हे जनतेला सांगावे. उलट केंद्र सरकार जे मोठे प्रकल्प आणू इच्छित आहे, त्याला विरोध करून त्यात खोडा घालण्याचेच काम उबाठा सेनेने केले आहे. सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाला उबाठा सेनेचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार विनायक राऊत यांनी स्पष्ट विरोध केला होता, तेच राऊत विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सर्वात पुढे मिरवायला होते. नारायण राणेंनी त्यांच्या साईजचा तरी प्रकल्प कोकणात आणला काय, असा प्रश्न विचारणे हे पक्षप्रमुखांच्या कद्रुपणाचे लक्षण आहे. राणेंनी कोकणासाठी काय काय केले, याची यादी बरीच मोठी आहे.
कोकणात जाण्यापूर्वी पक्षप्रमुखांनी मातोश्रीवर अगोदर अभ्यास केला असता, तर राणेंवर अशी वैयक्तिक टीका करण्याची त्यांच्यावर पाळी आली नसती. उदय सामंत व दीपक केसरकर हे नारायण राणेंचा हिरीरीने प्रचार करीत आहेत, देवेंद्र फडणवीस यांचीही जबरदस्त सभा झाली, अमित शहा व योगी आदित्यनाथ यांच्याही सभा होणार आहेत. मनसेने राणेंच्या प्रचारासाठी मोठी सभा योजली होती व आता स्वत: राज ठाकरेही राणेंच्या प्रचाराला येणार आहेत. हे सर्व पाहून पक्षप्रमुखांची पोटदुखी वाढली आहे. त्यांना तुतारी व पंजा यांना बरोबर घेऊन काम करावे लागते आहे, हे त्यांच्या पक्षाचे दुर्दैव आहे.