साक्षात परमेश्वर अर्जुनाला म्हणतात, ‘मी ज्ञानरूपी रत्न तुझ्या हातात असल्यावर दुसऱ्याच्या तोंडातून ही गोष्ट ऐकावीस अशी अडचण तुला कशाला पाहिजे?’ म्हणजेच अर्जुनाच्या भक्तीने, प्रेमाने, ज्ञानाच्या निष्ठेने श्रीकृष्णांना जिंकून घेतलं आहे. त्यामुळे ते अर्जुनाच्या स्वाधीन झाले आहेत. नात्यातील ही सर्वोच्च अवस्था! परमेश्वराने भक्ताच्या ठिकाणी स्वत:ला सोपवणं.
ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
कृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली, हा अनमोल ठेवा आपल्यापुढे आणला व्यासमुनींनी! माऊलींनी मराठीत तो आणला ज्ञानेश्वरीरूपाने. यात तत्त्वज्ञान आहेच, पण माऊलींच्या प्रतिभेमुळे त्याला एक सुंदर स्वरूप प्राप्त झालं आहे. यात आहे ज्ञानदेवांची अप्रतिम कथनपद्धती! याचा अनुभव आणि आनंद ज्ञानेश्वरीतून घ्यावा. त्यातही अठरावा अध्याय म्हणजे कळसच होय. यात श्रीकृष्ण अर्जुनाच्या विनंतीनुसार पुन्हा एकदा त्याला ज्ञान देत आहेत. अर्जुन ते ज्ञान घेत आहे. हे शिकवणं, शिकणं याचं वर्णन ज्ञानदेव स्वतःच्या कल्पनाशक्तीने असं बहारदार करतात! आता पाहूया अशाच काही रसाळ ओव्या. श्रीकृष्ण – अर्जुन यांच्यातील प्रेम, जिव्हाळा, आपुलकीने ओथंबलेल्या!
श्रीकृष्ण कर्माला कारणीभूत गोष्टी सांगत आहेत. तेव्हा ते म्हणतात, ‘मी ज्ञानरूपी रत्न तुझे हाती असल्यावर, दुसऱ्याच्या तोंडातून तू ही गोष्ट ऐकावीस इतकी अडचण तुला कशाला पाहिजे?’ ओवी क्रमांक २८२
‘आपल्यासमोर आरसा असल्यावर, आपले रूप पाहण्यास, लोकांना माझे रूप कसे दिसते ते मला सांगा, अशी विनंती का करावी?’ ओवी क्रमांक २८३
‘भक्त ज्या स्थितीत जिकडे पाहील, त्या ठिकाणी ती वस्तू मी त्याच्या दृष्टीस पाडतो, तो मी आज तुझे खेळणे झालो आहे’ (हस्तगत झालो आहे). ही ओवी अशी –
‘भक्त जैसेनि जेथ पाहे। तेथे तें तेंचि होत जायें।
तो मी तुझें जाहालों आहें। खेळणें आजी।। ओवी क्रमांक २८४
एक शोभादर्शक (कॅलिडोस्कोप) असतो. तो वेगवेगळ्या कोनांतून फिरवावा, तसे त्यात सुंदर रंग, आकार सापडतात. ज्ञानदेव हे श्रीकृष्ण-अर्जुन नातं चित्रित करताना जणू असा शोभादर्शक लावतात. त्यामुळे त्यांना या नात्याचे अनोखे पैलू सापडतात. श्रोत्यांपुढे ते सादर करतात. म्हणून आपल्यालाही एक रसिक म्हणून त्यातील गोष्टींचा आनंद मिळतो. त्यातील सूक्ष्मतेने, उत्कटतेने जणू गहिवर फुटतो.
आता इथेच पाहा! साक्षात परमेश्वर अर्जुनाला म्हणतात, ‘मी ज्ञानरूपी रत्न तुझे हातात असल्यावर दुसऱ्याच्या तोंडातून ही गोष्ट (हे ज्ञान) ऐकावीस अशी अडचण तुला कशास पाहिजे?’ याचा अर्थ अर्जुनाच्या भक्तीने, प्रेमाने, ज्ञानाच्या निष्ठेने श्रीकृष्णांना जिंकून घेतलं आहे. त्यामुळे ते अर्जुनाच्या स्वाधीन झाले आहेत. त्याला ज्या ज्या गोष्टींचं ज्ञान हवं वाटतं ते पुन्हा देत आहेत. नात्यातील ही सर्वोच्च अवस्था! परमेश्वराने भक्ताच्या ठिकाणी स्वतःला सोपवणं. त्याहीपुढे जाऊन कल्पना येते की, श्रीकृष्ण आणि अर्जुन हे एकरूप झाले आहेत. इतके एकरूप की जणू आरसा झाले आहेत.
आरशात आपण आपले स्वरूप पाहतो. त्याचप्रमाणे श्रीकृष्णरूपी आरशात अर्जुनाला ‘स्व’रूप दिसत आहे; तर अर्जुनाच्या निमित्ताने श्रीकृष्ण स्वतःच्या ज्ञानाची उजळणी करत आहेत. स्वतःशीच बोलत आहेत. आता अर्जुनावर याचा काय परिणाम होतो? त्याचं चित्र! माऊली म्हणतात, ‘तो सुखाच्या समुद्रात बुडू लागला.’ आनंदाची ही सर्वोच्च परिसीमा! ‘तेव्हा देव समर्थ असल्यामुळे त्यांस आठवण होऊन त्यांनी सुखाच्या समुद्रात बुडणाऱ्या अर्जुनास वर काढले.’ ओवी क्र. २८८
ज्ञानदेव त्यांच्या प्रतिभेने आपल्यापुढे हा सारा प्रसंग साकार करतात, साक्षात करतात. त्यांच्या या प्रतिभेला विनम्र अभिवादन!