नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी देशातील जनतेला मतदानासाठी वेळ काढण्याचे आवाहन केले आहे. मतदान हे घटनात्मक लोकशाहीत सगळ्यांत मोठे कर्तव्य आहे.त्यामुळे ही संधी गमावू नये असे त्यांनी म्हटले आहे. माय वोट माय व्हॉइस मिशनसाठी एका व्हिडिओ संदेशात सरन्यायाधीश म्हणाले की आपण जगातील सगळ्यांत मोठ्या लोकशाहीचे नागरिक आहोत.
देशाची घटना नागरिक म्हणून आपल्याला अनेक अधिकार देते. मात्र त्या बदल्यात आपल्याकडून कर्तव्यपालनाचीही ती अपेक्षा करते. या लोकशाहीत नागरिकाचे सगळ्यांत महत्वाचे कर्तव्य आहे ते म्हणजे मतदान करणे. त्यामुळे आपल्या महान मातृभूमीचे नागरिक म्हणून मतदान करण्याच्या आपल्या कर्तव्यापासून कोणीही दूर राहू नये असे माझे सर्वांना आवाहन आहे.दर पाच वर्षांतून आपण पाच मिनिटे आपल्या देशासाठी काढली पाहिजेत. हे करण्यायोग्य आहे ना अशी विचारणा करतच त्यांनी माझे मत माझा आवाज असे म्हटले आहे.
ते पुढे म्हणतात सरकार निवडण्यात नागरिकांचा सहभाग महत्वाचा असतो. त्यामुळेच लोकांनी लोकांसाठी निवडलेले लोकांचे सरकार असे म्हटले जाते. पहिल्यांदा त्यांनी जेंव्हा मतदान केले होते त्या घटनेचे स्मरण केल्यानंतर सरन्यायाधीश म्हणाले की मत दिल्यानंतर बोटाला लागलेली शाई देशभक्ती आणि राष्ट्रासोबत जोडले गेल्याची भावना निर्माण करते. जेंव्हा मी वकिल होतो तेंव्हा कामाच्या निमित्ताने इकडे तिकडे जावे लागायचे. त्यावेळीही मतदानाचे कर्तव्य मी बजावले. ती संधी गमावली नाही.