जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
परमेश्वर हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि परमेश्वराबद्दलचे अज्ञान जे लोकांमध्ये आहे, त्यातून अनेक अंधश्रद्धा निर्माण होतात. लोक देवदर्शनाला जाताना ठरावीक दिवशीच जातात. तिथे मोठमोठ्या रांगा लावतात व त्यातून नीट देवदर्शन तर होतच नाही. मंगळवारी किंवा अंगारकीलाच सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले पाहिजे ही सुद्धा अंधश्रद्धा आहे. गणपती फक्त मंगळवारी व अंगारकीच्या दिवशी देवळात असतो व इतर दिवशी तो काय दौऱ्यावर जातो? इतर दिवशीही तो आहे तिथेच असतो आणि आपलीही अंधश्रद्धा अशी आहे की फक्त मंगळवारी व अंगारकीच्या दिवशी गणपती दर्शनासाठी गेले पाहिजे. मी नेहमी सांगतो की देवळात जा, देवाचे दर्शन घ्या. पण केव्हा? गर्दी नसेल तेव्हा ! तेव्हा तुम्हाला डोळे भरून, पोटभर देवाचे दर्शन घेता येते. एरव्ही तुम्हाला देवाचे तसे दर्शन घेता येत नाही. विठ्ठलाचे मंदिर असू दे किंवा गणपतीचे मंदिर असू दे, गर्दी असेल तेव्हा जाऊ नका. तिथे गर्दी नसेल तेव्हा जा. आता काय करायचे आहे हे प्रत्येकाने ठरवायचे, कारण प्रत्येकाला हे स्वातंत्र्य दिलेले आहे.
बुद्धीचे स्वातंत्र्य, कर्मस्वातंत्र्य देवाने तुम्हाला दिलेले आहे. तुला पाहिजे ते तू कर. मी विचारणार नाही की हे तू का केलेस किंवा हे देखील विचारणार नाही की हे तू का केले नाहीस. तुला योग्य वाटेल ते तू कर. भगवंताने अर्जुनाला उपदेश केला व शेवटी काय सांगितले? “यथेच्छसी तथा कुरू” म्हणजेच “तुला जसे योग्य वाटेल जशी तुझी उच्च असेल त्याप्रमाणे तू कर”. मी तुला सांगणार नाही की हेच कर किंवा ते करू नकोस. मी तुला मार्गदर्शन केलेले आहे की युद्ध करणे आवश्यक आहे. युद्धातून पळून जाणे हा पलायनवाद आहे. युद्धातून पळून गेलास तर लोक तुला हसतील. मेल्यानंतर नरकात जागा मिळेल, कारण तू कर्तव्यधर्माचे पालन केले नाहीस आणि तू लढलास तर दुष्टांना मारल्याचे श्रेय तुला मिळेल, राज्य मिळेल, लोक तुझी कीर्ती गातील. ह्यातले कुठले पाहिजे ते तू बघ. भगवंताने सर्व सांगितले व “शेवटी तुला योग्य वाटेल ते तू कर” असे म्हटले.
आम्ही सुद्धा आमच्या नामधारकांना हेच सांगतो. आम्ही जे सांगतो तसेच तुम्ही केले पाहिजे असा आमचा आग्रह नाही, पटले नाहीतर विचारा. मी सांगतो तसेच करा, असा माझा आग्रह नाही. पटले नाही तर विचार आणि पटवून घ्या. पटल्यानंतर करा ते मात्र तुमच्याच भल्यासाठी. हे मी का सांगतो आहे. हिंदू धर्माचा एक चांगला पैलू आहे. इतर धर्मात ते नाही. तुला योग्य वाटेल ते तू कर हा हिंदुधर्माचा चांगला पैलू आहे. मी जे सांगितले तेच तू केले पाहिजेस, असे स्वतः भगवंतही म्हणत नाहीत हा हिंदू धर्माचा पैलू आहे. हिंदू धर्मात निरनिराळे लोक निरनिराळ्या उपासना करतात. एकच उपासना करत नाहीत. तुला जी उपासना आवडते, ती तू कर. तसेच देवाची भक्ती कशी करायची हे मी ठरवणार आहे. मला कोणी सांगण्याचे कारण नाही. मला जशी आवडेल तशी उपासना मी करणार. शेवटी देव महत्त्वाचा आहे व देवावर प्रेम करणे हे महत्त्वाचे आहे.