मराठी रंगभूमीला समृद्ध करणारे एक महत्त्वाचे अंग म्हणजे ‘बालनाट्य.’ आबालवृद्धांनी बालांसाठी केलेले बालभावविश्वाचे नाटक म्हणजे बालनाट्य. ही साधीसोपी व्याख्या आजवर मराठी बालनाट्य जगवत आली आहे. मराठी व्यावसायिक कलाकार नाटक करण्याच्या नादात नाटक विकसित करत गेले, परंतु त्यातले काही रंगकर्मी मेन स्ट्रीमवर नाटक करता-करता जन्माला घातलेली रंगभूमीच विसरले आणि त्यांचा ऱ्हास आजमितीला होताना दिसून येतो आहे.
कामगार रंगभूमी, जैवरंगभूमी (लिव्हिंग थिएटर), मृषा रंगभूमी (ॲब्जर्ड थिएटर), निकट रंगभूमी (इंटिमेट थिएटर) या लयाला जाणाऱ्या रंगभूमीच्या बरोबर बालरंगभूमी लयाला जातेय की काय? अशी भीती निर्माण झाली होती. कोविड पूर्व काळात मराठी बालनाट्यांवर निकृष्ट दर्जाची किड पसरली होती. सुट्ट्यांमध्ये येणारी बालनाट्ये बघितली की हबकूनच जायला होई. नाटकाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नाटकातील मुलांकरवी धिंगाणा घातला जाई. या नाटकांना ना गोष्ट, ना नेपथ्य, ना दिग्दर्शन, ना अभिनय. एखादा प्रसंग इम्प्रोव्हाईज करून त्याचा शेवट एखाद्या उडत्या हिंदी चित्रपट गीताने करायचा आणि नाटक बघणाऱ्या मुलांना स्टेजवर नाचण्यासाठी बोलवायचे. कलाकारांबरोबर नाचायला मिळतंय, या आनंदात मुले स्टेजवर जात, मुलं नाचायला गेली की, त्यांचे पालक मोबाईल घेऊन मुलांचे फोटो काढण्याच्या उत्सवाला उधाण येत असे. यालाच बालनाट्य म्हणतात, असं वर्तमानपत्रांच्या जाहिरातीतून सांगण्यात येई. मराठी बालरंगभूमी या पातळीपर्यंत घसरलेली माझ्या बघण्यात आहे. नाटक बघायला येणाऱ्या प्रत्येक लहान मुलाला गिफ्ट देण्याचे फंडे तर रेग्युलर झालेत. काही नाटकवाल्यांनी तर रिझल्ट दाखवून ठरावीक पर्सेंटच्या वरील विद्यार्थ्यांना तिकिटामध्ये भरघोस सवलत जाहीर केली होती. मुलांना आणि पालकांना बालनाट्यांकडे वळवण्याचे जेवढे म्हणून प्रयत्न करावे लागले, तेवढे मध्यंतरीच्या काळात झाले. या नसत्या क्लृप्त्यांना मराठी बालवर्ग भुलला नाही आणि त्यांना जी नाटके चालवायची होती तीच चालवली, आजही तिच परीस्थिती आहे.
साधारणपणे १९५९ साली मुंबई मराठी साहित्य संघ मंदिरच्या आधाराने सुधा करमरकरांनी ‘मधुमंजिरी’ नामक पहिले, मराठी बालनाट्य रंगभूमीवर सादर केले. पुढे सुधाताईंनी ‘लिटील थिएटर’ नामक स्वतःची संस्था स्थापन करुन ‘स्नोव्हाईट आणि सात बुटके’, ‘चिनी बदाम’, ‘कळलाव्या कांद्याची गोष्ट’ इत्यादी अनेक सुपरहिट नाटके देऊन, महाराष्ट्रभरात दोन हजारांपेक्षा जास्त प्रयोग या नाटकांचे केले. १९६३च्या काळात रत्नाकर मतकरी आणि प्रतिभा मतकरी यांनी ‘बालनाट्य’ या स्वतःच्या संस्थेद्वारे ‘अचाट गावची अफाट मावशी’ , ‘इंद्राचे आसन, नारदाची शेंडी’, ‘अलबत्त्या गलबत्त्या’ अशी अनेक दर्जेदार बालनाट्ये या दाम्प्त्यानी निर्माण केली. १९६६च्या सुमारास नरेंद्र बल्लाळ आणि कुमुदिनी बल्लाळ यांनी ‘नवल रंगभूमी’ या नव्याने स्थापित केलेल्या, त्यांच्या संस्थेमार्फत ‘मंगळावर स्वारी’ या पहिल्या सायफाय नाटकाची निर्मिती करण्यात मोठे यश मिळाले. विज्ञानावर आधारभूत कथाबीज प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवायचे. पुढे बल्लाळांनी ‘राजाला फुटले पंख’, ‘बोलका बाहूला’, ‘एक होता जोकर’ इत्यादी लोकप्रिय बालनाट्यांची यशस्वी निर्मिती केली. बालनाट्यांमध्ये ट्रिक सीन्सचा प्रथम वापर बल्लाळांच्या ‘नवल रंगभूमी’ने केला.
१९७०च्या सुमारास वंदना विटणकर आणि त्यांचे चित्रकार पती चंद्रकांत विटणकर यांनी वंदना थिएटर्सतर्फे ‘टिमटिमटिम्बू बम बम बगडम्’, ‘परिकथेतील राजकुमार’, ‘रॉबिनहूड’ अशी विविध विषयांची बालनाट्ये सादर केली. नेपथ्य अर्थात चंद्रकांत विटणकर यांचे असायचे. ‘परिकथेतील राजकुमार’ या बालनाट्यातील नेपथ्य अतिशय देखणे होते. रंगमंचावर एक मोठा वृक्षराज होता. खोडाला नाक व डोळे आणि पांढरी दाढी होती. वृक्ष जागा झाला की, डोळे उघडले जायचे. फांद्या पसरल्या जायच्या व त्यानंतर धीरगंभीर आवाजात तो बोलू लागायचा. आजूबाजूच्या झुडपांवर फुलपाखरे उडताना दिसायची. फुले डोलू लागायची.
वंदनाताई आणि सुधाताई यांच्या बालनाट्यात देखणे नेपथ्य आणि हमखास छान छान गाणी असायची. १९७५ साली विजू नवरे लिखित बालनाट्यातील पहिला फार्स ‘जाड्या, रड्या आणि चमच्या’ या नावाने रंगभूमीवर आणला. याचे दिग्दर्शन केले होते, अशोक पावस्करांनी. बालनाट्यासाठी त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही.
पुढे चित्रा पावसकरांनी त्यांच्या ‘प्रेरणा थिएटर’तर्फे ‘सुलट्याचं उलट, उलट्याचं सुलट’ या सुपरहिट नाटकाची निर्मिती केली. याच नाटकातून अंबर हडप, रोहन गुजर, गणेश पंडित, प्रशांत लोके, प्रसाद बर्वे, सचिन दरेकर आदी आजची रंगभूमी व्यापणा कलाकारांचा प्रवेश झाला. १९८४ साली विनोद हडप यांनी लिटिल थिएटर्सतर्फे ‘अप्पू अस्वल्या करी गुदगुल्या’ हे बालनाट्य लिहून दिग्दर्शित केले. विनोद हडप यांनी ‘पोर झिपरी शाळा बिनछपरी’,‘ज्युरासिक पार्क ते शिवाजी पार्क’ अशी रंजकदार बालनाट्ये लिहिली. गणेश पंडितला दिग्दर्शनाची पहिली संधी विनोद हडप यांनी दिली.
आविष्कार या रंगभूमी चळवळींशी निगडित असलेल्या संस्थेने ‘दुर्गा झाली गौरी’ या नृत्यनाट्याची निर्मिती करून इतिहास घडवला. नृत्य दिग्दर्शक व गुरू पार्वती कुमारांची नृत्यबोली प्रेक्षकांच्या मनावर परिणाम करून जायची. याच सुमारास ‘आम्ही शाळेत जाणार नाही’ हे शेखर लाड लिखित व जयवंत देसाई दिग्दर्शित बालनाट्य प्रचंड गाजले. ‘दुर्गा झाली गौरी’प्रमाणेच हादेखील माॅब प्ले होता. परंतु यात रेकाॅर्ड ब्रेक माॅब वापरून, ‘आम्ही शाळेत जाणार नाही’ ने इतिहास रचून ठेवला आहे. राजू तुलालवार हे अजून एक बालनाट्यासाठी झोकून सातत्याने नवनवे प्रयोग करणारे नाव. १९७९ पासून कार्यरत असलेल्या तुलालवारांनी ‘चिल्ड्रन्स थिएटर’ या संस्थेकडून ‘चिंगी चिंगम, बबली बबल गम’, ‘आई बाबा हरले’, ‘करामती रोबो’ ‘जादूची खेळणी’ इत्यादी ८० हून अधिक नाटके लिहून, दोन हजारांहून अधिक प्रयोग करण्यात यशस्वी झाले आहेत.
नोव्हेंबर २०१५ मध्ये, व्यावसायिक बालनाट्यास परदेश दौरा घडवून आणण्याचे श्रेय राजू तुलालवारांचे आहे, असे अनेक रंगकर्मींचे योगदान मराठी बालनाट्याला लाभत आले आहे. कांचन सोनटक्के, सुलभा देशपांडे, सई परांजपे, लीला हडप, चित्रा पावसकर, विद्या पटवर्धन या स्त्री नाटककारांबरोबरच भालबा केळकर, श्रीधर राजगुरू, वासुदेव पाळंदे, माधव वझे, दत्ता टोळ, माधव चिरमुले, रामनाथ थरवळ, जयंत तारे व दिनकर देशपांडे या रंगकर्मींचेही बालरंगभूमीवरील कार्य उल्लेखनीय आहे.
सद्या रत्नाकर मतकरींचे ‘अलबत्त्या गलबत्त्या’ आणि दिलीप प्रभावळकरांचे ‘बोक्या सातबंडे’ ही नाटके गेल्या वर्षभरात आपल्या चकचकीत सादरीकरणामुळे गाजते आहे. नामवंत कलाकार, अप्रतिम नेपथ्य, विविधरंगी वेशभूषा, नृत्ये, गाणी आणि लहान मुलांच्या आवडीचा थरार असे पूर्ण पॅकेज या नाटकानी दिले; परंतु मोबदल्यात तिकीट दरातही मोठी वाढ करून, उत्पन्नाची समीकरणेच या नाटकानी बदलून टाकली आहेत. हाच फाॅर्म्युला लक्षात घेऊन, यंदाच्या छोट्या-छोट्या बालनाट्यांबरोबरच ‘आज्जी बाई जोरात’ हे नवं कोरं बिग बजेट नाटक प्रदर्शित होत आहे. निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर आणि रंगमंचावरील प्रथम पदार्पणात अभिनय बेर्डे चमकणार आहेत. लहान मुलांबरोबर पालकही आकर्षित होऊन, एका तिकिटाऐवजी कमीत कमी दोन तिकिटे विक्रीचे गणित या मागे आहे, हे न कळायला, मराठी पालकवर्ग देखील तेवढा दुधखुळा राहिलेला नाही, परंतु बालहट्टापुढे सर्वांनाच नमते घ्यावे लागते. नामांकित नटांना घेऊन बालनाट्य निर्मितीचा ट्रेंड हळूहळू रुजू होऊ घातलाय. संजय नार्वेकर, अतुल परचुरे, वैभव मांगले ही नावे बालनाट्याला ग्लॅमर देऊन गेलीच आहेत, आता नवीन कोण येतोय ते पाहू…!
हा बालनाट्याच्या विकासाचा आढावा मुंबई, पुणे, नाशिक व नागपूर या शहरांपुरता मर्यादित राहिलेला आहे. खेडोपाडी असे कित्येक ग्रुप वा रंगकर्मी आहेत. ज्यांची दखल महाराष्ट्र शासनाने तर नाहीच, परंतु अखिल भारतीय मराठी नाट्य परीषदेनेही घेतलेली नाही, हे दुर्दैव. अ. नगरमधून शाम शिंदे, चिंचवडमधून गौरी लोंढे, साताऱ्यातून अभिजित वाईकर, औरंगाबादचे धनंजय सरदेशपांडे, सोलापूरच्या आश्विनी तडवळकर आणि मीरा शेंडगे, पुण्याचे सागर लोदी ही मंडळी आजही स्वतःची पदरमोड करून, बालरंगभूमी चळवळ जिवंत ठेवत आहेत. यश-अपयशाकडे न पाहता स्पर्धांमधून, आर्थिक यशाची समीकरणे न सोडवता केवळ बालरंगभूमीच्या विकासासाठी धडपडणारी ही नावे प्रातिनिधिक आहे. महाराष्ट्रात आज ज्या अर्थी बालरंगभूमीला थोडेफार का होईना, चांगले दिवस जर दिसत असतील, तर त्यामागे अनेक प्रादेशिक प्रतिनिधी हा बालरंगभूमीचा पेटारा यशस्वीतेने वाहून नेत आहेत, हे सत्य आहे.
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…
भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…
अॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…
राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…
प्रा. देवबा पाटील आनंदराव हे सेवानिवृत्त वैज्ञानिक असल्याने त्यांना विज्ञानाच्या सर्वच गोष्टी माहीत होत्या. ते…