Tuesday, April 22, 2025
Homeदेशजगात महिलांची पाटी कोरीच! पण भारतीय जनता पार्टीने दिली महिला उमेदवारांना सर्वाधिक...

जगात महिलांची पाटी कोरीच! पण भारतीय जनता पार्टीने दिली महिला उमेदवारांना सर्वाधिक संधी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांत फक्त २३५ महिलांनाच मिळाले तिकीट

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) पहिल्या दोन टप्प्यातील २ हजार ८२३ उमेदवारांपैकी फक्त २३५ म्हणजेच आठ टक्के महिला उमेदवार रिंगणात होत्या. यामुळे राजकारणात महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी राजकीय पक्षांकडून केले जात असलेले दावे अतिशय पोकळ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील एकूण १३५ महिला उमेदवारांपैकी तब्बल ७६ महिला उमेदवार एकट्या तामिनाडूमधील होत्या. तर दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक २४ महिला उमेदवार केरळ राज्यात होत्या. या दोन्ही टप्प्यात भारतीय जनता पार्टीने अन्य पक्षांच्या तुलनेत महिला उमेदवारांना जास्त संधी दिली. या दोन्ही टप्प्यात भाजपने एकूण ६९ महिला उमेदवारांना तिकीट दिले तर काँग्रेस पक्षाने ४४ महिला उमेदवारांना संधी दिली.

जगभरातही महिलांची पाटी कोरीच!

मागील वर्षात ज्या ५२ देशांमध्ये निवडणुका झाल्या त्यातील सहा देश असे आहेत जिथे पाच पेक्षा कमी महिला खासदार आहेत. ओमान देशात तर एकही महिला निवडून आलेली नाही. मागील एक वर्षाच्या काळात संसदेतील महिलांच्या भागीदारीत काहीच सुधारणा झालेली नाही. जगभरात महिलांच्या राजकारणातील प्रतिनिधीत्वाबाबतही उदासिनता दिसून येते. राजकीय पक्ष शक्यतो महिलांना उमेदवारी देण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत, हेच यावरून सिद्ध होत आहे.

भारताचा विचार केला तर परिस्थिती फार काही वेगळी नाही. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत ७८ महिला उमेदवार निवडणूक जिंकून संसदेत पोहोचल्या होत्या. यातील १२ महिला अशा होत्या ज्यांनी तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा निवडणूक जिंकली आहे. भाजप नेत्या मेनका गांधी रेकॉर्ड ८ वेळा निवडणूक जिंकून संसदेत पोहोचल्या होत्या. त्यामुळे भारतीय राजकारणातही महिलांची स्थिती फार काही वेगळी नाही, असेच म्हणावे लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -