Monday, September 15, 2025

Mumbra Crime: धक्कादायक! पाचवीही मुलगीच झाल्याने जन्मदात्यांनीच केले किळसवाणे कृत्य!

Mumbra Crime: धक्कादायक! पाचवीही मुलगीच झाल्याने जन्मदात्यांनीच केले किळसवाणे कृत्य!

चौथीची जिभ कापली, पाचवीची हत्या करुन मृतदेह पुरला

ठाणे : मुलगा हा वंशाचा दिवा असे मानले जात असले तरी मुलगी ही वंशाची पणती असे म्हटले जाते. मात्र तरीही अनेक ठिकाणी मुलींचे पालनपोषण करणे कठीण होत असल्याने मुली नकोशा वाटतात. कधी गर्भपात तर कधी नवजात असताना मुलींना मारले जाते. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंब्रा येथील एका कुटुंबात चार मुला-मुलींनतर पाचवीही मुलगीच झाल्यामुळे जन्मदात्यांनीच त्या मुलीची हत्या केली आहे.

दोन मुले आणि तिसऱ्या मुलीनंतरही आणखी दोन मुली झाल्याने १८ महिन्याच्या मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह पुरला. तर दुसऱ्या मुलीची जीभ कापणाऱ्या आई नुरानी जाहीद शेख (२८), वडील जाहीद सलामत शेख (३८) याना मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या नराधमांनी पाचवीही मुलगी झाल्याने आणि आजारी असल्याने मुलीची हत्या केल्याची आणि तिचा मृतदेह पुरल्याची कबुली दिली.

दाम्पत्यांना शेवटच्या झालेल्या दोन मुली हबीबा आणि लबीबा नको होत्या. त्यामुळे जन्मदात्यांनी चौथी मुलगी हबीबा हिची जीभ कापली होती. तर मयत चिमुरडी लबीबा ही आरोपी दाम्पत्याची पाचवी मुलगी होती. अवघ्या दीड वर्षाच्या चिमुरडीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करुन तिला गंभीर जखमी केले होते. त्यानंतर तिला आजार झाल्याचा बहाणा करत तिच्यावर उपचार सुरु केले. मात्र उपचारादरम्यान तिचा १८ मार्च २०२४ रोजी मृत्यू झाला. चिमुरडी लबीबा शेख हिच्या हत्येनंतर दाम्पत्यांनी १९ मार्च रोजी रात्री २:३० च्या सुमारास मृतदेह पुरला. मात्र ४ एप्रिल रोजी संतोष महादेव या बनावट नावाने प्राप्त झालेल्या अर्जामुळे खुनाचा गुन्हा उघडकीस आला.

दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला हत्येचा गुन्हा लपविण्यासाठी मृतदेह पुरून मोकळे झालेल्या नराधम दाम्पत्याला मुंब्रा पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासाने जाळ्यात अडकविले. यापूर्वी हबीबा हिची जीभ कापल्याप्रकरणी झारखंड राज्यात या दाम्पत्यावर गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदरच्या घटनेनंतर २८ दिवसात खून पचल्याचा आनंद दाम्पत्याला झाला. मात्र याच दरम्यान मुंब्रा पोलिसांना बनावट नावाने अर्जदार संतोष हरिलाल महादेव नावाने प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेत पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरु केली आणि आरोपी गळाला लागले.

आई नूरानी आणि वडील जाहिद यांची कसून चौकशी करुन दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात नेले असता १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment