कोलकाता नाईट रायडर्स यंदाच्या टाटा आयपीएलमधील शक्तीशाली संघ म्हणून ओळखला जात होता. पण चेन्नई सुपरकिंग्सने त्याच्या विजयरथाचे चाकच पंक्चर केले आणि काल शाहरूखच्या या संघाला धोनीच्या सेनेने नमवले. तेही अगदी दणदणीत पद्धतीने. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम केकेआरला फलंदाजीला आमंत्रण दिले. त्यानंतर केकेआरसाठी सामना म्हणजे दुःस्वप्नच ठरला. केकेआरचा संघ हा दबावाखाली ढेपाळतो आणि कोसळतो, याचे प्रत्यंतर धोनी सेनेने आणून दिले. वास्तविक केसकेआरवर दबाव काहीच नव्हता. त्यांचा विजय रथ सुरू होता. पण सीएसकेसमोर खेळण्याच्या दबावाखाली आला आणि त्यानंतर केकेआरला पराभव पाहावा लागला.
सीएसकेसाठी साऱ्याच गोष्टी अनुकूल ठरल्या आणि नाणेफेकीपासून ते अंतापर्यंत सामना त्यांच्याच प्रभुत्वाखाली होता. सीएसकेने केकेआरला केवळ १३७ धावांत गुंडाळले आणि केकेआरचे धुवांधार फलंदाज सुनील नरेन आणि रिंकू सिंग हे दोन्हीही फलंदाज उत्तम फिरकी गोलंदाजी असली तर काहीही करू शकत नाहीत, हे सिद्ध झाले. केकेआरचे चौकार आणि षटकारांची बरसात करणारे दोन्ही फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर पुढील खेळ हा सीएसकेसाठी डाव्या हातचा मळ होता. केकेआरकडून कुणीच मैदानावर उभे राहिले नाही आणि त्यांनी विकेट्स फेकल्या. केकेआरचा संघ सुनील नरेन याच्यावर किती अवलंबून आहे, तेही दिसले. त्यामुळे सुनील नरेन जडेजाच्या गोलंदाजीवर तीक्ष्णाच्या हाती झेल देऊन बाद झाला तेव्हाच केकेआरच्या दृष्टीने सामना संपला होता. कारण कोणतीही गोलंदाजी उद्ध्वस्त करण्याची ताकद त्याच्या फलंदाजीत आहे. पण सुनील नरेन बाद झाला आणि केकेआरची प्रतिकार क्षमता जवळपास संपलीच.
श्रेयस अय्यरनेच ३४ धावा काढून थोडा प्रतिकार केला. पण त्याला एकही षटकार मारता आला नाही. सुनील नरेननेच दोन षटकार मारले. तर रिंकू सिंगने केवळ ९ धावा केल्या. बाकीच्या केकेआरच्या फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. आंद्रे रसेलही फार काही करू शकला नाही. केकेआरकडून सीएसकेला प्रतिकार असा झालाच नाही. सीएसके तणावात होता असे कधीही वाटले नाही. गौतम गंभीर हा केकेआरचा मेंटरही कालच्या त्याच्या संघाच्या प्रदर्शनाने निराश झाला असेल. पण कौतुक करावे लागेल ते रवींद्र जडेजाचे. धोनी जडेजाला जडेजा सर म्हणतो आणि जडेजा त्याला पात्र का आहे ते त्याने काल दाखवले. त्याने अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सुनील नरेनची विकेट काढून दिली.
याशिवाय त्याने अंगकृष रघुवंशी आणि वेंकटेश अय्यर या महत्त्वपूर्ण विकेट्स काढल्या. शिवाय त्याने दोन महत्त्वपूर्ण झेलही घेतले. त्यामुळे रवींद्र जडेजा विरूद्ध केकेआर असाच हा सामना झाला की काय असे वाटत होते. त्यात जडेजाने बाजी मारली. चेन्नईच्या तुषार देशपांडेचे कौतुक करावे लागेल. कारण त्याने फलंदाजांसाठीच असलेल्या या खेळात काल तीन विकेट काढून केकेआरचे कंबरडे मोडण्यात जडेजाच्या बरोबरीने आपला वाटा उचलला. अष्टपैलू खेळ करणाऱ्या जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवले जावे, हेच उचित होते. सीएसकेची फलंदाजीची सुरूवातही डळमळीतच झाली. पण सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड रॉक ऑफ जिब्राल्टरसारखा उभा राहिला आणि त्याने नाबाद ६७ धावांची एक शानदार खेळी केली. त्यात त्याने ९ चौकारांची आतषबाजी केली. त्याच्या फलंदाजीच्या जोरावरच चेन्नईचा संघ हा सामना जिंकून केकेआरला पाणी पाजू शकला.
सीएसकेचा सिक्सर किंग शिवम दुबे याने आपल्या मोठेपणाच्या खाणाखुणा या लहानशा खेळीतही दाखवून देताना तीन षटकार खेचले. १३८ धावा करण्याचे आव्हान हे मुळी आव्हानच नव्हते. ते चेन्नईने सहज पार केले आणि सात विकेट राखून तो संघ विजयी झाला. जडेजाने १८ धावांत तीन, तर देशपांडेने ३३ धावांत तीन विकेट काढल्या आणि केकेआरच्या संघातील उरली सुरली हवा काढून घेतली.
केकेआरचा संघ हा सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांच्यावर किती अवलंबून आहे ते काल दिसले. हो दोन्ही फलंदाज बाद झाल्यावर इतर केवळ मैदानावर येऊन गेले. केकेआरतर्फे कुणीही एक फलंदाज उभा राहिला असता तर केकेआर जिंकू शकला असता. कुणीच तसा प्रयत्न केला नाही. घरच्या मैदानावर म्हणजे चेपॉक स्टेडियमवर धोनीची सेना अभेद्य आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. चेन्नईच्या संघाने केळ्याची साल सोलल्यासारखा हा सामना जिंकला. जराही कष्ट त्यांना पडले नाहीत. पॉवरप्लेमध्ये केकेआरने धमाकेदार सुरूवात केली होती. एक बाद ५६ अशी त्यांची धावसंख्या सहा षटकांनंतर होती. पण ती गती त्यांना ठेवता आली नाही आणि बहुदा ती ठेवण्याचा दबाव आल्यामुळे त्यांचे फलंदाज बाद झाले आणि केकेआरला एक मामुली आव्हान देता आले.
अशा आव्हानावर जिंकण्याची कल्पना करणे अशक्य आहे. त्यासाठी संघात बेदी चंद्रा किंवा प्रसन्नसारखे फिरकी गोलंदाज असले पाहिजेत. पण आता तसे फिरकी गोलंदाज भारताकडे नाहीत. त्यामुळे अखेर केकेआरने जराही उत्कंठा न निर्माण न करता हा सामना गमावला. केकेआरने लढतही दिली नाही आणि चेन्नईला अगदी सोपा विजय बहाल केला.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…