१०१६ उमेदवार झाले उत्तीर्ण; कसा पाहाल निकाल?
नवी दिल्ली : युपीएससी परीक्षार्थींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. परीक्षेचा निकाल (UPSC CSE Mains Result 2023) जाहीर झाला आहे. हा निकाल परीक्षार्थी upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल तपासू शकतात. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांत टॉप रँकमध्ये मुलींनी बाजी मारली होती. मात्र, यावर्षी मुलांचं वर्चस्व दिसून येत आहे. लखनौचा आदित्य श्रीवास्तव (Aditya Srivastava) देशात पहिला तर अनिमेश प्रधान (Animesh Pradhan) देशात दुसरा आला आहे. देशात तिसऱ्या क्रमांकावर डोनुरू अनन्या रेड्डी (Donuru Ananya Reddy) आहे.
यंदा यूपीएससीच्या परीक्षांमध्ये १०१६ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ३४७ उमेदवार खुल्या प्रवर्गाचे, ११६ उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे, ३०३ उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे, १६५ उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गाचे तर ८६ उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत. गेल्या वर्षी हेच प्रमाण खुला प्रवर्ग – ३४५, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग – २८, ओबीसी – ५२, अनुसूचित जाती – ५ तर अनुसूचित जमाती – ४ असं होतं.
आयएएस (IAS) अर्थात भारतीय प्रशासकीय सेवा, आयपीएस (IPS) अर्थात भारतीय पोलीस सेवा, आयएफएस (IFS) अर्थात भारतीय परराष्ट्र सेवा व गट अ आणि गट ब मधील इतर केंद्रीय सेवांसाठी ही पदभरती करण्यात येणार आहे.
येथे पाहा निकाल (UPSC CSE Mains Result 2023 Check Here)
केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा मुख्य निकालात नियुक्तीसाठी एकूण १०१६ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा रोल नंबर यूपीएससीने जाहीर केला आहे. निकाल पाहण्यासाठी upsc.gov.in या संकेतस्थळावर UPSC CSE Results या लिंकवर क्लिक करा. आपले लॉगइन डिटेल्स इथे भरा. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसू लागेल. निकालपत्र डाऊनलोड करण्याचाही पर्याय इथे देण्यात आला आहे.