काँग्रेसला महिलांकडून मंगळसूत्र हिसकावून घ्यायचे आहे, तुमची संपत्ती हिसकावून ती त्यांच्या खास लोकांमध्ये वाटून घेण्याचा कट काँग्रेस रचत आहे, असे दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या प्रचार सभेत सांगितल्यानंतर, देशभर काँग्रेससह विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदी हे कसे दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना मुद्द्यांवर चर्चा करण्यापेक्षा हिंदू-मुस्लीममध्ये वाद निर्माण व्हावा असे वाटते, अशी टीका काँग्रेससह इंडिया आघाडीतील नेत्यांकडून करण्यात आली. काँग्रेसचा छुपा अजेंडा आता बाहेर आला आहे. देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचे मित्र आणि भारताबाहेरील काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणारे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी तर वारसा हक्कातील संपत्तीतील वाटा हा सरकारच्या ताब्यात देणे यात काही गैर नाही.
अमेरिकेत वडिलोपार्जित मिळालेल्या संपत्तीवर ५५ टक्के कर सरकारला जमा करावा लागतो, तर भारतातही असे केले पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. त्यासाठी सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेतील उदाहरण देण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेत वारसा कर आकारला जातो. जर एखाद्याची निव्वळ संपत्ती १०० दशलक्ष असेल आणि तो मरण पावल्यावर तो फक्त ४५% त्याच्या मुलांना हस्तांतरित करू शकतो. ५५ टक्के संपत्ती सरकार घेते. हा आहे अमेरिकेतील कायदा. त्यात म्हटले आहे की, “तुम्ही तुमच्या पिढीत संपत्ती निर्माण केली. आता तुम्ही निघून जात आहात. तुम्ही तुमची संपत्ती सर्वच नाही, तर अर्धी लोकांसाठी सोडली पाहिजे.” सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेतील हा कायदा योग्य असल्याचे सांगून इतर देशांनी त्याचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे मत मांडले आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यात या कायद्याबद्दल पित्रोदा यांनी तुलना केली आहे. ‘भारतात वारसा कर नाही. जर एखाद्याची संपत्ती १० अब्ज असेल, तर त्याच्या मुलांना १० अब्ज मिळतात. जनतेला काहीच मिळत नाही. त्यामुळे हे असे मुद्दे आहेत, ज्यांवर लोकांना वाद घालावे लागतील. दिवसाच्या शेवटी काय निष्कर्ष निघेल, हे मला माहीत नाही, पण जेव्हा आपण संपत्तीच्या पुनर्वितरणाबद्दल बोलतो तेव्हा आपण नवीन धोरण आणि नवीन कार्यक्रमांबद्दल बोलले पाहिजे, असेही पित्रोदा यांनी सांगितले. “हा धोरणात्मक मुद्दा असला तरी काँग्रेस पक्ष असे धोरण तयार करेल ज्याद्वारे संपत्तीचे वितरण अधिक चांगले होईल, असेही ते एका मुलाखतीत पित्रोदा बोलून गेले. जे काँग्रेसच्या पोटात आहे ते पित्रोदा यांच्या मुखातून ओठावर आले आहे. त्यामुळे पंतप्रधानांवर टीका करण्यापेक्षा, काँग्रेसचे खाण्याचे दात आणि दाखवण्याचे दात कसे वेगळे आहेत, याचा प्रयत्न यानिमित्ताने आला आहे. महिलांचे मंगळसूत्र आणि संपत्तीबाबत काँग्रेसच्या मनात काय आहे, हे सत्य देशासमोर मांडण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. त्यामुळे असे म्हणण्यास वाव आहे की, पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसची व्होट बँक आणि तुष्टीकरणाचे राजकारण उघड केले.
पंतप्रधानांच्या खुलाशामुळे काँग्रेस आणि इंडियामध्ये एवढी चिडचिड का झाली? याचा अर्थ घाव बरोबर वर्मी बसला आहे. पंतप्रधान मोदी यांना शिवीगाळ करणे, त्यांना तानाशाह म्हणून हिणविण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. कारण त्यांना सत्याची भीती वाटते आहे. २०१४ नंतर केंद्रात काँग्रेसचे सरकार असते, तर सर्वसामान्य व्यक्तींच्या घरातील पैसा हा सुरक्षित राहिला असता का? असा विचार आता सर्वसामान्य नागरिक करत आहेत. संपत्तीचे पुनर्वाटप करायचे असेल, तर लोकहितार्थ नवे कायदे भारतात करावे लागतील असे मत सॅम पित्रोदा यांनी मांडले आहे.
पित्रोदांच्या वक्तव्यावर आता काँग्रेसने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी सांगितले की, ‘सॅम पित्रोदा हे माझ्यासह जगभरातील अनेकांचे गुरू, मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक आहेत. पित्रोदा त्यांना प्रकर्षाने जाणवणाऱ्या मुद्द्यांवर मोकळेपणाने आपली मते मांडतात. त्यापैकी त्यांनी वारसा संपत्तीसंदर्भात केलेले वक्तव्य हे त्यांचे स्वत:चे मत आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या विचाराशी सहमत नाही, असेही जयराम रमेश यांनी सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जातीगणना करताना, प्रत्येक कुटुंबाकडे किती पैसा आहे, याचा एक्सरे काढण्याची भाषा जाहीरनाम्यात वापरली आहे. हा एक्सरे म्हणजेच तुमच्या कुटुंबाकडे किती पैसे आहेत, यावर काँग्रेसचा डोळा आहे, हे पंतप्रधान मोदी यांनी ओळखले म्हणूनच त्यांनी दोन दिवसांपूर्वी देशातील जनतेला सावध केले आहे. आता मतदानासाठी जाताना काँग्रेसचा छुपा अजेंडा काय आहे याचा विचार प्रत्येक मतदारांनी करायला हवा.