Friday, October 24, 2025
Happy Diwali

उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर

मुंबई : मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघापैकी काही मतदारसंघाचा तिढा गेले काही दिवस महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दिसत होता. त्यापैकीच एक असलेल्या मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी आता काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन सलग दोन वेळा निवडून आल्या होत्या. मात्र यावेळी त्यांच्या उमेदवारीबाबत भाजपाकडून मौन बाळगण्यात आले आहे.

सुरुवातीला काँग्रेसकडून माजी आमदार नसीम खान यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात ख्रिश्चन आणि मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ही मते वळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे बोलले जात होते. मात्र आता वर्षा गायकवाड यांचे नाव जाहीर झाले आहे.

वर्षा गायकवाड या मुंबईतील लोकसभेचा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आग्रही होत्या. पण मविआच्या जागावाटपावेळी हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. तसेच, उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यावरून वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली होती.

मुंबईतल्या सहा मतदारसंघांपैकी ४ मतदारसंघ ठाकरे गटाला तर २ मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत. यानुसार उत्तर-मध्य मुंबई व उत्तर मुंबई या जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. तर ठाकरे गटाला दक्षिण मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई आणि ईशान्य मुंबई असे चार मतदारसंघ मिळाले आहेत.

Comments
Add Comment