मुंबई : एप्रिल महिन्याचा मध्य गाठत आल्यामुळे जोरदार उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्या आहेत. बाहेर कामानिमित्त फिरताना प्रकर्षाने उन्हाळा सुरू झाला हे जाणवत आहे. उन्हातून परतल्यावर चेहऱ्यावर टॅन दिसू लागतो. चेहरा उजळणं तर सोडाच पण उन्हामुळे चेहरा, हाताची त्वचा करपल्यासारखी काळी दिसू लागते. तो वातावरणाचा आपल्या शरीरावर झालेला बदल आहे. प्रत्येक उन्हाळ्यात याचा त्रास अनेकांना सहन करावा लागतो. त्यामुळेच यंदाच्या उन्हाळ्यात तुमची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही 'हे' उपाय करू शकता.
अशी घ्या चेहऱ्याची काळजी
- चेहरा स्वच्छ करावा
उन्हात फिरून चेहऱ्यावर धूळ साचते. यामुळे चेहऱ्याची चांगली स्वच्छता होणे गरजेचे आहे. त्यासाठी चेहऱ्यावर सतत थंड पाण्याचा शिडकावा मारा. ज्यामुळे चेहऱ्यावर धूळ टिकून राहणार नाही. तसेच रोज रात्री झोपताना कोणत्याही प्रकारचा मेकअप असेल तर तो उतरवून म्हणजे चेहरा धुवूनच झोपा.
- सनस्क्रीन
उन्हाळ्यात कडक उन्हाचा त्वचेवर कोणताही परिणाम होऊ नये असे वाटत असेल, तर सनस्क्रीन लावल्याशिवाय पर्याय नाही. सनस्क्रीन तुमच्या त्वचेला उन्हाच्या प्रखर किरणांपासून सुरक्षित ठेवते. त्यामुळे तुमची त्वचा काळी पडत नाही.
- पाणी पिणे
उन्हाळ्यात त्वचेवरील तजेलदारपणा कमी होतो. कारण, शरीर डिहायड्रेट होते त्यामुळे चेहरा घामाने भरलेला असतो. पाण्याची कमी झाली की चेहरा निस्तेज अन् सुरकुतलेल्या सफरचंदासारखा दिसू लागतो. त्यामुळेच चेहऱ्यावर नेहमी तेज येण्यासाठी भरपूर पाणी प्या.
- शीट मास्क
घराबाहेर गेल्यावर चेहऱ्यावर धूळ आणि प्रदुषणाचा विपरित परिणाम होतो. यामुळे त्वचा कोरडी पडते. यामुळे वेळोवेळी शीट मास्कचा वापर करावा. यामुळे तुमची त्वचा चमकदार बनते.
- स्क्रब
चमकदार आणि मऊ त्वचेसाठी वेळोवेळी स्क्रब करावे. बाजारात अनेक प्रकराचे स्क्रब मिळतात. तसेच तुम्ही घरी बनवलेले स्क्रब वापरू शकता. घरी स्क्रब बनवण्यासाठी संत्रा पावडर, बेसन, आणि दूध यांचे मिश्रण तयार करून चेहऱ्यावर लावू शकता. नंतर हलक्या हाताने मसाज करावा व स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.
- फेशिअल मास्क
आठवड्यातून एकदा फेशिअल मास्क नक्की वापरावा. यामुळे त्वचा चमकदार बनते. प्रदुषणामुळे अस्वच्छ झालेली त्वचा स्वच्छ होते.
- फेशिअल ऑइल
चेहरा चमकदार दिसण्यासाठी फेशिअल ऑइलचा वापर करावा. बाजारात अनेक प्रकारचे फेशिअल ऑइल मिळतात. यामुळे हानिकारक घटक चेहऱ्यामध्ये जात नाहीत.
- ज्युस अन् सरबत पिणे
तुम्हाला प्रवासात काहीवेळा थकल्यासारखे वाटत असेल. तर असे डिहायड्रेशनमुळे होऊ शकते. त्यामुळे नारळ पाणी, सरबते आणि ज्युस प्या. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहील आणि त्याचा त्वचेलाही फायदा होईल.
- फेसपॅकची मदत घ्या
चेहऱ्यावर तेज येण्यासाठी तुम्ही घरीच बनवलेले फेसपॅक वापरू शकता. तसेच, चेहऱ्याची त्वचा उजळण्यासाठी फेशिअल ट्रिटमेंटही करू शकता. ज्यामुळे चेहऱ्याला योग्य मसाज मिळतो आणि रक्ताभिसरण सुरळीत होते. त्यामुळे चेहऱ्यावर आपोआपच ग्लो येतो.






