Share

प्रा. अशोक ढगे

भूगर्भातील पाण्याची घटलेली पातळी, धरणांची खपाटीला गेलेली पोटे, कोरड्याठाक नद्या, विहिरींनी गाठलेला तळ अशा परिस्थितीत भारनियमाचे भूत मानगुटीवर बसलेले. अंगाची लाही करणाऱ्या या काळात सुखाची झुळूक यावी, तसे घडले आहे. ‘स्कायमेट’ तसेच भारतीय हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांप्रमाणेच रिझर्व्ह बँक आणि सरकारनेही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

गेल्या वर्षी दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागलेल्या आपल्या देशाला यंदा चांगल्या पावसाचे आशेचे ढग दिसायला लागले आहेत. अंगाची लाही लाही करणाऱ्या या काळात गार हवेची एक झुळूक यावी, तसे झाले आहे. ‘स्कायमेट’ ही प्रसिद्ध संस्था आणि आता भारतीय हवामान विभागाने या वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांना आनंद होणार आहे, असे नाही तर रिझर्व्ह बँक आणि सरकारलाही सुटकेचा नि:श्वास टाकल्यासारखे झाले आहे. गेल्या वर्षभरात पाऊस कमी असल्याने शेती उत्पादनावर, अर्थव्यवस्थेवर, आयात-निर्यातीवर आणि एकूणच बाजारातील मागणी-पुरवठ्यावर कसा आणि किती परिणाम झाला, हे सध्या अनुभवायला मिळत आहे. ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर आणि वस्तूंच्या मागणीतील घट हे कमी पावसाचे कारण आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेवर आणि महागाईवर कमी पावसाचा परिणाम होत आहे. सरकार आणि रिझर्व्ह बँक बाजारात हस्तक्षेप करून महागाई नियंत्रणाला प्राधान्य देत असले, तरी त्याचा पावसाशी संबंध असतो. पाऊस नसल्यास शेतीमालाच्या उत्पादनावर आणि एकूणच ग्रामीण अर्थकारणावर परिणाम होत असतो. सरकारला टँकर, चारा, कर्जवसुलीमध्ये सवलत आदींची उपाययोजना करावी लागली. बँका, पतसंस्थांच्या वसुलीवर परिणाम होतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात. कर्जाचा डोंगरही वाढतो. अशा परिस्थितीत भारतातील ऐंशी टक्के सिंचन व्यवस्था ज्या मोसमी पावसावर अवलंबून असते, त्याच्याकडे नजरा लागल्या नाहीत, तरच नवल.

शेतकरी कायम आशेवर जगत असतो. पाऊस जूनच्या मध्यावर सर्वदूर पोहोचत असला तरी फेबुवारीच्या मध्यापासून त्याचे वेध लागलेले असतात. वेगवेगळ्या हवामान संस्था फेब्रुवारीत पहिला अंदाज व्यक्त करतात. तसाच अंदाज वेगवेगळ्या ठिकाणच्या भाकणुकीतून व्यक्त केला जात असतो. त्यातही बुलडाणा, आदमपूरच्या भाकणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. एप्रिलमध्ये भारतीय हवामान विभाग, स्कायमेट आणि अन्य हवामान तज्ज्ञांचा दीर्घकालीन अभ्यासावर बेतलेला अंदाज व्यक्त होत असतो. असे असले, तरी हा अंदाज असतो. सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असला, तरी तो किती काळात होणार आहे, त्याचे दिवस किती असतील, दोन पावसांमध्ये किती अंतर असेल, यावर शेतीची गणिते अवलंबून असतात. भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या दीर्घकालीन हवामान अंदाजानुसार यंदा संपूर्ण देशभरात नैऋत्य मान्सूनच्या काळात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. ‘एल निनो’ आणि ‘ला निना’मुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन हवामान विभागाने हे दीर्घकालीन अंदाज जाहीर केले आहेत. ‘एल निनो’ कमकुवत होत असून, ‘ला निना’ येत असल्याने पावसावर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे.

हवामान विभागाकडे असलेल्या सुमारे ७० वर्षांच्या आकडेवारीचा सविस्तर अभ्यास करून भारतीय हवामान विभाग चांगल्या पावसाच्या अंदाजाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचला असला तरी अनेकदा हवामानात अचानक बदल होत असतो, वादळे येत असतात आणि जगात कुठेही कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर पावसाळी ढग खेचले जाऊन पावसावर परिणाम होत असतो. यंदाच्या अंदाजानुसार देशातील बहुतांश म्हणजे जवळपास ७५ टक्क्यांपेक्षा अधिक भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. उत्तर, ईशान्य आणि पूर्वेतील काही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. देशभरात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या दरम्यानच्या नैऋत्य मान्सून काळातील पावसाचा हा अंदाज आहे. वर्तवलेल्या अंदाजापेक्षा पाच टक्के कमी किंवा जास्त प्रमाणात पाऊस होऊ शकतो. ही शक्यता गृहीत धरली, तरी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. आजवरच्या पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता ५ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान सरासरी ८७ सेंटीमीटर पाऊस पडत असतो. या ८७ सेंटीमीटरच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस पडत असतो, त्याला सरासरी पाऊस म्हणतात. त्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्यास सरासरीपेक्षा जास्त तर ९० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस गृहीत धरला जातो.

या वर्षी देशात ८७ सेंटीमीटरच्या १०६ टक्के पाऊस पडू शकतो. ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ या हवामानाच्या परिस्थितीचा आणि त्याच्या प्रभावाचा विचार करून यंदाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या ‘एल निनो’ची स्थिती काहीशी जास्त (मॉडरेट) आहे; पण त्याचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. मॉन्सून सुरू होईपर्यंत तो अगदी कमी (न्यूट्रल) स्थितीला येऊ शकतो. तेव्हापासून म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबरच्या आसपास ‘ला निना’ स्थिती निर्माण होऊ शकते. ‘एल निनो’चा मॉन्सूनवर नकारात्मक परिणाम होत असला तरी ‘ला निना’च्या स्थितीचा पावसावर सकारात्मक परिणाम होतो. हवामान विभागाने १९५१ पासून २०२३ पर्यंत कोणत्या वर्षी ‘ला निना’ची स्थिती होती याचा अभ्यास केला. त्यात २२ वर्षे ‘ला निना’ची स्थिती होती. त्यापैकी बहुतांश वर्षी पावसाचे प्रमाण हे सरासरी, सरासरीपेक्षा जास्त किंवा अतिवृष्टी झाल्याचे दिसून आले. त्यात अपवाद फक्त १९७४ आणि २००० चा होता. त्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. ‘एल निनो’चा प्रभाव कमी होत असतानाच ‘ला निनो’चा प्रभाव वाढत जातो, तेव्हा समाधानकारक पाऊस होतो.

या वर्षी ईशान्येला किंवा जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंडमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. ओडिशा, छत्तीसगड, झारखंडचा काही भाग, पश्चिम बंगाल इथेही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. गेल्या वर्षीपर्यंत नोव्हेंबर ते मार्चदरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट व्हायची; पण या वर्षी तसे न घडता एप्रिल महिन्यात गारपीट झाली आणि येत्या काही दिवसांमध्येही गारपीट होऊ शकते. हे ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ यांच्या बदलत्या स्थितीचेच संकेत आहेत. या संपूर्ण स्थितीचा विचार करता महाराष्ट्रात यंदा मान्सूनच्या पावसाबरोबरच मान्सूनपूर्व आणि परतीचा पाऊसही चांगला होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान नेहमीपेक्षा जास्त वाढते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल-निनो’ असे संबोधले जाते.

प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान साधारणपणे २६ ते २७ अंश सेल्सिअसपर्यंत राहते. त्यात आणखी वाढ होऊन ३२ ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत जात असल्यास त्या स्थितीला सुपर ‘एल निनो’ म्हणतात. वारे वेगाने वाहू लागल्यामुळे समुद्राच्या पाण्याचे तापमान वेगाने कमी होऊ लागते. त्या स्थितीला ‘ला निना’ असे म्हटले जाते. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. हा पूर्वमोसमी पाऊस शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे. उन्हाळ्यात पाऊस झाला तर पावसाळ्यात कमी पाऊस होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे; परंतु ही भीती निराधार ठरवणारा अंदाज वेगवेगळ्या संस्थांनी दिला आहे. विशेष बाब म्हणजे ‘स्कायमेट’ या संस्थेने ‘इंडियन ओशियन डायपोल’सुद्धा यंदा पॉझिटिव्ह राहणार, अशी शक्यता वर्तवली आहे. ‘इंडियन ओशियन डायपोल’ सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह राहतो, त्या वर्षी नेहमीच चांगला पाऊस होत असतो. दरम्यान यंदा अशीच परिस्थिती राहणार आहे. यामुळे मान्सूनला फायदा होऊ शकेल.

यंदा २१ मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये पोहोचण्याची दाट शक्यता आहे. राहवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजात महाराष्ट्रातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जास्त आहे. पूर्व विदर्भातसह इतर भागात सरासरीएवढ्या पावसाची शक्यता जास्त आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन १५ मेपर्यंत होऊ शकते, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. चांगल्या पावसामुळे महागाई ०.५ टक्के घटेल. महागाई नियंत्रित राहिली तर रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करू शकेल. गृहकर्ज, वाहन कर्जाचे दर कमी होऊ शकतील. देशांतर्गत मागणी वाढेल. त्याचा फायदा एफएमसीजी, फर्टिलायझर, औषधाशी संबंधित कंपन्यांना होईल.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

13 minutes ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

43 minutes ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

3 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

4 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

4 hours ago