
जेम्स वेब टेलिस्कोपने करणार संशोधन, इतक्या महिन्यांत मिळणार निष्कर्ष
मुंबई : पृथ्वीप्रमाणेच अंतराळात आणखी एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का किंवा ब्रह्मांडात याच पृथ्वीसारखी दुसरी पृथ्वी अस्तित्त्वात आहे का याचा शोध संशोधक सतत घेत असतात. ही प्रक्रिया गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. आता पृथ्वीपासून १२४ प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या एका ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत वैज्ञानिकांना मिळाले आहेत. तर त्या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी जगातील सगळ्यात मोठा स्पेस टेलिस्कोपची मदत घेण्यात येणार आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, हा ग्रह K2-18b या ताऱ्याभोवती परिक्रमा करत आहे. या ग्रहावर देखील पृथ्वीप्रमाणेच महासागर असल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. या ग्रहावर डायमिथाइल सल्फाइड (DMS) असल्याचं जेम्स वेब टेलिस्कोपने दिलेल्या डेटावरुन लक्षात येत आहे. हा वायू फक्त सजीवांमधून बाहेर पडतो. त्यामुळे या ग्रहावरील समुद्रात जीवन असल्याचं वैज्ञानिक म्हणत आहेत.
जेम्स वेब करणार निरीक्षण
जगातील सगळ्यात मोठा स्पेस टेलिस्कोप जेम्स वेब (James Web) आता या ग्रहाचं सखोल निरीक्षण करणार आहे. जरी या ग्रहावर एलियन नसले, तरी सजीवांच्या अस्तित्वाशिवाय DMS वायू कसा तयार होऊ शकतो हेदेखील वैज्ञानिकांना समजू शकणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे संशोधन आपल्या फायद्याचं ठरणार आहे.
सहा महिन्यांत मिळणार निष्कर्ष
हा ग्रह पृथ्वीपासून तब्बल १२४ प्रकाशवर्षे दूर आहे. अगदी नासाच्या व्हॉयजर अंतराळयानाच्या गतीने जरी प्रवास केला, तरी त्या ग्रहापर्यंत पोहोचायला आपल्याला २२ लाख वर्षे लागतील. अर्थात, जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने याचं निरीक्षण करणं तरीही शक्य आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये या संशोधनाचे निष्कर्ष येण्याची शक्यता आहे.