झाडांच्या फांद्या छाटणी कामांमध्ये वाहनांचा अडथळा!

रस्त्याच्या कडेला झाडांखाली लावलेली वाहने वेळीच हलवावीत; वाहनांचे नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार नाही


बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना सहकार्य करण्याचे आवाहन


मुंबई : पावसाळा सुरू होण्याआधी खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने मोठ्या आणि धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणीची कामे हाती घेतली आहेत. मात्र या कामांमध्ये रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांचा अडथळा येत आहे. महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांकडून त्या-त्या परिसरातील झाडांच्या छाटणीबाबत आधीच अवगत करण्यात येते. तसेच या कार्यवाहीत प्रशासनाला सहकार्य करून आपापली वाहने अशा ठिकाणांहून काढून घ्यावीत, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. झाडांच्या फांद्या छाटणीदरम्यान जर दुर्दैवाने वाहनांचे नुकसान झाले, तर महानगरपालिका त्यास जबाबदार राहणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.


मुंबई महानगरात सर्व्हेक्षण केल्यानंतर धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणी उद्यान विभागाकडून सुरू आहे. मात्र ही छाटणी सुरू असताना रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांचा अडथळा येत आहे. यातून अनेकदा कर्मचारी आणि वाहनधारकांमध्ये वाद झाल्याचे प्रसंग घडले आहेत. कामांमध्ये व्यत्यय देखील येतो आहे. वाहनांचे नुकसान होवू नये म्हणून महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाकडून त्या-त्या परिसरातील झाडांच्या छाटणीबाबत आधी अवगत करण्यात येते. त्यामुळे निश्चित केलेल्या वेळेनुसार आपापली वाहने संबंधित ठिकाणाहून काढून सुरक्षित अशा अन्य ठिकाणी न्यावीत. प्रशासनाने आवाहन करूनही जर नागरिकांनी संबंधित ठिकाणांहून वाहने काढली नाहीत आणि फांद्या छाटणीदरम्यान दुर्दैवाने वाहनांचे नुकसान झाले तर महानगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे महानगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात साधारणपणे २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. यापैकी १५ लाख ५१ हजार १३२ एवढी झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत. तर १० लाख ६७ हजार ६४१ झाडे शासकीय इमारती तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. एकूण झाडांपैकी १ लाख ८६ हजार २४६ झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. यंदा मुंबई महानगरात एकूण १ लाख १२ हजार ७२८ झाडांची छाटणीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी दिनांक १२ एप्रिल २०२४ अखेरपर्यंत १५ हजार ८२१ झाडांची छाटणी झाली आहे. दिनांक ७ जून २०२४ अखेरपर्यंत उर्वरित ९६ हजार ९०७ झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट उद्यान विभागाने ठेवले आहे. मृत आणि कीड लागलेली तसेच वाकलेली ४१४ झाडे सर्वेक्षणादरम्यान आढळली आहेत. यापैकी ३३८ झाडे काढून टाकण्यात आली असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी करावयाची असल्यास संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही परदेशी यांनी केले आहे.


३ हजार ६९० जणांना नोटिसा


बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या झाडांची निगा महानगरपालिकेद्वारे नियमितपणे राखण्यात येते. तथापि, गृहनिर्माण सहकारी संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय - निमशासकीय संस्था, खासगी जागा याठिकाणी असणाऱ्या झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. गृहनिर्माण संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींमध्ये असणाऱ्या वृक्षांच्या छाटणीकामी, संतुलित करण्याबाबत महानगरपालिकेने ३ हजार ६९० नोटिसा दिल्या आहेत.

Comments
Add Comment

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक

मुंबईतील खासगी कोचिंग क्लासना लावणार चाप! तपासणीसाठी समिती गठित

मुंबई : मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित