चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कलादर्पण सोहळ्यात या वर्षातील सर्वोत्तम नाटके पाहण्याचा योग आला. त्यात एका संगीत नाटकाने आपल्या पारंपरिक संगीत नाट्य आविष्काराने लक्ष वेधून घेतले, ते नाटक होते, मुंबई मराठी साहित्य संघ मंदिराचे ‘संगीत माऊली.’ सद्य काळात अशा नाटकांना प्रेक्षक नाहीत, त्यामुळे संगीत नाट्यनिर्मिती होऊ शकत नाही, असा नकारात्मक समज आणि मनोवृत्ती निर्माण होऊन संगीत नाटकांची परंपरा लयाला जाताना आमच्या पिढीला बघायला लागणार की काय ? हा प्रश्न उभा ठाकला असतानाच, ‘संगीत माऊली’चा प्रयोग अर्थात हा योग अत्यंत सुखावह होता. साहित्य संघाच्या मराठी नाटकांना जवळपास गेल्या ९० वर्षांची परंपरा आहे.
या संस्थेच्या मालकीचे थिएटर असल्याकारणाने नाट्य प्रयोगासाठी अन्य थिएटर्सवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्याच नाट्यगृहात त्या नाटकांचे प्रयोग करणे व्यावहारिक होते. त्या काळी गिरगाव हे मराठी माणसांचे होते. गिरगावातील मराठी टक्का लयाला गेला आणि साहित्य संघाचे अवकळा पर्व सुरू झाले. नव्या येणाऱ्या पिढीचा नाटकांकडे बघायचा दृष्टिकोनच मुळी अपारंपरिक असल्याने, व्यावहारिक असमतोल सुरू झाला आणि अर्थातच याचा परिणाम साहित्य संघाच्या इतर उपक्रमांबरोबर नाटकांवरही झाला, तरीही संघाची नाट्यशाखा जगावी, यासाठी भालेराव कुटुंबीयांबरोबरच प्रमोद पवार हे नाव आवर्जून घ्यावे लागते. विविध संगीतकार, नाट्यदिग्दर्शकांनी तथा नटमंडळींनी भरभराटीस आणलेली ही संस्था हळूहळू मराठी नाट्यनिर्मितीचे अर्थकारण अव्यवहार्य आहे, या कारणाला कवटाळून बसली आहे की काय, अशी शंका साहित्य संघाचीच मंडळी करू लागली आहेत.
साहित्य संघाच्या कार्यकारणी सदस्यांपैकी या विषयी चर्चा केली असता, ३६५ दिवसांपैकी वर्षाकाठी आजमितीला अंदाजे सव्वाचारशे सत्रांसाठी नाट्यगृहापाशी आरक्षण आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे नाट्यगृहाला इतर नाट्यगृहांच्या तुलनेत अजिबात वाईट दिवस नाहीत. वाईट दिवस आले आहेत ते मराठी संगीत नाटकांना! संगीत नाटकांचा प्रेक्षकवर्गच लोप पावत चालला आहे. नव्हे तो लोप पावलाय, असे जाणकारांचे म्हणणे आहे. संगीत नाटकाला प्रेक्षक यायला लागल्यास, आम्ही सुद्धा नाट्यनिर्मितीसाठी तयार आहोतच, अशी पुस्तीदेखील त्या जाणकारांनी जोडली. शासनाचा सांस्कृतिक विभाग दरवर्षी संगीत नाटकांची स्पर्धा आयोजित करीत असतो. त्या स्पर्धेचा एकंदर प्रतिसाद पाहता, जवळपास ३५ ते ४० संगीत नाटके महाराष्ट्रातून सादर होतात.
त्यापैकी रत्नागिरी आणि कोल्हापूर या केंद्रावर तर हौशी रंगकर्मींनी सादर केलेल्या नाटकांना हाऊस फुल्लचे बोर्ड लागलेले मी स्वतः पाहिलेले आहेत. आता मूळ मुद्द्यावर येतो. परवा झालेल्या सांस्कृतिक कलादर्पणच्या नाट्यमहोत्सवात ‘संगीत माऊली’चा प्रयोग बऱ्यापैकी गर्दीत पार पडला. आडवार असूनही, आडवेळ असूनही मराठी नाट्यसंगीतप्रेमींनी नाटकाला दिलेली दाद उत्साहवर्धक आणि आशादायी होती. नाटकातील पदांना भरभरून टाळ्यांचा प्रतिसाद मिळत होता. डॉ. राम पंडित या तरुण संगीतकारांने नाटकातील पदांना दिलेल्या चालींवर प्रेक्षक डोलत होते. नाटक नवे असल्याने, यातील एकही पद ओळखीचे नाही, तरीही प्रदीप ओकांच्या लेखनाला दाद मिळत होती. गानसम्राज्ञी म्हणून ज्यांना संगीत रंगभूमी ओळखते, अशा बकुळ पंडित तल्लीन होऊन नाटकात रमल्या होत्या. नाटकाच्या शेवटी अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानताना प्रमोद पवारांनी “कदाचित हा नाटकाचा शेवटचा प्रयोग असेल” असे सांगून भूकंप घडवून आणला. नाट्यरसिक प्रेक्षकांना कळेचना की, यावर व्यक्त तरी कसे व्हायचे. शेवटी बकुळ पंडित बोलल्याच की, हे नाटक बंद होणाऱ्यांपैकी नाही. अजून नाटकाने पंचवीशीही गाठलेली नाही, तेव्हा असा नकारात्मक विचार करणे अयोग्य आहे.
बकुळजींचे म्हणणे अगदी योग्य होते. पूर्णतः नवोदित तरुण गायक नटमंडळींकडून तयार करवून घेतलेला, हा संगीत माऊलीचा नाट्यप्रपंच अधिकाधिक प्रेक्षकवर्ग कसा मिळू शकेल? या प्रश्नाभोवती फिरला पाहिजे. मला वाटते या नाटकाचे मार्केटिंग कुठेतरी चुकतेय. सद्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक बदलानुसार ज्याची ढोल पिटण्याची ताकद जास्त त्याच्याच खेळाला लोक थांबून पाहतात. नव्या पिढीकडून नाटक करवून घेण्याबरोबर नव्या पिढीचे ‘फंडाज’सुद्धा अमलात आणले गेले पाहिजेत.
संगीत माऊली हे प्रदीप ओकांनी ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई यांचे वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी कुलकर्णी यांची सलग कथा या नाटकात मांडलेली आपणास दिसून येईल. विठ्ठलपंतांच्या आयुष्याची झालेली उलथापालथ आणि त्यांस रुक्मिणीने दिलेली साथ अशा कौटुंबिक स्तरावर आणि समाजव्यवस्थेने टाकलेल्या बहिष्कारावर हे नाट्य भाष्य करते.
कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावरील संघर्ष असूनही तो कुठेही ‘मेलोड्रामा’ होणार नाही, याची काळजी प्रमोद पवारांनी घेतलेली जाणवते. साहिल विशे आणि गौरी पंडित यांनी साकारलेली दोन्ही प्रमुख पात्रांवर नवनाट्याचे संस्कार आढळतात. ते संस्कार दिग्दर्शकाशिवाय दुसरा कोण करणार ? कविता विभावरी, श्रेयस व्यास, मनोज नटे आणि सचिन नवरे यांच्या भूमिका फारशा मोठ्या नसल्या तरी लक्षात राहतात. तन्वी गोरे यांनी साकारलेली कुंभारीण अधिक लक्षवेधक ठरते. कुंभारणीच्या रुपात सर्वतोपरी मदतीला धाऊन येणारी विठुमाऊली जेेव्हा कुलकर्णी दाम्पत्याच्या मागे उभी राहते, तेव्हा नाटक अधिक सकारात्मक होत जाते. हा लेखन प्रवाह आजचा आहे, ज्यात दिग्दर्शक डोकावताना दिसतो. नेपथ्य जरी साजेसे असले, तरी शाम चव्हाणांची प्रकाशयोजना नाट्यमयता नक्कीच अधोरेखित करते.
‘सं. संत तुकाराम’, ‘सं. देवबाभळी’, ‘सं. अवघा रंग एकची झाला’ आणि यांच्या पंक्तित नव्याने रुजू झालेलं ‘संगीत माऊली’ या नाटकांने नव्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीजचा आधार घेत, या नाटकाचे प्रयोग होऊ द्यावेत, ही मनोमन इच्छा…!
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…