Tuesday, July 23, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखराजकीय चर्चेचे गुऱ्हाळ

राजकीय चर्चेचे गुऱ्हाळ

आपल्या भारतामध्ये क्रिकेट आणि राजकारण या दोन विषयांवर ज्याला माहिती नसेल, तरीही तो या विषयांवर कित्येक तास बोलू शकतो, आपली भूमिका मांडू शकतो, इतरांचा चुकीचे ठरवू शकतो, असे बोलले जाते. सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय कुरुक्षेत्रावर भाजपा मित्रपक्ष आणि त्यांचा सामना करण्यासाठी काँग्रेस व मित्रपक्ष समोरासमोर ठाकले आहेत. भाजपा प्रत्येक राज्याराज्यांमध्ये कधी नव्याने राजकीय मित्रांशी घरोबा करत तर कधी जुन्याच मित्रांशी पुन्हा गोडव्याचे गणित जुळवत ‘अब की बार, चार सौ पार’साठी मजबूत मोर्चेबांधणी आखण्यात व्यस्त आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसदेखील अभी नही, तो कभी नही अशा राणा भीमदेवी थाटात निवडणूक रिंगणात सहभागी होत आहे. भाजपाविरोधी पक्षांची एकजूट ‘इंडिया’च्या छताखाली करू लागली आहे.

भाजपा एकीकडे आपल्या जुन्या मित्रांना पुन्हा आपल्याकडे वळविण्यात यशस्वी होत असताना दुसरीकडे मात्र काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीतील पक्ष पुन्हा भाजपाकडे जाऊ लागले आहेत अथवा त्या पक्षांचे नेते तुरुंगवारी करू लागले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच काँग्रेसला विविध अडथळ्यांची मालिका पार पाडावी लागत आहे. इंडिया आघाडीतील एक मातब्बर असणारे नितीशकुमार यांनी काही दिवसांपूर्वीच इंडिया आघाडीची साथ सोडत भाजपाशी मैत्रीचे प आळवल्याने इंडिया आघाडीचे बिहारमधील राजकीय गणित व आडाखे पूर्णपणे चुकले आहेत. काँग्रेसची अवस्था आज अशी झाली आहे की संघातील कर्णधारालाच आपल्याला कोणत्या क्रमाकांवर फलंदाजी करायची आहे अथवा कधी गोलंदाजी करायची आहे, याचा निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. ज्या काँग्रेसने भाजपाविरोधात पुढाकार घेत विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला, त्याच काँग्रेसला मित्रपक्ष जुमानत नसल्याचे राजकारणात पाहावयास मिळत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी, पंजाब आणि दिल्लीमध्ये केजरीवाल आम आदमी पार्टी आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस पार्टी आपले प्रभावक्षेत्र असणाऱ्या राज्यांमध्ये काँग्रेसला जुमानत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस ही उबाठा व राष्ट्रवादी शपगला सोबत घेऊन वाटचाल करत असली तरी खिळखिळ्या झालेल्या संघटनांशी मैत्री करून भाजपाविरोधी लढाई जिंकू पाहणाऱ्या काँग्रेसच्या पदरात फारसे काहीही पडणार नाही. अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्याने शरद पवार गटाचे आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली तब्बल ४० आमदारांनी वेगळी राजकीय चूल मांडल्याने उबाठाचे कंबरडेच मोडून गेले आहे. काँग्रेसच्या मित्रपक्षांना पक्षाचे नाव व चिन्हही टिकविता आले नाही. लोकप्रतिनिधींसह पक्षीय पदाधिकारीही टिकविता आलेले नाहीत. अन्य पक्षांच्या तुलनेत भाजपाची पहिल्या टप्प्यातील वाटचाल आक्रमक आहे.

अन्य पक्ष व संघटना जागावाटपात व्यस्त असताना व उमेदवारांची शोधाशोध करताना व्यस्त असतानाच भाजपाने मात्र जवळपास ४२५ लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार जाहीर करून ‘अब की बार’साठी जोरदार मोर्चेबांधणी राज्याराज्यांत बांधण्यास सुरुवात केली आहे. निवडणुका म्हटल्यावर युती, आघाडी, महायुती हे प्रकार ओघानेच आलेच. सध्या स्वबळावर निवडून येण्याचे व सत्तासंपादन करण्याचे दिवस इतिहासजमा झाले आहेत. भाजपा बहुमत प्राप्त करण्यात २०१४ आणि २०१९ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यशस्वी झाली असली तरी तिला हे यश मिळविण्यासाठी विविध राज्यांत विविध राजकीय आघाड्यांवर युती करावी लागली होती, हेही नाकारता येणार नाही. सध्या राज्याराज्यांत जागावाटपाचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. मित्रांमध्ये मतदारसंघावरून वाद सुरू आहेत.

आघाडी आणि महायुतीतही हेच चित्र कायम आहे. अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी महायुती तसेच मविआमधील राजकीय घटकांनी आपली प्रतिष्ठा पणास लावलेली आहे. अधिकृत घोषणा झाली नसल्याने त्या त्या नेतेमंडळींच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा तसेच समर्थकांचा जीव टांगणीला लागलेला आहे. मतदारसंघांबाबत दररोज सुटणाऱ्या नवनवीन राजकीय अफवांमुळे राज्यातले, जिल्ह्यातले, मतदारसंघातले, तालुक्यातले राजकीय वातावरण ढवळून निघत असते. भाजपा चार सौ पार करण्यासाठी प्रयत्न करत असली तरी भाजपाला दोनशेच्या आत अडकवण्यासाठी काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीही कंबर कसून प्रयत्न करत असल्याचे देशाच्या कानाकोपऱ्यांत पाहावयास मिळत आहे. निवडणुकांची घोषणा होऊन तसेच आचारसंहिता लागू होऊन काही दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अनेक मतदारसंघांचा व उमेदवारीचा वाद कायम आहे. प्रत्येकाने आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावत मतदारसंघ लढण्याची व जागेवरील दावा न सोडण्याची घोषणा केलेली आहे. अर्थांत निवडणुकांमध्ये हे प्रकार नवीन नाहीत. या घडामोडी निवडणूक कालावधीत होतच असतात. प्रत्येकाला निवडणूक लढवायची असते.

सभागृहात संख्याबळ वाढवायचे असते. आपल्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची मर्जी राखायची असते. तसेच मतदारसंघावरील दावा सहजासहजी सोडून देणे म्हणजे त्या जागेवर आपला प्रभाव नसल्याचे मान्य करण्यासारखे असल्याने त्या त्या जागांवर वाद घालून आपले राजकीय उपद्रवमूल्य दाखवून देण्याचा तो एक प्रयत्न असतो. महाराष्ट्रासह अन्य राज्यांत आजही विविध मतदारसंघावरून भाजपासह मित्रपक्षांमध्ये तसेच दुसरीकडे काँग्रेससह त्यांच्या मित्रपक्षांमध्ये राजकीय चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असून काही जागा आता चर्चेच्या प्रकाशझोतातही आल्या आहेत. महाराष्ठ्रात काँग्रेसला खिळखिळ्या झालेल्या उबाठांच्या सेनेला व शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणुकीत महायुतीचा सामना करावयाचा आहे. एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विश्वासात न घेता काँग्रेस व उबाठांनी उमेदवार जाहीर केल्याने आधीच शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. अर्थात या नाराजीकडे उबाठा व काँग्रेसने कानाडोळा केल्याने पवार समर्थकांमध्ये संतापाची लाटही उसळलेली आहे. दोन-चार दिवसांतच चर्चेचे गुऱ्हाळ संपुष्ठात येऊन पेल्यातील वादळही शमेल आणि निवडणुकांसाठीची खरी राजकीय लढत सुरू होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -