दिवार...

हलकं-फुलकं - राजश्री वटे


दिवार म्हटलं की, आधी डोळ्यांसमोर येतो, तो अमिताभ बच्चन यांचा चित्रपट. खूप गाजला त्यावेळी. अमिताभ यांचे डायलॉग कमाल!
पब्लिक एकदम खल्लास!
आपण हिंदी ‘दिवार’बद्दल नाही, तर आपल्या भिंतीबद्दल बोलू या.


भिंत म्हणजे घराचे सुरक्षा कवच. ज्यात जीवन सुरक्षित राहते. ऊन, थंडी, पाऊस यांपासून संरक्षण देते, ती भिंत व तिने पेललेलं छप्पर. ही भिंत आधार देते, छप्पर, सावली देते. भिंत घरातील व्यक्तींच्या सुख-दु:खाची साक्षीदार असते. ‘भिंतीला कान असतात’ अशी म्हण आहे. पण घरात राहणाऱ्या लोकांचे गुपित चार भिंती आड झाकून ठेवण्याचे सामर्थ्यही तिच्यात असतं. थरथरत्या शरीराला प्रथम आधार मिळतो, तो भिंतीचाच!


लहान मुलांना भिंत फार प्रिय. लहान मुलांना बोटात पेन्सिल धरून, रेघोट्या मारायला आधी दिसते, ती भिंतच. ती पण अंगभर त्यांच्याकडून रंगपंचमी खेळून घेते. कधी अ...आ...इ...चा फळा बनते!
घराचं आतील सौंदर्य वाढतं हिच्यामुळे. सुंदर पेंटिंग्स, हँगिंग अलगद पेलून धरते. त्यासाठी खिळ्यांची टोक ही सहन करते बिचारी. घर सुंदर दिसायला, ती हेही करते. मग दिमाखाने म्हटलं जातं ‘सुंदर माझं घर’ याच्या पाठीशी असते भिंत!!


स्त्रीच्या नाजूक हातांनी शेणाने सारवलेली भिंत जी ऊन शोषून घेते, घरातल्यांना गारवा देते. कारण तिच्यावररून फिरला असतो प्रेमाचा हात. पावसाळ्यात बिचारी स्वत: पावसाचा मारा सहन करत, कशी तरी तग धरून उभी राहते. कधी कोसळतेसुद्धा हतबल होऊन!


खेडेगावातल्या भिंती अंगभर शेणाच्या गवऱ्या अभिमानाने लेवून घेते, सुकवते. जेव्हा या गवऱ्यांवर घरातील चूल जळते, तेव्हा समाधानाने तो धूर श्वासात भरून घेते, फार सुखावते ही भिंत!!!


आज जग पुढे जाताना, भिंतीने स्वत:तही बरीच सुधारणा केली आहे, ती आता पहिल्यासारखी लेचीपेची राहिली नाही. आजच्या स्त्रीसारखी मजबूत झाली आहे. साध्या धक्क्याने कोलमडणारी राहिली नाही ती!


घराच्या आतील तर सौंदर्य वाढवतेच ती पण... बाहेरील संरक्षक भिंत ही स्वत:च्या अंगावर वेली, फुलं लपेटून अंगणात मिरवते. भिंतीच्या अनेक कहाण्या आहेत... एवढी पक्की दगडाची भिंत पण ज्ञानेश्वरांनी चल म्हटल्याबरोबर निघाली. चौघा बहीण-भावांना पाठीवर बसवून दिमाखात. त्यांच्यापुढे चांगदेवाचा वाघसुद्धा घाबरला!


ठाण्यामध्ये ‘माणुसकीची भिंत’ म्हणून चर्चेत आहे. गरजूंना लागणाऱ्या कोणत्याही वस्तू तिथे ठेवायच्या, गरजू जे लागेल ते घेऊन जातात. विनाशुल्क! समाजसेवकांच्या देखरेखीखाली अतिशय शिस्तपद्ध पद्धतीने हे कार्य केले जाते... खरी माणुसकीची भिंत!!


भारताबाहेरच्या एका देशात एका चहाच्या हॉटेलमध्ये कुपन पद्धतीने चहा मिळतो. कुपन घ्या... चहा प्या! पण एक कप चहा प्यायचा असला, तरी दोन कुपन कम्पल्सरी... एक स्वत:साठी व दुसरे भिंतीवर चिटकवायचे! हॉटेलची एक भिंत फक्त कुपनसाठी.जे गरीब लोक पैसे देऊन, चहा पिऊ शकत नाही, ते तिथे येतात.


भिंतीवरील एक कुपन घेतात, चहा पितात, निघून जातात, परोपकारी भिंत! किती छान समाजसेवा! भिंतीच्या सहयोगाने... आजकाल सार्वजनिक भिंतींवर कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून सुंदर संदेश देणारे पेंटिंग काढून घेतल्या जातात, रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी! पूर्वी या भिंतींची अवस्था बोलायलाच नको त्याबद्दल किती दु:ख होत असेल तिला लोकांच्या वाईट सवयींचे!

Comments
Add Comment

ब्रह्मचर्य

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे शुकदेव हे भारतीय आध्यात्मिक परंपरेतील व पुराणातील एक तेजस्वी वैराग्यशील

तोलावा शब्द । बोलण्यापूर्वी ...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या बाबतीत घडलेला हा एक

खेड्यामधले घर कौलारू...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे जुन्या आठवणी निघाल्या की, आठवते ते चाळीतले आमच्या शेजारी राहणाऱ्या बापू

मुरलीरव म्हणजे सुमधुर स्वरसुगंध

स्मृतिगंध : लता गुठे आज सकाळी सकाळी एक बासरीवाला इमारतीच्या खालून बासरी वाजवत चालला होता. खूप सुंदर सूर त्यामधून

स्वराज्यजननी माँसाहेब

संस्कृतीचा गोडवा : पूर्णिमा शिंदे स्वराज्य प्रेरिका, स्वराज्य जननी, थोर राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँ

श्रद्धा

जीवनगंध : पूनम राणे आज मंगळवार आणि संकष्टीचा दिवस होता. हनुमान चौकातील गणेश मंदिर विविध रंगांच्या फुलांनी सजवले